Nithin Kamath Climate Change : यंदाचा उन्हाळा सरासरीपेक्षा उष्ण असून सकाळी ९ वाजता बाहेर पडले तरी उन्हाचे चटके बसत आहे. मात्र, हे वाढते तापमान ही आता केवळ एक पर्यावरणीय समस्या राहिलेली नसून, ती देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठे संकट बनत चालले आहे. जागतिक पातळीवर हवामान बदलाबाबत तातडीने पावले उचलली गेली नाहीत, तर याचा सर्वात मोठा आणि भयानक फटका भारतातील गरीब नागरिकांना बसेल, असा इशारा देशातील आघाडीची ब्रोकरेज कंपनी ‘झिरोधा’चे संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी दिला आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी भारतातील वाढत्या तापमानाच्या दीर्घकालीन ट्रेंडवर चिंता व्यक्त केली आहे. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या वाढत्या संख्येवरून याचे गंभीर परिणाम आता उघडपणे दिसू लागल्याचे स्पष्ट केले आहे.

उष्माघातामुळे किती जीव गेले? याची आकडेवारी उपलब्ध नाही

नितीन कामथ यांच्या मते, वर्षानुवर्षे भारताचे तापमान सातत्याने वाढत चालले आहे. जोपर्यंत संपूर्ण मानवता यावर काही ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत हा प्रवास अत्यंत घातक ठरणार आहे. सध्या प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या उष्माघाताच्या बातम्या या सातत्याने होणाऱ्या हवामान बदलाचाच परिणाम आहेत. विविध अभ्यास आणि अहवालांमधून या समस्येची भीषणता समोर येत असली, तरी भारतात उष्माघातामुळे नेमके किती नागरिकांनी आपले प्राण गमावले, याची अचूक आकडेवारी आणि ठोस आकडेवारी अजूनही उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.

उष्णतेमधील असमानता

वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम गरीबांना भोगावा लागत असल्याचे कामथ यांनी नोंदवले. यासाठी त्यांनी ‘उष्णतेमधील असमानता’ हा महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. भारतात अजूनही बहुतांश रोजगार हा असंघटीत क्षेत्रातील आहे. देशातील एक मोठी लोकसंख्या शेती, बांधकाम क्षेत्र, गिग इकॉनॉमी आणि इतर बाहेरील कष्टाच्या कामांमध्ये गुंतलेली आहे. अशा अत्यंत प्रतिकूल आणि उष्ण हवामानात या कामगारांना काम थांबवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे श्रीमंत किंवा चांगल्या उत्पन्नाचे गट घरात बसून एसी किंवा कुलरचा आनंद घेऊ शकतात आणि दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळू शकतात. मात्र, घरात बसणारी लोकसंख्या मर्यादीत असून, खरा संघर्ष उन्हात राबणाऱ्या सर्वसामान्यांचा आहे.

जागतिक पातळीवर काम होण्याची गरज

भारताच्या एकूण सकल देशांतर्गत उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा कमी आहे, पण आजही देशातील ४० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या रोजगारासाठी शेतीवरच अवलंबून आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता आणि विशेषतः उत्तर भारतातील गरीब प्रदेश ‘एल निनो’ आणि तीव्र उष्माघातासारख्या हवामानाच्या तीव्रतेचे सर्वाधिक बळी पडत आहेत. हा हवामान बदल म्हणजे एक पद्धतशीर संकट असून यासाठी जागतिक पातळीवर काम करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू असतानाच, स्थानिक पातळीवरही विशेषतः शहरांमध्ये झाडांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे, जी चिंतेची बाब आहे.

एकत्र येत काम करण्याची गरज : नितीन कामथ

या संकटावर मात करण्यासाठी कामथ यांनी वैयक्तिक पातळीवर देशी झाडे जसे कडुनिंब, शेवगा, जांभूळ, आवळा आणि कढीपत्ता लावण्याचे आवाहन केले आहे. कारण ही झाडे खोल मुळांमुळे अत्यंत प्रतिकूल हवामानातही टिकून राहतात. पण, हे जागतिक संकट असून एकट्यादुकट्याचे काम नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. तापमानवाढ हे एक असे आव्हान आहे, ज्यावर तात्काळ उपाय नाही. देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग टिकवून ठेवण्यासाठी आणि मानवी संसाधनांचे रक्षण करण्यासाठी आता राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर सामूहिक कृतीची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केलं.