नवी दिल्ली : भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात एक मोठी क्रांती घडणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) नवीन प्रोटोकॉल अंतर्गत, आता ‘अ‍ॅजेंटिक एआय’द्वारे ( कृत्रिम प्रज्ञा- एजंट) यूपीआय व्यवहार करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

सध्याच्या डिजिटल युगात एआय केवळ वस्तू शोधण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी वापरला जातो, परंतु पेमेंट करताना माणसाची (Human OTP/PIN) गरज भासते. आता हा अडथळा दूर होणार असून एआय स्वतःहून व्यवहार पूर्ण करू शकणार आहे.

‘अ‍ॅजेंटिक एआय’ पेमेंट म्हणजे काय?

साध्या शब्दांत सांगायचे तर, तुम्ही तुमच्या एआय असिस्टंटला (उदा. ChatGPT किंवा इतर एआय चॅटबॉट) एखादी वस्तू खरेदी करण्याची आज्ञा दिली, तर तो स्वतःच इंटरनेटवर ती वस्तू शोधेल, किमतीची तुलना करेल, योग्य डील निवडेल आणि तुमच्या वतीने स्वतःच यूपीआय पेमेंट करून व्यवहार पूर्ण करेल. या संपूर्ण प्रक्रियेत तुम्हाला प्रत्येक वेळी तुमचा यूपीआय पिन टाकण्याची किंवा ओटीपी देण्याची गरज भासणार नाही. नुकतेच ‘पाइन लॅब्स’ आणि ‘रेझरपे’ यांसारख्या आघाडीच्या फिनटेक कंपन्यांनी एनपीसीआयच्या सहकार्याने या दिशेने पावले टाकली असून ‘P3P’सारखे प्रोटोकॉल विकसित केले आहेत.

हे कसे काम करेल?

सुरक्षेचा विचार करून हे तंत्रज्ञान पूर्णपणे ‘युझरच्या नियंत्रणात’ ठेवण्यात आले आहे:
वन-टाइम मँडेट : ग्राहकाला सुरुवातीला एआय एजंटला एक वेळची मंजुरी द्यावी लागेल.
खर्चाची मर्यादा : युझर एआयसाठी कमाल मासिक किंवा प्रति-व्यवहार मर्यादा सेट करू शकतो. (उदा. महिन्याला ५,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहार नको).
अधिकार काढण्याची सुविधा: युझर कधीही हे मँडेट रद्द करू शकतो, ज्यामुळे एआयचे पेमेंट अधिकार संपुष्टात येतील.

एनपीसीआयचे नियम आणि मर्यादा

सुरक्षिततेसाठी एनपीसीआयने ‘यूपीआय सर्कल’ आणि आयओटी फ्रेमवर्क अंतर्गत कडक नियम लागू केले आहेत:

मर्यादा: प्रति-व्यवहार कमाल ५,००० आणि मासिक मर्यादा १५,००० असेल.

कूलिंग पिरियड: नवीन एआय एजंट किंवा डिव्हाइस लिंक केल्यानंतर पहिल्या २४ तासांत केवळ २,००० पर्यंतचे व्यवहार करता येतील.
मक्तेदारीला आळा: हे तंत्रज्ञान केवळ घरगुती पर्सन-टू-मर्चंट म्हणजेच व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठीच वापरता येईल. पीअर-टू-पीअर म्हणजेच मित्रांना पैसे पाठवण्यासाठी याचा वापर करता येणार नाही.

याचा थेट फायदा कुठे होणार?

स्मार्ट सेव्हिंग्ज : ग्राहक एआयला आदेश देऊ शकतात की, “सोन्याचे दर किंवा शेअर्स अमूक एका पातळीवर घसरल्यास माझ्यासाठी खरेदी कर.” एआय २४ तास बाजारावर लक्ष ठेवून योग्य वेळी स्वतः पेमेंट करून खरेदी करेल.
अॅटोमॅटिक खरेदी : एखादा मोठा सेल सुरू झाल्यावर सेकंदाच्या आत वस्तू बुक करून पेमेंट करण्यासाठी एआय मदत करेल.
स्मार्ट उपकरणांद्वारे पेमेंट: भविष्यात तुमच्या कनेक्टेड कार, स्मार्ट टीव्ही किंवा एआय चॅटबॉट्स याद्वारे स्वयंचलित पेमेंट करणे शक्य होईल.

५. बँकांसाठीही ‘एआय टू एआय’ प्रणाली

या ग्राहक सेवांव्यतिरिक्त, एनपीसीआय स्वतः बँकांमधील तांत्रिक आणि नियमन प्रक्रिया वेगवान करण्यासाठी ‘एआय एजंट्स’ चा वापर करत आहे. सध्या बँकेला यूपीआयचे नवीन नियम लागू करण्यासाठी ४ ते ८ आठवडे लागतात, परंतु ‘अॅजेंटिक एआय’मुळे हा वेळ अवघ्या ७ ते १० दिवसांवर येणार आहे. यासाठी एनपीसीआयने ‘फिमी’ नावाचे स्वतःचे लँग्वेज मॉडेलही विकसित केले आहे.

भारत आता केवळ डिजिटल पेमेंटमध्येच नाही, तर एआय आधारित अर्थव्यवस्थेतही जगाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज होत आहे. सुरक्षेचे संपूर्ण नियम पाळून लवकरच ‘मशीन टू मशीन’ पेमेंट आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनेल.