India AI Race : भारताच्या प्रगतीत परदेशी गुंतवणूकदारांचा मोठा वाटा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत परदेशी गुंतवणूकदारांनी भारताकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. भारताने १९९० आणि २००० च्या दशकात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती केली असली तरी, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’च्या सध्याच्या युगात भारत मागे पडत असल्याचे विधान आघाडीचे गुंतवणूकदार आणि लेखक रुचिर शर्मा यांनी केले आहे. ते एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या मते, जागतिक गुंतवणूकदार आता ‘एआय’ शर्यतीतील विजेते आणि पराभूत देश शोधत आहेत आणि दुर्दैवाने भारताला या शर्यतीत ‘पराभूत’ मानले जात आहे.

‘एआय’ शर्यतीत भारत मागे का?

रुचिर शर्मा यांनी भारताच्या पिछाडीची काही महत्त्वाची कारणे सांगितली आहेत. भारताने डेटा सेंटर्स आणि एआयसाठी आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यात म्हणावी तशी प्रगती केलेली नाही. सध्याचे तंत्रज्ञान जग हे सेमीकंडक्टर आणि मेमरीवर अवलंबून आहे, जिथे तैवान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेचे वर्चस्व आहे. भारत आपल्या जीडीपीच्या केवळ ०.६% रक्कम संशोधनावर खर्च करतो, त्या तुलनेत कोरिया आणि तैवान सारखे छोटे देश ४-५% खर्च करतात.

परकीय गुंतवणुकीचा ओघ आटला

भारतातील परकीय गुंतवणुकीबाबत शर्मा यांनी अत्यंत धक्कादायक आकडेवारी मांडली आहे. भारताचा एफडीआय कधीही जीडीपीच्या १.५% च्या पुढे गेला नाही, तर चीन आणि व्हिएतनामने त्यांच्या विकास काळात ४% पेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक मिळवण्यात यश मिळवले. गेल्या काही वर्षांत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटी मार्केटमधून सुमारे ५० अब्ज डॉलर्स काढून घेतले आहेत. प्रमुख उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत भारत एफडीआयच्या बाबतीत १२ व्या स्थानावरून १९ व्या स्थानावर घसरला आहे. ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांच्या चिंतेचे कारण काय?

रुचिर शर्मा यांच्या मते, परकीय गुंतवणूकदार भारताकडे दुर्लक्ष करण्यामागे देशातील क्लिष्ट कायदे आणि नियम. शेजारील देशांशी असलेले संबंध आणि अमेरिकेसोबत ताणलेले व्यापारी संबंध. प्रगत तंत्रज्ञानामध्ये भारताची दीर्घकालीन भूमिका काय असेल, याबाबत असलेली साशंकता, ही कारणे आहेत.

शेअर बाजाराची स्थिती काय?

भारतीय शेअर बाजार त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून सुमारे १४.०९% घसरले आहेत. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून मोठी विक्री, कमाईत कमतरता, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव यामुळे बाजारात सुधारणा झाली आहे. इराण-अमेरिका यांच्यातील तणाव असाच सुरू राहिला तर ही आणखी वाढण्याची भिती आहे.