PF E-PRAAPTI : काही दिवसांपूर्वी सरकारने जुन्या बँक खात्यातील पैसे ग्राहकांना मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम राबवली. आता अशीच योजना जुन्या पीएफ खात्यांसाठी आणली जाणार आहे. अनेकदा नोकरी बदलताना जुन्या पीएफ खात्यातील पैसे ट्रान्सफर करणे राहून जाते. अशा खात्यांमध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत, ज्याचा पत्ता खुद्द कर्मचाऱ्यालाही नसतो. हे टाळण्यासाठी ‘ईपीएफओ’ आता ‘ई-प्राप्ती’ (E-PRAAPTI) हे विशेष पोर्टल लाँच करत आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या नवीन पोर्टलची घोषणा केली असून, याद्वारे तुमचे जुने निष्क्रिय खाते पुन्हा सक्रिय करता येणार आहे.
‘ई-प्राप्ती’ पोर्टल म्हणजे काय?
हे एक डिजिटल व्यासपीठ आहे जे तुमच्या आधार कार्डाचा वापर करून जुन्या आणि विसरलेल्या पीएफ खात्यांचा शोध घेते. पूर्वी एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत जाताना कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागायची, पण आता हे पोर्टल तुमच्या सर्व खात्यांना एकत्र जोडण्याचे काम करेल.
पीएफ खाते निष्क्रीय का होते?
२०१४ पूर्वी ‘युनिव्हर्सल अकाउंट नंबर’ (UAN) नसल्यामुळे प्रत्येक नोकरीसाठी स्वतंत्र खाते असायचे. नोकरी सोडल्यानंतर सलग ३ वर्षे जर खात्यात कोणतेही योगदान जमा झाले नाही, तर ते खाते निष्क्रिय मानले जाते. अशी लाखो निष्क्रीय खाती असून यात कर्मचाऱ्यांचे कोट्यवधी रुपये पडून असल्याची माहिती ईपीएफओने दिली आहे.
ही सिस्टीम कशी काम करेल?
- ई-प्राप्ती पोर्टल सुरू झाल्यानंतर जुन्या खातीतील पैसे मिळवणे सोपे होणार आहे.
- तुम्ही आधार कार्डाद्वारे पोर्टलवर लॉग-इन करा.
- सिस्टीम आपोआप तुमच्या नावावर असलेली जुनी किंवा निष्क्रिय खाती शोधेल.
- ही जुनी खाती तुमच्या सध्याच्या सक्रिय ‘UAN’ शी लिंक केली जातील.
- लिंक झाल्यानंतर तुम्ही तो पैसा काढू शकता किंवा मॅनेज करू शकता.
- यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची किंवा कागदपत्रे जमा करण्याची गरज भासणार नाही.
पीएफ सेवांमध्ये ‘डिजिटल’ क्रांती
ईपीएफओने २०२५-२६ या आर्थिक वर्षात विक्रमी दावे निकाली काढले आहेत. बहुतेक ‘अॅडव्हान्स क्लेम’ आता स्वयंचलित पद्धतीने प्रक्रिया केले जात असून, काही दिवसांतच पैसे खात्यात जमा होत आहेत. हे पोर्टल टप्प्याटप्प्याने सुरू केले जाईल. सुरुवातीला ज्यांच्याकडे जुन्या खात्यांची काही माहिती आहे, त्यांच्यासाठी आणि नंतर ज्यांनी संपूर्ण माहिती गमावली आहे अशा सर्वांसाठी हे खुले होईल.
