Warren Buffett Wealth Success Secret: वॉरेन बफे यांना जगातील सर्वात हुशार गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाते. आपल्या गुंतवणूक कौशल्याच्या जोरावर त्यांनी शेअर बाजारातून अफाट नफा कमावला आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. असे असले तरी बफे यांच्या मते त्यांच्या या यशात कौशल्य किंवा कठोर परिश्रमााइतकीच नशिबाचाही मोठा वाटा राहिला आहे.
सीएनबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत, बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष असलेल्या बफे यांनी त्यांचे आयुष्य आणि कारकीर्द घडवणाऱ्या परिस्थितीवर भाष्य केले आणि स्वतःचे वर्णन जगातील सर्वात नशीबवान व्यक्तींपैकी एक असे केले. पुढच्या महिन्यात ९६ वर्षांचे होणारे वॉरेन बफे इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण करू शकल्याचे श्रेय आपल्या दीर्घायुष्यालाही देतात.
“जगातील आठ अब्ज लोकांपैकी मी कदाचित सर्वात नशीबवान अशा १० लोकांपैकी एक असेन. आता माझे मानसिक संतुलन ढासळत आहे. माझ्या पात्रतेपेक्षा कितीतरी जास्त संपत्ती कमावली आहे. हा निव्वळ नशिबाचा भाग आहे”, असे बफे म्हणाले.
बफे यांनी सांगितले की, त्यांचे वडील आणि स्टॉकब्रोकर असलेल्या हॉवर्ड होमन बफे यांनी त्यांना अगदी लहान वयातच गुंतवणुकीची ओळख करून दिली, हा त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण होता.
“सुदैवाने, मला काय करायला आवडते हे मला खूप लवकर समजले आणि जर माझे वडील प्लंबर असते, तर कदाचित हे घडले नसते”, असे ते या मुलाखतीत म्हणाले.
बफे यांनी वयाच्या ११ व्या वर्षी पहिल्यांदा शेअर बाजारात गुंतवणूक केली. त्यांनी प्रत्येकी ३८ डॉलर्सना सिटीज सर्व्हिसचे तीन शेअर्स खरेदी केले. ही गुंतवणूक जागतिक गुंतवणुकीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कारकिर्दींपैकी एका कारकिर्दीची सुरुवात ठरली.
वॉरेन बफे यांनी वारंवार असा युक्तिवाद केला आहे की, यश हे व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेरील घटकांमुळे निश्चित होते. त्यांनी अनेकदा ‘ओव्हेरियन लॉटरी’ या संकल्पनेचा उल्लेख केला आहे. या संकल्पनेनुसार, केवळ गुणवत्तेपेक्षा एखाद्या व्यक्तीचा जन्म कोठे झाला, तिची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि तिला उपलब्ध असलेल्या संधी या गोष्टी यश मिळवण्यासाठी अनेकदा अधिक महत्त्वाच्या ठरतात.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये १० व्या स्थानी
जरी बफे यांनी गेल्या वर्षी बर्कशायर हॅथवेच्या सीईओ पदावरून पायउतार होऊन ती जबाबदारी उपाध्यक्ष ग्रेग एबेल यांच्याकडे सोपवली असली, तरीही ते कंपनीच्या कामकाजात सक्रियपणे सहभागी आहेत.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार सध्या जगातील १० व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या बफे यांनी, वयाच्या ३२ व्या वर्षीच आपला पहिला दशलक्ष डॉलर्सचा टप्पा गाठला होता. त्यानंतर त्यांनी बर्कशायर हॅथवेचे रूपांतर जगातील सर्वात मौल्यवान अशा उद्योग समूहांपैकी एका समूहात केले.
