Lenskart Bindi Tilak Row : Eyewear कंपनी असलेल्या लेन्सकार्टमध्ये टिकली आणि टिळा यावरुन जो वाद झाला होता त्या वादानंतर कंपनीवर बरीच टीका झाली. तसंच लेन्सकार्टला ट्रोलही करण्यात आलं. ज्यानंतर लेन्सकार्टने आता नियमावली बदलली आहे.
लेन्सकार्टचा वाद नेमका काय?
सोशल मीडियावर लेन्सकार्टच्या ‘स्टाईल गाईड’मधील ११ व्या पानाचा एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला. लेखिका शेफाली वैद्य यांनी हा स्क्रीनशॉट शेअर करत खळबळजनक दावा केला होता. या दाव्यानुसार, लेन्सकार्टच्या नियमावलीत कर्मचाऱ्यांना ‘हिजाब’ घालण्याची परवानगी आहे. मात्र, कपाळावर ‘बिंदी’ (टिकली), ‘टिळा’ किंवा हातात दोरा बांधण्यास मनाई करण्यात आली आहे. शेफाली वैद्य यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “हे नियम अधिकृत असल्याची मी खात्री केली आहे. पीयूष बन्सल आपल्या कर्मचाऱ्यांना सांगतात की हिजाब ठीक आहे, पण बिंदी/टिळा/धागा चालणार नाही. ज्या देशात बहुसंख्य ग्राहक आणि कर्मचारी हिंदू आहेत, तिथे अशा प्रकारचे दुटप्पी निकष का?” ही पोस्ट व्हायरल झाली होती आणि बराच वादही निर्माण झाला होता. अनेकांनी लेन्सकार्टला ट्रोल केलं होतं. ज्यानंतर आता लेन्सकार्टने नियमावलीत बदल केले आहेत.
संस्थापक पीयूष बन्सल यांचं स्पष्टीकरण काय होतं?
वाढता वाद आणि ग्राहकांचा रोष पाहता, लेन्सकार्टचे संस्थापक पीयूष बन्सल यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत आपली बाजू मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, जो दस्तऐवज व्हायरल होत आहे, तो कंपनीचे सध्याचे धोरण दर्शवत नाही. बन्सल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “लेन्सकार्टच्या ज्या पॉलिसी डॉक्युमेंटचा फोटो व्हायरल होत आहे, तो चुकीचा आहे. आमच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये धार्मिक अभिव्यक्तीवर कोणतेही निर्बंध नाहीत. कर्मचारी बिंदी आणि टिळा अभिमानाने लावू शकतात. आमचे ग्रूमिंग धोरण काळानुसार बदलले आहे आणि जुन्या आवृत्त्या आता लागू नाहीत.”
लेन्सकार्टने आणली नवी नियमावली
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक निवेदन पोस्ट करत कंपनीने म्हटलं आहे की आम्ही तुमचं म्हणणं स्पष्टपणे ऐकून घेतलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आम्हाला आमच्या ग्राहकांनी ज्या सूचना दिल्या त्याचा आम्ही सखोल विचार केला आहे. आता आम्ही आमचे इन डोअर स्टाइल गाइड काय असेल ते सांगत आहोत. असं म्हणत कंपनीने नवी नियमावली पोस्ट केली आहे.
काय आहे लेन्सकार्टची नियमावली?
लेन्सकार्ट ही एक प्राऊड इंडियन कंपनी आहे. भारतातली आणि भारतीयांसाठी तयार करण्यात आलेली ही कंपनी आहे.
२४०० हून अधिक स्टोअर्स चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रद्धा, मान्यता यांच्यापासून आम्ही अडवणार नाही. कंपनीच्या दारावर त्या सोडून या असं आम्ही म्हणणार नाही.
कर्मचाऱ्यांना टिकली, टिळा, सिंदूर, मंगळसूत्र, कडं, हिजाब, पगडी, पवित्र धागे हे घालण्याची मुभा आहे. त्यावर आमचा कुठलाही आक्षेप नाही.
लेन्सकार्टद्वारे देण्यात आलेला टी शर्ट त्यावर मुलींनी चांगल्या फिटिंगचा टॉप किंवा ब्लू जीन्स घालावी. पुरुष कर्मचाऱ्यांनी ब्लू जीन्स घालावी.
सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांना अनुसरुन गडद रंगाचे बूट आणि तसेचम मोजे घालणं अनिवार्य असेल.
