Virat Kohli One8 Shoes Price Logic: विराट कोहलीच्या One8 या स्पोर्ट्स ब्रँडने नुकतेच दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे एका भव्य कार्यक्रमात ONE8WORLD चे अनावरण केले. या कार्यक्रमात देशातील विविध भागांतून आलेले चाहते प्री-ऑर्डर केलेले बूट घेण्यासाठी जमले होते. विशेष म्हणजे हे बूट एका फूड ॲपद्वारे बुक करण्यात आले होते. थोडक्यात सांगायचे तर क्रिकेटचे बूट विकण्याची ही एक विचित्र पद्धत होती. तरीही ते सर्व बूट विकले गेले.

या कार्यक्रमात लाँच करण्यात आलेल्या One8 च्या बुटांमध्ये कव्हर ड्राईव्ह १८ प्रो, कव्हर ड्राईव्ह १८ एक्स आणि सीम XVIII सिग्नेचर यांचा समावेश आहे.

स्पाइक कॉन्फिगरेशन्स असलेले कव्हर ड्राईव्ह १८ प्रो आणि कव्हर ड्राईव्ह १८ एक्स या बुटांची किंमत प्रत्येकी १३९९९ रुपये आहे. प्रो मॉडेल हे कसोटी सामने आणि ५० षटकांच्या क्रिकेटसारख्या मोठ्या फॉरमॅट्ससाठी बनवले आहे, जिथे स्फोटक कामगिरीपेक्षा अनेक तास टिकून राहणारी स्थिरता अधिक महत्त्वाची असते. एक्स मॉडेलमध्ये टी २० मधील हालचालींवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे.

दोन्ही शूजमध्ये विशेषतः टर्फसाठी डिझाइन केलेली सोनिक ग्रिप नावाची ग्रिप सिस्टीम, PWR+LCK नावाची मिडफूट स्टॅबिलायझेशन चेसिस आणि सोनिक फोम नावाचे कुशनिंग आहे.

Virat Kohli One8 Shoes Price
सीम XVIII सिग्नेचर बूट मिळाल्यानंतर आनंदी ग्राहक. (Photo: One8/X)

सीम XVIII सिग्नेचरची किंमत ९२३० रुपयेच का?

याशिवाय सीम XVIII सिग्नेचर नावाच्या लाइफस्टाइल बुटाची (स्निकर) किंमत ९२३० रुपये आहे. ही किंमत अशीच ठरवलेली नाही. मे २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्यापूर्वी कोहलीने १२३ सामन्यांमध्ये केलेल्या ९२३० धावसंख्येइतकीच ही किंमत आहे.

कॉन्सर्टच्या माध्यमातून विक्री

One8 ची पालक कंपनी अजिलिटासने हे बुट केवळ फ्लिपकार्टवर लिस्ट करून त्याचे लाँच केले नाही. त्यांनी ६ जून रोजी झोमॅटोद्वारे चालवल्या जाणाऱ्या डिस्ट्रिक्ट या लाइफस्टाइल आणि इव्हेंट्स प्लॅटफॉर्मवरून या बुटांसाठी विशेष प्री-बुकिंग सुरू केले. बुटांची जोडी खरेदी केल्यावर एक क्यूआर कोड मिळायचा, जे दिल्लीत झालेल्या कार्यक्रमाचे तिकीट होते.

Virat Kohli One8 shoes
One8 च्या बूट लाँच कार्यक्रमात बोलताना विराट कोहली. (Photo: One8/X)

ज्यांनी One8 ची ऑनलाइन प्री-बुकिंग केली होती, ते २१ जून रोजी द्वारका येथील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आपली ऑर्डर प्रत्यक्ष घेण्यासाठी पोहोचले होते. One8 ने या कार्यक्रमाला ग्लोबल प्रीमियर असे नाव दिले होते. यात करण औजला यांचा कॉन्सर्ट, मसाबा गुप्ता यांनी डिझाइन केलेला फॅशन रनवे आणि ग्राहकांच्या हातात पहिल्यांदाच प्रत्यक्ष उत्पादन सोपवणे, अशा गोष्टींचा समावेश होता.