Zudio expansion tier 2 tier 3 cities and corporate announcements: झुडिओ या फॅशन ब्रँडची पालक कंपनी असलेल्या ट्रेंट लिमिटेडने फॅशन आणि किरकोळ खाद्यपदार्थ विक्री क्षेत्रात आपला विस्तार करण्याच्या योजना जाहीर केल्या. यामध्ये प्रामुख्याने टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये प्रवेश, स्टार फूड आणि ग्रोसरी व्यवसायाचा विस्तार करणे आणि लाइफस्टाईल ब्रँड्स अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे.
३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीच्या निकालांवर भाष्य करताना टाटा समूहातील ट्रेंट कंपनीचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी सांगितले की, भारतीय ब्रँड्सचा महत्त्वाचा निर्यातदार म्हणून उदयास येण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. टाटा म्हणाले, “भविष्याचा विचार करता आम्ही आमचा विस्तार सुरू ठेवणार आहोत. आमचा मुख्य भर व्यवसायाचा आवाका वाढवण्यावर आणि विविध बाजारपेठांमध्ये आमची स्थिती अधिक मजबूत करण्यावर असेल.” त्यांनी असेही नमूद केले की, खाद्यपदार्थ आणि किराणा क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध आहे आणि स्टारकडे एक वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण व्यावसायिक मॉडेल आहे.
ट्रेंट सातत्याने विविध बाजारपेठांमध्ये आपला विस्तार करत आहे. यामध्ये टियर २ आणि टियर ३ शहरांचाही समावेश आहे. या ठिकाणी कंपनीच्या ब्रँड्सना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीला असे वाटते की, यामुळे देशांतर्गत अधिक दुर्गम किंवा अंतर्गत बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याची संधी निर्माण झाली आहे.
टाटा म्हणाले, “आम्ही टियर २ आणि टियर ३ शहरांसह विविध बाजारपेठांमध्ये आमची उपस्थिती सातत्याने वाढवत आहोत. आम्हाला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहता, देशांतर्गत अधिक दुर्गम भागांमध्ये आमचा विस्तार अधिक वेगाने वाढवण्याचा आम्हाला विश्वास आहे.”
ट्रेंट लिमिटेड ही कंपनी झुडिओ, वेस्टसाइड आणि इतर लाइफस्टाईल ब्रँड्स चालवते. कंपनीच्या फॅशन रिटेल स्टोअर्सचे जाळे ३३९ शहरांमध्ये पसरलेले आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिरातीमधील तीन शहरांचाही समावेश आहे.
९८६ कोटी रुपये नफा
ट्रेंटने आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत ५८७३ कोटी रुपयांचा एकत्रित महसूल नोंदवला आहे. जो वार्षिक आधारावर २२ टक्क्यांनी अधिक आहे. ऑपरेटिंग EBITDA ३७ टक्क्यांनी वाढून ७८५ कोटी रुपयांवर पोहोचला, तर करपश्चात नफा २५ टक्क्यांच्या वाढीसह ४६८ कोटी रुपये झाला आहे.
आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीसाठी एकत्रित महसूल २० टक्क्यांनी वाढून ११६२८ कोटी रुपये झाला. ऑपरेटिंग EBITDA ३५ टक्क्यांनी वाढून १६३३ कोटी रुपयांवर पोहोचला, तर करपश्चात नफा २४ टक्क्यांच्या वाढीसह ९८६ कोटी रुपये झाला.
