मुंबई : अवघ्या काही मिनिटांत वस्तू घरी पोहोच करणारी अर्थात ‘क्विक कॉमर्स’ कंपनी असलेल्या ‘झेप्टो’ला भांडवली बाजार नियामक सेबीने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) मंजुरी दिली. यामुळे कंपनीसाठी भारतीय शेअर बाजारांमध्ये सूचिबद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती या घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘झेप्टो’ आयपीओच्या माध्यमातून सुमारे ७,५०० कोटी ते ९,३०० कोटी रुपयांचा ( १ अब्ज डॉलरपर्यंत) निधी उभारू इच्छित आहे. आगामी ६० ते ९० दिवसांच्या कालावधीत शेअर बाजारात समभाग सूचिबद्ध करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. वर्ष २०२० मध्ये ‘झेप्टो’ची स्थापना झाली होती. कंपनी किराणा सामान आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू अवघ्या १० मिनिटांत घरपोच पोहोचवण्यासाठी ओळखली जाते. तिची भारतीय बाजारपेठेत मुख्यतः ब्लिंकिट स्विगी इन्स्टामार्टशी स्पर्धा आहे.
कंपनी काय करते?
कंपनी किराणा सामान आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू अवघ्या १० मिनिटांत घरपोच पोहोचवण्यासाठी ओळखली जाते. कंपनीची २०२० मध्ये स्थापना झाली. आदित पालिचा आणि कैवल्य वोहरा हे संस्थापक असून या दोघांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील शिक्षण सोडून (Dropout) वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी या व्यवसायाची सुरुवात केली.
झेप्टो ‘डार्क स्टोअर्स’ (Dark Stores) या संकल्पनेवर काम करते. हे छोटे गोदाम किंवा मिनी-वेअरहाऊस असतात, जे शहराच्या ठराविक भागात वसलेले असतात. जेव्हा तुम्ही ऑर्डर देता, तेव्हा जवळच्या डार्क स्टोअरमधून वस्तू पॅक करून १० मिनिटांच्या आत तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. १०-१५ मिनिटांत सेवा देण्याचे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते. अगदी भाजीपाला, फळे, दूध, तांदूळ, डाळींपासून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि वैयक्तिक गरजांच्या वस्तूंपर्यंत हजारो उत्पादने येथे उपलब्ध असतात.
स्पर्धा: भारतीय बाजारपेठेत त्यांची मुख्य स्पर्धा Blinkit (ब्लिंकिट) आणि Swiggy Instamart (स्विगी इन्स्टामार्ट) यांच्याशी आहे. झेप्टो ही भारताच्या इतिहासातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ‘युनिकॉर्न’ (Unicorn) कंपन्यांपैकी एक आहे.
