Zomato Analogue Dairy Ban: ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने सोमवारी आपल्या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध असलेल्या रेस्टॉरंट्सकडून ॲनालॉग चीज, पनीर किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांसारख्या ॲनालॉग पदार्थांच्या विक्रीवर ‘झिरो-टॉलेरन्स’ धोरण जाहीर केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या रेस्टॉरंट्सना झोमॅटोवरून काढून टाकण्याचा अधिकार आपवल्याकडे असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
ॲनालॉग पदार्थांमध्ये नैसर्गिक घटकांऐवजी स्वस्त किंवा पर्यायी घटक जसे की खऱ्या दुधाऐवजी किंवा चीजऐवजी वनस्पती तेल वापरले जातात, पण ते दिसायला आणि चवीला मात्र मूळ पदार्थांसारखेच असते.
महाराष्ट्रात तुकारम मुंढे यांच्या नेतृत्त्वाखालील अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर केलेल्या धडक कारवाईनंतर आणि दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) केलेल्या तपासणीनंतर अन्न सुरक्षेवर नव्याने लक्ष केंद्रित केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर झोमॅटोकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
झोमॅटोने सांगितले की, ज्या रेस्टॉरंट्सनी आपल्या पदार्थांमध्ये ‘ॲनालॉग डेअरी’ असल्याचे जाहीर केले आहे, त्यांचे संबंधित पदार्थ प्लॅटफॉर्मवरून त्वरित काढून टाकण्यात आले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या रेस्टॉरंट्सना प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले जाईल, असे झोमॅटोने म्हटले आहे.
सोमवारी प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध असलेल्या रेस्टॉरंट्ससाठी जाहीर केलेल्या निवेदनात झोमॅटोने म्हटले आहे, “ग्राहकांना सुरक्षित आणि उच्च गुणवत्ता असलेले अन्न मिळावे, हे निश्चित करणे आमचे प्राधान्य आहे. त्यानुसार, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर बनावट चीज, बनावट पनीर आणि इतर बनावट दुग्धजन्य पदार्थ असलेल्या खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यावर ‘झिरो-टॉलेरन्स’ धोरण लागू करत आहोत”.
अन्न सुरक्षा आणि नियामक आवश्यकतांनुसार, आपल्या ग्राहकांसाठी पारदर्शकता आणि अन्नाची गुणवत्ता सर्वोत्तम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे झोमॅटोने म्हटले आहे.
राज्यात अनलॉग पनीरवर बंदी
राज्यात पनीरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या अनलॉग किंवा दुग्धेतर पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर राज्य सरकारने एक वर्षासाठी बंदी घातली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या महिन्यांच्या सुरुवातीला यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. राज्यभरातील तपासणीत पनीरचे ३५.४ टक्के नमुने विहित मानकांशी विसंगत आढळल्याने आणि अनेक नमुन्यांमध्ये दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पतीजन्य स्निग्धांशाचा वापर झाल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दुधातील फॅट्स किंवा इतर घटक काढून, त्याऐवजी वनस्पतीजन्य तेल, डालडा किंवा इतर दुधाव्यतिरिक्तच्या वस्तू वापरून बनवलेल्या पदार्थाला ॲनालॉग पनीर म्हटले जाते.
