पीटीआय, नवी दिल्ली
नवी दिल्ली : अपेक्षेपेक्षा चांगली राहिलेली पहिल्या तिमाहीतील आर्थिक कामगिरी आणि मजबूत देशांतर्गत मागणी यामुळे जागतिक बँकेने भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) वाढीचा दर २०२६-२७ आर्थिक वर्षात ७.१ टक्के राहील, असा सुधारित अंदाज मंगळवारी व्यक्त केला. एप्रिलमध्ये व्यक्त केलेल्या ६.६ टक्के अंदाजात तिने अर्धा टक्के (०.५ टक्के) वाढ केली आहे.

जागतिक व्यापार आणि भू-राजकीय पातळीवरील अनिश्चितता कायम असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली. त्यामुळे २०२६-२७ साठीचा विकासदराचा अंदाज ६.६ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्याचे जागतिक बँकेने ‘इंडिया डेव्हलपमेंट अपडेट’ टिपणांत म्हटले आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताचा आर्थिक विकासदर ७.२ टक्क्यांवरून ७.८ टक्क्यांवर पोहोचला. मजबूत गुंतवणूक आणि भक्कम खासगी उपभोगामुळे ही वाढ झाली. अनुकूल धोरणात्मक वातावरण आणि कर्जपुरवठ्याची स्थिती यामुळे व्यापारविषयक तणावाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम काही प्रमाणात ओसरला. मुख्यतः कृषी क्षेत्रातील चांगली कामगिरी, अन्नधान्य अनुदान आणि कमी महागाई यामुळे सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागातील उपभोग शहरी मागणीपेक्षा अधिक होता; तर वर्षाच्या उत्तरार्धात प्राप्तिकरातील सवलत आणि जीएसटी कपातीमुळे शहरी भागातील उपभोग वाढला, असे अहवालात म्हटले आहे. वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीतही जीडीपीमध्ये ७.८ टक्के वाढ नोंदविण्यात आली. ही वाढ अपेक्षेपेक्षा अधिक होती. मात्र, त्यानंतरच्या तिमाहींमध्ये आर्थिक विकासाचा वेग काहीसा कमी होण्याची शक्यता जागतिक बँकेने व्यक्त केली आहे.

खासगी उपभोग हा आर्थिक विकासाचा प्रमुख चालक ठरण्याची शक्यता आहे. मात्र, ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसातील तुटीचा ग्रामीण मागणीवर काहीसा परिणाम होऊ शकतो. त्याचवेळी सरकारी उपभोगातील वाढ मर्यादित राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागातील उपभोगाची वाढ शहरी मागणीपेक्षा अधिक होती.

जागतिक अनिश्चिततेमुळे खासगी गुंतवणुकीवर ताण राहण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आलेल्या आगाऊ गुंतवणुकीचा वेग कमी होणार असला तरी मजबूत सार्वजनिक गुंतवणूक तसेच अनुकूल आर्थिक आणि धोरणात्मक परिस्थितीमुळे त्याची काही प्रमाणात भरपाई होईल. भारताची निर्यात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत असून, एप्रिलमधील अंदाजाच्या तुलनेत २०२६-२७ मधील आर्थिक विकासासाठी निर्यात हा प्रमुख सकारात्मक घटक ठरण्याची शक्यता आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

औद्योगिक क्षेत्राची कामगिरी सरस

जागतिक पातळीवरील आव्हाने असतानाही एप्रिलनंतर औद्योगिक उत्पादनाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आणि ती पुढेही चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील कमकुवत कामगिरीची भरपाई होऊ शकते. पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित वस्तूंच्या उत्पादनवाढीचा वेग पहिल्या तिमाहीत ७.२ टक्क्यांवर पोहोचला. मागील वर्षी याच कालावधीत तो ६.१ टक्के होता. तसेच उन्हाळ्यातील विजेच्या वाढत्या मागणीमुळे वीज क्षेत्राची वाढ पहिल्या तिमाहीत ९.३ टक्के झाली. जुलैनंतर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने मान्सूनमधील तूट काही प्रमाणात भरून निघाली. मात्र, मोसमी पावसाच्या एकूण कमतरतेमुळे कृषी क्षेत्राच्या उत्पादनाबाबतची स्थिती कमकुवत दिसत आहे.