Rizwan Sajan Danube Group : खाडी देशांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे फार कमी भारतीय उद्योजक आहेत. यात एका मुंबईकराचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. दुबईतील अवाढव्य रिअल इस्टेट मार्केटमध्ये त्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. ‘डॅन्यूब ग्रुप’चे संस्थापक आणि चेअरमन रिझवान साजन हे युएईमधील सर्वात प्रभावशाली भारतीय उद्योगपतींपैकी एक आहेत. बांधकाम साहित्य, होम इंटिरिअर्स आणि प्रॉपर्टी डेव्हलपमेंटमधील त्यांच्या व्यवसायाने गेल्या काही वर्षांत मोठी झेप घेतली. विशेषतः त्यांची १% पेमेंट स्कीमने बाजारात धुमाकूळ घातला.
व्यावसायिक जगतासोबतच साजन हे बॉलिवूडमधील पार्ट्या आणि क्रीडा विश्वातील मोठ्या उपक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असतात. डॅन्यूब ग्रुपने बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानसोबत केलेली भागीदारी विशेष लक्षवेधी ठरली आहे. वर्ष २०२५ मध्ये कंपनीने दुबईत “शाहरुख्स बाय डॅन्यूब” या लक्झरी कमर्शियल टॉवरची घोषणा करून मनोरंजन विश्वाशी असलेले आपले संबंध अधिक घट्ट केले आहेत.
कोण आहेत रिझवान साजन?
रिझवान साजन हे दुबईत स्थायिक असलेले भारतीय वंशाचे अब्जाधीश उद्योजक आणि डॅन्यूब ग्रुपचे संस्थापक-चेअरमन आहेत. मध्य पूर्व मधील सर्वात मोठ्या बांधकाम साहित्य आणि रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये डॅन्यूबचा समावेश होतो. दुबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये अत्यंत सुलभ आणि लवचिक पेमेंट प्लॅन्स आणल्यामुळे साजन यांना “दुबईचा १% मॅन” म्हणून ओळखले जाते.
सुरुवातीचा खडतर प्रवास आणि कौटुंबिक पार्श्वभूमी
रिझवान साजन यांचा जन्म १९६३ मध्ये मुंबईत झाला. त्यांचे बालपण घाटकोपर परिसरात अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गेले. ते अवघे १६ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे लहान वयात त्यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. परिणामी अगदी कमी वयात शिक्षण सोडावे लागले. या काळात त्यांनी पुस्तक विकण्यापासून दूध ते पेपर टाकण्यापर्यंत अनेक छोटीमोठी कामे केली.
संघर्षातून यशाकडे
मुंबईतील संघर्षानंतर साजन नोकरीच्या शोधात कुवेतला गेले आणि तिथे त्यांनी बांधकाम साहित्य क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. मात्र, ‘खाडी युद्धा’मुळे त्यांना कुवेतमधून पुन्हा भारतात परतावे लागले. मुंबईत पुन्हा काही काळ संघर्ष केल्यानंतर, १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ते एका मित्राच्या मदतीने दुबईला पोहोचले. त्या काळात दुबईमध्ये पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट क्षेत्राची नुकतीच सुरुवात होत होती. साजन यांनी हार्डवेअर आणि बांधकाम साहित्याचा व्यापार सुरू केला. दुबईतील बांधकाम क्षेत्रातील तेजीमुळे त्यांच्या मालाला मोठी मागणी आली आणि डॅन्यूब ग्रुपचा पाया रचला गेला.
डॅन्यूब ग्रुप आणि व्यवसायाचा विस्तार
डॅन्यूब ग्रुपचे मुख्यालय दुबईत असून, आज या कंपनीचा व्यवसाय मध्य पूर्व, आशिया आणि आफ्रिकेपर्यंत पसरला आहे. एका छोट्या ट्रेडिंग कंपनीपासून सुरू झालेल्या या ग्रुपचे आता अनेक शाखांमध्ये विस्तार झाला आहे. यात डॅन्यूब बिल्डिंग मटेरियल्स, डॅन्यूब होम, मिलानो (सॅनिटरी सोल्यूशन्स ब्रँड) आणि डॅन्यूब प्रॉपर्टीज यांचा समावेश आहे.
दुबईचा १% मॅन का म्हणतात?
दुबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये लक्झरी घर खरेदी करणे फक्त श्रीमंत लोकांनाच शक्य होतं. साजन यांनी ‘१% प्लॅन’ आणून ही समीकरणे बदलली. या योजनेअंतर्गत, मध्यम उत्पन्न गटातील गुंतवणूकदार सुरुवातीचे डाऊन पेमेंट केल्यानंतर दरमहा केवळ १% रक्कम भरून स्वतःचे हक्काचे लक्झरी घर खरेदी करू शकत होते. या एकाच रणनीतीने डॅन्यूब प्रॉपर्टीजला दुबईतील सर्वात वेगाने वाढणारी डेव्हलपर कंपनी बनवले.
रिझवान साजन यांची एकूण संपत्ती
युएई सरकार आणि विविध आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिझवान साजन यांची अंदाजे एकूण संपत्ती २.५ अब्ज डॉलर्स (सुमारे २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त) आहे. त्यांची ही अफाट संपत्ती प्रामुख्याने रिअल इस्टेट डेव्हलपमेंट, आंतरराष्ट्रीय व्यापार, होम डेकोर आणि खाडी देशांमधील पायाभूत सुविधांशी संबंधित मोठ्या प्रकल्पांमधून उभी राहिली आहे.
