World Bicycle Day 2026 : आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १२ रुपयांपर्यंत मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी इंधनदरात आतापर्यंत ७ रुपयांची मोठी वाढ झाली आहे. या संभाव्य दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे मासिक बजेट आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, आज (३ जून २०२६ ) साजरा केला जाणाऱ्या ‘जागतिक सायकल दिना’चे औचित्य साधून ‘सायकलचे अर्थशास्त्र’ समजून घेणे आवश्यक आहे. एक सर्वसामान्य नोकरदार दुचाकीऐवजी सायकलचा वापर करून महिन्याला किमान ५,००० रुपयांची थेट बचत करू शकतो. यामुळे केवळ पैसेच वाचणार नाही तर आयुर्मानही वाढवण्याची संधी आहे.

सायकल चालवण्याचा दुहेरी फायदा

जर तुमचे ऑफिस किंवा कामाचे ठिकाण घरापासून साधारण ७ ते १० किलोमीटर अंतरावर असेल, तर तुम्ही याचा चांगला फायदा उचलू शकता. समजा तुम्ही रोज २० किलोमीटर दुचाकीने गेलात तर इंधनाचा खर्च रोज अंदाजे ५० ते ६० रुपये येऊ शकतो. म्हणजे महिन्याला सुमारे १५०० ते १८०० रुपये खर्च करावे लागतील. यात प्रतिमहा ५०० ते ८०० रुपये देखभाल खर्च गृहीत धरला. आता दुचाकीने जाता म्हटलं तर व्यायाम होत नाही, अशा परिस्थितीत फिटनेसचा खर्च दरमहा १५०० ते २५०० रुपये येईल. आता एकूण गणित केलं तर दुचाकीने ऑफिसला जाण्यासाठी तुम्हाला ४००० ते ५००० रुपये खर्च येऊ शकतो. दुसरीकडे सायकल चालवण्यासाठी दरमहा डोक्यावरुन पाणी गेलं तरी १०० रुपयांच्या पुढे खर्च येणार नाही. शिवाय नियमित सायकल चालवण्यामुळे आरोग्यासाठी वेगळी मेहनत किंवा जिमला वेळ आणि पैसे खर्च करण्याची गरज लागणार नाही.

वर्षात घेऊ शकता आयफोन

जर तुम्ही ऑफिससाठी साध्या किंवा गियर सायकलचा वापर सुरू केला, तर पेट्रोल, गाडीचा मेंटेनन्स आणि जिमची फी वाचवून तुम्ही दरमहा किमान ५,००० रुपयांची थेट बचत करू शकता. वार्षिक विचार केला तर ही बचत ६०,००० रुपयांच्या घरात जाते, जी एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मोठी रक्कम आहे. याचा अर्थ तुम्ही वर्षात तुमच्या बजेटमधील आयफोन घेण्याचं स्वप्न सहज घेऊ शकता.

‘ई-सायकल’ ठरतेय गेम चेंजर

ज्यांना रोज १५-२० किलोमीटर सायकल चालवणे शारीरिकदृष्ट्या कठीण वाटते, त्यांच्यासाठी आता बाजारात ‘ई-सायकल’चा पर्याय उपलब्ध आहे. ई-सायकल एकदा पूर्ण चार्ज करण्यासाठी १ युनिटपेक्षाही कमी वीज लागते. (खर्च फक्त ७ ते १० रुपये) अशा सायकल ३० ते ५० किलोमीटर सहज धावते. जरी ई-सायकल खरेदीचा सुरुवातीचा खर्च २५,००० ते ४५,००० रुपयांपर्यंत असला, तरी पुढील ६ ते ८ महिन्यांत पेट्रोलच्या बचतीतून हा सर्व खर्च वसूल होतो.

तुमच्या सायकल चालवण्याने देशाची कशी होतेय बचत?

भारत आपल्या एकूण गरजेच्या ८० टक्के कच्चे तेल आयात करतो. सध्या युद्धाचा भडका उडाल्याने कच्च्या तेलाचे दर दुपटीने वाढले आहेत. परिणामी भारताचे आयात बिलात अवाढव्य वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर परकीय गंगाजळी वाचवण्यासाठी सरकारने सोन्यावरील आयात कर वाढवला आहे. लोकांना इंधन बचतीचे आवाहन केलं आहे. अशा परिस्थित सायकल चालवून देशाच्या विकासात हातभार लावण्याची ही मोठी संधी आहे. जर देशातील शहरी भागातील केवळ १० ते १५ टक्के नोकरदार वर्गाने कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर केला तर देशाचे आयात बिल हजारो कोटी रुपयांनी कमी होऊ शकते.

किती हजार रुपयांची सायकल तुमच्यासाठी योग्य?

खरंतर बाजारात ५००० रुपयांपासून लाखांपर्यंत सायकल उपलब्ध आहे. तर दुसरीकडे ई सायकलही तुम्हालाही २५ ते ५० हजारपर्यंत मिळून जाईल. हा निर्णय तुमच्या बजेट आणि अंतरावरुन घेऊ शकता. म्हणजे तुमचे ऑफिस १० किलोमीटरपेक्षा दूर असेल तर ई सायकल हा पर्याय चांगला आहे. तसेच ऑफिसचा रोड जास्त चढउताराचा असल्यास ई सायकल सोयिस्कर ठरू शकते. जर रस्ता समतल असेल तर साधी सायकल तुमच्यासाठी बेस्ट आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही सायकल खरेदी करू शकता. तुम्हाला जिथे योग्य किंमत मिळेल तिथून घेऊ शकता.