ITR Filing 2026 : मागील अर्थसंकल्पात सरकारने १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. परिणामी कोट्यवधी करदाते कर भरण्याच्या पात्रतेतून बाहेर पडले आहे. अनेक पगारदार व्यक्तींना असे वाटते की, जर त्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल, तर त्यांना प्राप्तिकर परतावा भरण्याची आवश्यकता नाही. तुम्हीही यापैकीच एक असाल तर यामागील तोटे समजून घ्या. कारण, करमुक्त आयटीआर भरण्याच्या फायद्यापासून तुम्हाला वंचित राहावे लागेल.
तुमच्या कष्टाचेच पैसे अडकतील
आपल्या दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी टीडीएस कापला जातो. मग तो पगार असो, बँकेचे व्याज, फिक्स्ड डिपॉझिट किंवा छोटी-मोठी कमाई. जर तुम्ही आयटीआर फाईल केला नाही, तर हा कापलेला टीडीएस तुम्हाला कधीच परत मिळणार नाही. थोडक्यात, तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला कोणताही कर लागू नसला तरी, तुमचा पैसा रिफंडच्या स्वरूपात अडकलेला राहतो.
आयटीआर केवळ रिफंडसाठी नाही!
आयटीआर फाईल करणे म्हणजे केवळ टॅक्स रिफंड मिळवणे किंवा कर भरण्यापुरता मर्यादीत नाही. हे तुमच्या संपूर्ण आर्थिक प्रोफाइलचे अधिकृत रेकॉर्ड असते. आयटीआर तुमच्या उत्पन्नाचा ठोस पुरावा मानला जातो, ज्यामुळे बँक लोन आणि व्हिसा मिळवताना तुमची विश्वासार्हता वाढते. डिजिटल पेमेंटमुळे तुमचे सर्व व्यवहार ट्रॅक केले जातात, त्यामुळे आयटीआर न भरणे भविष्यात अडचणीचे ठरू शकते.
आयटीआर न भरल्याने आर्थिक फटका
लोक विचार करतात की कर भरायचा नाहीये, तर काहीच करण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, जर एफडीवरील वार्षिक व्याज ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल, तर बँक १०% टीडीएस कापते. पॅन कार्ड दिले नसेल तर हा दर २०% पर्यंत जातो. हा जास्तीचा कापलेला कर आयटीआर भरूनच परत मिळवता येतो. वेळेवर आयटीआर न भरल्यामुळे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील तोटा पुढील वर्षांमधील नफ्याशी सेट-ऑफ करण्याचा मोठा फायदा गमावला जातो.
नवीन कर रचना कशी आहे?
- ४ ते ८ लाख : ५% कर.
- ८ ते १२ लाख : १०% कर.
- १२ ते १६ लाख : १५% कर.
- १६ ते २४ लाख : २०% कर.
- २४ लाखांच्या वर : ३०% कर.
- विशेष सवलत : कलम ८७ए (87A) अंतर्गत मिळणाऱ्या रिबेटमुळे १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होऊ शकते. पगारदार व्यक्तींसाठी ७५,००० रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शननंतर ही मर्यादा १२.७५ लाख रुपयांपर्यंत पोहोचते.
जुनी कर रचना का निवडावी
जुन्या कर प्रणालीमध्ये ८०सी, ८०डी यांसारख्या कलमांखाली गुंतवणुकीवर सूट मिळते. तसेच घरभाडे भत्ता आणि रजा प्रवास भत्ता याचाही लाभ घेता येतो. यात २.५ लाखांपर्यंत कर नाही, तर १० लाखांच्या वरील उत्पन्नावर ३०% कर लागतो.
