Virat Kohli Brand Value : भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ विराट कोहली आता क्रिकेटच्या मैदानाबाहेरही तुफान खेळी करत आहे. जाहिरात आणि बिझनेसच्या दुनियेत विराटने मोठमोठ्या सेलिब्रिटींनी धोबीपछाड दिला आहे. ‘फॉर्च्यून इंडिया’ आणि जागतिक ब्रँड कन्सल्टन्सी ‘इंटरब्रँड’ यांनी संयुक्तपणे देशातील २५ सर्वात मौल्यवान सेलिब्रिटीजवर एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, विराट कोहली तब्बल ३,५४२ कोटी रुपयांच्या ब्रँड व्हॅल्यूसह भारतातील सर्वात ‘व्हॅल्यूएबल’ सेलिब्रिटी ठरला आहे. विशेष म्हणजे या यादीत विराटने बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांसारख्या धुरंधरांना मागे टाकले आहे.
शाहरुख दुसऱ्या तर प्रियांका चोप्रा तिसऱ्या स्थानावर
इंटरब्रँडच्या या विशेष अहवालात पहिल्या १० स्थानांवर क्रीडा आणि चित्रपट क्षेत्रातील लोकांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. पहिल्या १० सेलिब्रिटींच्या यादीमध्ये ३ क्रिकेटर्स आणि ७ चित्रपट ताऱ्यांना स्थान मिळालं आहे. जागतिक पातळीवर भारताचे नाव गाजवणारी देशी गर्ल प्रियांका चोप्रा जोनस या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा जलवा कायम आहे. या शर्यतीत तो चौथ्या स्थानावर आहे.
| क्रमांक | सेलिब्रिटीचे नाव | क्षेत्र |
| १ | विराट कोहली | क्रिकेट (क्रीडा) |
| २ | शाहरुख खान | बॉलिवूड (मनोरंजन) |
| ३ | प्रियांका चोप्रा जोनस | बॉलिवूड/हॉलीवूड |
| ४ | महेंद्रसिंग धोनी | क्रिकेट (क्रीडा) |
| ५ | रणवीर सिंग | बॉलिवूड (मनोरंजन) |
| ६ | अक्षय कुमार | बॉलिवूड (मनोरंजन) |
| ७ | अमिताभ बच्चन | बॉलिवूड (मनोरंजन) |
| ८ | सचिन तेंडुलकर | क्रिकेट (क्रीडा) |
| ९ | आलिया भट्ट | बॉलिवूड (मनोरंजन) |
| १० | अल्लू अर्जुन | (मनोरंजन) |
दीपिका, रश्मिका आणि स्मृती मंधानाचाही बाजारात दबदबा
टॉप-१० च्या बाहेर जर आपण संपूर्ण टॉप २५ च्या यादीवर नजर टाकली, तर महिलांमध्ये प्रियांका चोप्रा पाठोपाठ दीपिका पादुकोणने ११ वे स्थान आणि साऊथची नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने १७ वे स्थान मिळवत बाजी मारली आहे. यांच्या व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन, साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिनेही या यादीत आपले स्थान पक्के केले आहे. मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील इतर दिग्गजांमध्ये गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ, चित्रपट निर्माता करण जोहर, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि अभिनेता विकी कौशल यांचाही त्यांचीही मजबूत ब्रँड व्हॅल्यू पाहायला मिळाली.
कशी मोजली जाते सेलिब्रिटीजची ‘असली किंमत’?
सामान्यतः लोकांना असे वाटते की ब्रँड व्हॅल्यू म्हणजे केवळ सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या, वार्षिक कमाई किंवा बॉक्स ऑफिसवरील यश असते. मात्र, यावेळी इंटरब्रँडने वापरलेली संशोधन पद्धत पूर्णपणे वेगळी होती. यात विश्वसनीयता, जनसंपर्क, लोकप्रियता, जबाबदारी, ब्रँडची मजबूती आणि प्रभाव या निकषांचा समावेश होता.
