What to Do After Job Loss In First Seven Days: ‘एआय’मधील प्रगतीमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील विविध नोकऱ्यांवर गदा येत आहे. यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये एआयमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जगभरातील आघाडीच्या कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या परिस्थितीमुळे अनेक तरुण नोकरदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकांना अचानक नोकरी गेल्यास ती परिस्थिती कशी हाताळायची हे माहित नसते. यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. अशी अचानक नोकरी गेल्यास पहिल्या सात दिवसांत काय करायचे याबाबत बिझनेस मेंटॉर सुनील देशमुख यांनी ‘देहभान’ या पॉडकास्टमध्ये मार्गदर्शन केले आहे.
या पॉडकास्टमध्ये नोकरी गेल्यानंतर पहिल्या सात दिवसांत काय करावे याबाबत बोलताना सुनील देशमुख म्हणाले, “तुमचा जॉब गेला किंवा जाणार हे कळल्यावर पहिल्या सात दिवसांत तुम्ही पहिल्यांदा तुमचा बँक बॅलन्स तपासा. माझ्याकडे बँकेमध्ये बचत केलेले किती पैसे आहेत किंवा माझी गुंतवणूक किती आहे व मी आणि माझी फॅमिली त्या पैशावर किती दिवस जगू शकतो याची क्लॅरिटी सगळ्यात पहिल्यांदा घ्या.”
“दुसरी गोष्ट पहिल्या सात दिवसांत तुम्ही स्वतःला दोष देणे बंद करा. हे फार महत्त्वाचे आहे. मला कुठल्या दिशेने जायचे आहे हा माझा निर्णय आहे. माझी नोकरी गेली हा माझा निर्णय नव्हता. नोकरी काहीतरी झाले म्हणून गेली आहे, माझ्यामुळे नाही. पण मी माझी दिशा चुकवायची की नाही हा माझा निर्णय आहे, त्यामुळे दिशा चुकवू नका”, असे ते पुढे म्हणाले.
सुनील देशमुख यांनी पुढे सांगितले, “नोकरी गेल्यानंतर तिसरी गोष्ट अशी करा की, तुमच्या कुटुंबातील जवळच्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रांना विश्वासात घ्या आणि त्यांना समजावून सांगा की असे असे झाले आहे आणि माझी नोकरी गेली आहे. खरे सांगण्यात काहीही वाईट नसते.”
नोकरी गेल्यानंतर चौथी गोष्ट काय करायची याबाबत बोलताना ते म्हणाले, “मला आता पुढे नोकरी करायची आहे की व्यवसाय हे निश्चित करा. या परिस्थितीत तुम्हाला मार्गदर्शन करणारा कोणी असेल तर त्याला जाऊन भेटा. त्याला सांगा की असे असे झाले आहे, मी काय करू?”
नेटवर्कच तुमची नेटवर्थ
नोकरीच्या शोधात असताना नेटवर्कच्या महत्त्वावर बोलताना ते म्हणाले, “तुमचे नेटवर्क सगळ्यात महत्त्वाचे असते. मी नेहमी म्हणतो तुमचे नेटवर्क ही तुमची नेटवर्थ आहे. तुमचे नेटवर्क ॲक्टिव्हेट करा. तुमच्या मित्रांना, कॉलेजची माजी विद्यार्थी संघटना असेल, जे कोणी आहे त्या सगळ्यांना जाऊन भेटा आणि सांगा, मी दुसरा जॉब शोधतोय तुझ्याकडून काही मदत होणार असेल तर मला सांग.”
“या परिस्थितीत आपण अशा लोकांच्या सहवासात राहायला पाहिजे जे सकारात्मक विचारांचे आहेत. तुम्ही, ‘अरे , तू वेडा आहे, तुझी नोकरी गेली आता तुझे काही खरे नाही’ असे म्हणणाऱ्या लोकांमध्ये जाऊ नका. या पाच-सहा गोष्टी तुम्ही फॉलो करा”, असे ते शेवटी म्हणाले.
