नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धामुळे खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीचा भडका उडाला असून, याचा भारतातील महागाईवर भयंकर परिणाम होणार आहे. तेलाच्या जागतिक भावात पिंपामागे सरासरी १० डॉलरची वाढ झाल्यास देशातील किरकोळ महागाईत ५५ ते ६० आधारबिंदूची (०.५५ टक्के ते ०.६ टक्के) वाढ होईल, असा अंदाज केअरएज ग्लोबल आयएफएससीच्या मुख्याधिकारी रेवती कस्तुरे यांनी सोमवारी वर्तविला.

कस्तुरे म्हणाल्या की, किरकोळ महागाई निर्देशांकावर इंधनाच्या किमतीचा प्रभाव खूप मोठा आहे. खनिज तेलाच्या आयात किमतीतील वाढीची झळ ही सुरूवातीला काही काळ प्रत्यक्ष इंधन दरवाढ न करता तेल विपणन कंपन्या सोसतील. परंतु, किमती दीर्घ काळ चढत राहिल्यास ही ग्राहकांपर्यंत दरवाढीची झळ निश्चितच पोहचेल.

भारत हा खनिज तेलासाठी प्रामुख्याने पश्चिम आशियातील स्रोतांवर अवलंबून आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या १० महिन्यात भारताच्या खनिज तेल व पेट्रोलियम आयातीपैकी ५१ टक्के पुरवठा पश्चिम आशियातूनच झाला आहे. सध्या जागतिक पातळीवर खनिज तेलाची किंमत प्रति पिंप ११५ डॉलरच्या वर असून, त्यामुळे आयात खर्चात मोठी वाढ झाली आहे. पुढे जाऊन यातून किरकोळ महागाईत वाढ होण्याचा सुस्पष्ट धोका दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले.

खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होऊ शकतो. यामुळे चालू खात्यावरील तूट आणखी वाढण्याची शक्यता आहे. खनिज तेलाच्या किमतीत प्रति पिंप १० डॉलरची वाढ झाल्यास पुढील आर्थिक वर्षात चालू खात्यावरील तुटीत ३० ते ४० आधारबिंदूंनी वाढ होईल. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर ही आव्हाने असली तरी पुढील आर्थिक वर्षात विकास दर ६.५ ते ६.८ टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. देशांतर्गत वाढत्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, असेही कस्तुरे यांनी नमूद केले.

रुपयाच्या अवमूल्यनाचा मोठा धोका

आगामी काळात भारताचे चलन अर्थात रुपयावरील दबाव वाढू शकतो. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून डॉलरकडे ओढा वाढला आहे. डॉलर आणखी भक्कम होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून रुपयाचे आणखी अवमूल्यन होण्याची भीती आहे. भरीला चालू खात्यावरील तूट फुगत गेल्यास रुपया आणखी कमकुवत होईल, असे कस्तुरे यांनी स्पष्ट केले. ही तूट वाढणे म्हणजे परदेशातून केलेल्या एकूण खरेदीची (आयात) किंमत ही त्या भारताने परदेशात केलेल्या एकूण विक्रीपेक्षा (निर्यात) जास्त राहण्याची शक्यता आहे.