Zerodha Instant Withdrawal Limit Increased 5 Lakh Nithin Kamath: झिरोधाने इन्स्टंट विड्रॉवलची दैनंदिन मर्यादा २ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. यामुळे ग्राहक त्यांच्या ट्रेडिंग खात्यातील न वापरलेली मोठी रक्कम त्यांच्या लिंक केलेल्या बँक खात्यात हस्तांतरित करू शकतील. तसेच या सुविधेच्या वेळेत सकाळी ९ ते संध्याकाळी ६ असा बदल केला आहे. यात शनिवार-रविवार आणि बाजाराच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. या बदलांचा उद्देश गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे त्यांना जेव्हा हवे तेव्हा मिळावेत हा आहे. तसेच ही इन्स्टंट विड्रॉवल सुविधा यापुढेही मोफत उपलब्ध असणार आहे.
झिरोधाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामथ यांनी ३ नोव्हेंबर रोजी ‘एक्स’वरील एका पोस्टद्वारे या बदलांची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, २०२४ मध्ये ‘इन्स्टंट पेआउट’ सुविधा सुरू केल्यापासून, ब्रोकरेज प्लॅटफॉर्मद्वारे जवळपास १ लाख कोटी रुपयांचे व्यवहार पूर्ण करण्यात आले आहेत.
“आम्ही आमची इन्स्टंट विड्रॉवलची मर्यादा २ लाख रुपयांवरून वाढवून ५ लाख रुपये केली आहे. ही सुविधा आता सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत उपलब्ध आहे, ज्यामध्ये शनिवार-रविवार आणि बाजाराच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. २०२४ पासून, आम्ही जवळपास १ लाख कोटींची रक्कम इन्स्टंट पेआउटद्वारे वितरित केली आहे आणि ती पूर्णपणे मोफत आहे”, असे कामथ यांनी सांगितले.
या नव्या मर्यादेमुळे, ग्राहक आता दररोज एका इन्स्टंट विड्रॉवल विनंतीद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात. पूर्वी ही मर्यादा २ लाख रुपये इतकी होती.
झिरोधाची इन्स्टंट विथड्रॉवल सुविधा काय आहे?
झिरोधाच्या इन्स्टंट विथड्रॉवल सुविधेमुळे ग्राहक नियमित विथड्रॉवल प्रक्रियेची वाट न पाहता त्यांच्या ट्रेडिंग खात्यातून त्यांच्या बँक खात्यात निधी हस्तांतरित करू शकतात. ही सुविधा विनामूल्य आहे आणि ग्राहकांना एका दिवसात १०० ते ५ लाख रुपये काढण्याची परवानगी आहे. पण, युजर्स दररोज फक्त एकच इन्स्टंट विथड्रॉवलची विनंती करू शकतात. या सुविधेला काही अटी लागू आहेत. ग्राहक त्यांच्या ट्रेडिंग खात्यात जमा केलेला निधी त्याच दिवशी काढू शकत नाहीत.
