vertical storytelling micro drama marathi : गेल्या काही वर्षात स्वस्त इंटरनेट, बदलते तंत्रज्ञान आणि लोकांच्या आवडीनिवडीमुळे मोबाईलवर व्हिडीओ किंवा कंटेट पाहण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. भविष्यात मोबाईल स्क्रीन टीव्ही किंवा मोठ्या पडद्याची जागा घेणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काळाची हीच बदलती पाऊले पाहून आता बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या यशराज फिल्म्सने आता थेट मोबाईल स्क्रीनच्या विश्वात मोठी एन्ट्री केली आहे. वायआरएफने डिजिटल-फर्स्ट एंटरटेनमेंट कंपनी ‘रस्क मीडिया’मध्ये आपली पहिली धोरणात्मक गुंतवणूक केली आहे.
काय आहे ‘व्हर्टिकल स्टोरीटेलिंग’?
‘व्हर्टिकल स्टोरीटेलिंग’ किंवा ‘मोबाईल-फर्स्ट व्हिडिओ’ हे विशेषतः स्मार्टफोनवर ‘पोर्ट्रेट मोड’ (उभा मोबाईल धरून) मध्ये पाहण्यासाठी डिझाइन केलेले असतात. आजचा तरुण वर्ग ज्याप्रमाणे रील्स किंवा यूट्यूब शॉट्स पाहतो, त्याच धर्तीवर आता दर्जेदार वेब सिरीज आणि मनोरंजक कथा उभ्या स्क्रीनवर पाहता येणार आहेत. काही दिवसांपूर्वी जिओ हॉटस्टारवर हा प्रयोग पाहायला मिळाला होता. यामध्ये १ मिनिट ते ३ मिनिटांचे भाग असतात. जे रिल्सप्रमाणे पाहता येतात.
या भागीदारीअंतर्गत, वायआरएफ आणि रस्क मिळून मूळ अॅनिमेशन आणि ‘व्हर्टिकल मायक्रो-ड्रामा’ची निर्मिती करणार आहेत. हे कन्टेंट ‘ऑलराईट! टीव्ही’ आणि इतर जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जातील.
चित्रपटगृहांचे दिवस संपले का? वाईआरएफचे उत्तर
मोबाईल कंटेंटवर भर दिला जात असल्यामुळे, ‘थिएटर्सचे दिवस आता संपले का?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, यशराज फिल्म्सने यावर स्पष्ट नकार दिला आहे. वायआरएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय विधानी यांनी सांगितले की, “चित्रपटगृहातील भव्य अनुभव हा नेहमीच वायआरएफचा आत्मा राहील. ही भागीदारी आमच्या मूळ दृष्टीकोनापासून दूर जाणारी नाही, तर त्याचाच एक नैसर्गिक विस्तार आहे.” ते पुढे म्हणाले की, प्रेक्षकांच्या बदलत्या सवयींमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. स्मार्टफोनवर कंटेंट पाहणाऱ्यांची संख्या अफाट वाढली आहे, त्यामुळे या क्षेत्रात उतरण्यासाठी हीच सर्वात योग्य वेळ आहे.
जुन्या चित्रपटांचा वापर नाही, नवीन कंटेंट असणार
वायआरएफ आपल्या ‘धूम’, ‘टायगर’ किंवा ‘स्पाय युनिव्हर्स’ सारख्या सध्याच्या प्रसिद्ध चित्रपट फ्रँचायझींना मोबाईल फॉरमॅटमध्ये आणणार नाही. त्याऐवजी, रस्क मीडियासोबत मिळून पूर्णपणे नवीन आणि स्वतंत्र कथा तयार केल्या जातील.
रस्क मीडियाचे सह-संस्थापक आणि सीईओ मयंक यादव यांनी सांगितले की, “भारतात व्हर्टिकल एंटरटेनमेंट बाजारपेठ खूप विस्तारत आहे, परंतु या क्षेत्रात अजूनही ‘दीर्घकाळ टिकणारे ब्रँड्स किंवा फ्रँचायझी’ तयार झालेल्या नाहीत. वायआरएफ आणि रस्क मीडिया मिळून बाजारातील हीच पोकळी भरून काढणार आहेत.” इकॉनॉमिक्स टाईम्सने हा रिपोर्ट दिला असून या संदर्भात अद्याप आर्थिक व्यवहार जाहीर झालेला नाही.
