Warren Buffett Passive Income formulas offer the best retirement planning tips: प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या आर्थिक नियोजनाबाबतच्या शब्दाला जगभरात किंमत आहे. त्यांनी त्यांच्या ७० वर्षांच्या कारकिर्दीत दिलेल्या आर्थिक धड्यांच्या आधारे अनेकांनी संपत्ती निर्मिती केली आहे. दरम्यान, बफे यांनी काही दशकांपूर्वी निवृत्तीच्या नियोजनाविषयी बोलताना त्यांनी एक प्रसिद्ध विधान केले होते. ते म्हणाले होते, “जर तुम्ही झोपेत असतानाही पैसे कमावण्याचा मार्ग शोधला नाही, तर तुम्हाला मरेपर्यंत काम करावे लागेल.”

थोडक्यात सांगायचे तर, पुरेसा ‘पॅसिव्ह इनकम’ असल्याशिवाय असल्याशिवाय, तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरचा काळ आरामात घालवण्यासाठी आवश्यक ती मोठी बचत उभी करू शकणार नाही. निवृत्तीच्या नियोजनाबाबत तुम्हाला चिंता वाटत असेल, तर तसे वाटणारे तुम्ही काही एकटेच नाही आहात.

जर तुमच्या आर्थिक परिस्थितीमुळे तुमची झोप उडाली असेल, तर आता ‘झोपेत असतानाही पैसे कसे कमवायचे’ हे नेमके जाणून घेण्याची वेळ आली आहे. या लेखात आपण अशा पाच मालमत्तांमधील गुंतवणुकीबाबत जाणून घेऊया ज्यातून तुम्हाला पॅसिव्ह इनकम मिळेल आणि ज्यांतून वेळेबरोबर तुमची संपत्ती वाढत राहिल.

रिअल इस्टेटमधील गुंतवणूक

रिअल इस्टेट हा नेहमीच पॅसिव्ह इनकमचा एक विश्वसार्ह स्रोत राहिला आहे. निवासी, व्यावसायिक किंवा भाड्याने देण्यासाठीच्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक केल्यास, रिअल इस्टेटद्वारे नियमित रोख प्रवाह आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मिती शक्य होते. भाड्याने देण्यासाठीच्या मालमत्तेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा भाडे मिळू शकते, ज्यामुळे उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत निर्माण होतो. जर तुम्हाला मालमत्तेची देखभाल आणि व्यवस्थापन करण्याच्या कटकटीशिवाय गुंतवणूक करायची असेल, तर ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स’ (REITs) हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. याद्वारे तुम्ही रिअल इस्टेटच्या विविध पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करू शकता.

लाभांश देणारे शेअर्स

हे असे शेअर्स असतात ज्यांवर कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना नियमितपणे लाभांश देतात. हे समजण्यास सोपे असतात आणि भारतातील पॅसिव्ह इनकमच्या सर्वात सोप्या स्रोतांपैकी एक आहेत. मोठ्या प्रमाणावर लाभांश देणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास, त्या शेअर्सची कामगिरी कशीही राहिली तरी चांगले उत्पन्न मिळवता येते. विविध क्षेत्रांतील शेअर्सचा पोर्टफोलिओ तयार करण्यास वेळ लागतो. मात्र, लाभांश देणाऱ्या शेअर्समुळे रोख रकमेचा चांगला ओघ मिळण्याची संधी असते.

म्युच्युअल फंड आणि एसआयपी

जर तुम्हाला गुंतवणुकीसाठी सोपा मार्ग हवा असेल आणि त्याच वेळी पॅसिव्ह इनकम मिळवायचा असेल, तर म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) द्वारे शेअर्स, बॉण्ड्स आणि इतर सिक्युरिटीजच्या विविध फंडात गुंतवणूक करून, तुम्ही नियमितपणे लहान रक्कम गुंतवू शकता. एसआयपीचा फायदा हा आहे की, यामुळे नियमित गुंतवणूक कालांतराने वाढते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कमीत कमी प्रयत्नांनी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा मिळवणे सोपे होते.