मुंबई : चाळीशीच्या आतील प्रभावशाली तरुण उद्योजकांमध्ये झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांचे नाव आघाडीवर असून, देशातील शेअर दलाली पेढी व्यवसायात मोठे परिवर्तन घडवण्यासह, देशातील पहिल्या पिढीचे आणि स्वबळावर व्यवसाय सुरू केलेले अग्रणी नवउद्यमी संस्थापक म्हणून त्यांचे नाव उदयास आले आहे.
बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘ॲव्हेंडस वेल्थ-हुरुन इंडिया अंडर फोर्टी’ या यादीनुसार, ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल, हे देशातील सर्वात तरुण आणि जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या नवउद्यमी संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उपस्थिती असलेले आतिथ्य मंच उपलब्ध करून दिले.
चाळीशीच्या आतील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांच्या गटात अक्षय्य ऊर्जा आणि शाश्वतता क्षेत्रातील अनेक वेगाने प्रगती करणाऱ्या संस्थापकांचाही समावेश आहे, जे अक्षय्य ऊर्जा केंद्रित व्यवसायांचे वाढते महत्त्व दर्शवतात. एक्सपोनेंट एनर्जीचे संजय ब्यालाल जगन्नाथ आणि सोलारस्क्वेअरच्या श्रेया मिश्रा यांसारख्या उद्योजकांनी सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण केला. ही क्षेत्रे भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी महत्त्वपूर्ण मानली जातात. नावीन्यपूर्णता आता पारंपरिक तंत्रज्ञान आणि ग्राहक इंटरनेट व्यवसायांच्या पलीकडे विस्तारत असल्याचे चित्र यातून प्रस्तुत होते.
प्रस्थापित व्यावसायिक घराण्यांचे प्रतिनिधित्व आता पुढील पिढीचे युवा करत आहेत, जे पारंपरिक उद्योगांचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यात सक्रिय भूमिका बजावत आहेत. सारेगामा इंडियाच्या अवर्णा जैन हे या यादीतील उल्लेखनीय नाव आहे. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या संगीत आणि मनोरंजन कंपन्यांपैकी एका कंपनीचे यशस्वी डिजिटल रूपांतरण केले. विशेषतः स्ट्रीमिंग युगात बौद्धिक संपदेचा लाभ घेतल्याबद्दल त्या ओळखल्या जातात.
हुरुन इंडियाच्या मते, चाळीशीच्या आतील प्रभावशाली उद्योजकांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांचे एकत्रितपणे मूल्य ८३ लाख कोटींच्या घरात असून त्यायोगे दहा लाखांहून अधिक लोकांना रोजगार दिला जातो. यामध्ये रिलायन्स उद्योग समूहाचा भाग असलेल्या ईशा अंबानींच्या कंपनीकडून सर्वाधिक रोजगार दिला जात आहे.
शहर चाळीशीच्या आतील उद्योजक आकडेवारी काय सांगते?
बंगळुरू ४८
मुंबई ४३
गुरुग्राम २४
नवी दिल्ली १९
हैदराबाद ८
अहमदाबाद ६
चेन्नई ५
कोलकाता ४
