मुंबई: भारताला डिजिटल देयक क्षेत्रात जागतिक महासत्ता बनवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘एनपीसीआय’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे यांची जागतिक स्तरावर सीमापार आर्थिक व्यवहाराचे प्रतिष्ठित जाळे मानल्या जाणाऱ्या ‘सोसायटी फॉर वर्ल्डवाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन’ अर्थात ‘स्विफ्ट’च्या जागतिक पर्यवेक्षक मंडळावर नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे आता जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय देयक धोरणांमध्ये आसबे यांचा ठसा उमटणार असून, ‘यूपीआय’च्या यशाची घेतली गेलेली ही जागतिक दखल मानली जात आहे.
जगभरातील बँकिंग आणि आर्थिक व्यवहारांचा कणा असलेल्या ‘स्विफ्ट’वर प्रामुख्याने पाश्चिमात्य मध्यवर्ती बँकांचा वरचष्मा राहिला आहे. तिच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी आसबे यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व आवश्यक नियामक मंजुऱ्या मिळाल्यानंतर ते अधिकृतपणे हा मानाचा पदभार स्वीकारतील.
निर्णायक मंडळात भारताला थेट जागा ‘स्विफ्ट’ ही जगभरातील आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांसाठी संदेश जाळे (मेसेजिंग नेटवर्क) चालवणारी मुख्य संस्था आहे. या संस्थेच्या संरचनेत सध्या मोठे बदल होत असून, दोन स्तरांची नवी प्रशासकीय यंत्रणा तयार केली जात आहे. या अंतर्गत स्थापन होणाऱ्या १२ सदस्यांच्या नव्या जागतिक पर्यवेक्षक मंडळामध्ये आसबे यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेसह युरोपीय देशांचे वर्चस्व असलेल्या या जागतिक मंचावर आता भारताला एक निर्णायक आणि महत्त्वपूर्ण स्थान मिळाले आहे.
हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून भारताच्या डिजिटल देयक व्यवस्थेचा जागतिक पातळीवर झालेला मोठा गौरव आहे, अशी बँकिंग क्षेत्रातील जाणकारांची प्रतिक्रिया आहे. ‘स्विफ्ट’ या संस्थेवर प्रामुख्याने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि जपान यांसारख्या ‘जी-१०’ देशांच्या मध्यवर्ती बँकांचे नियंत्रण आहे. आता या शक्तिशाली समूहाच्या मुख्य निर्णय प्रक्रियेत आसबे यांच्या रूपाने भारताचा समावेश झाल्यामुळे, आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर सीमापार व्यवहारांमध्ये भारताचा प्रभाव ठळकपणे दिसून येणे अपेक्षित आहे.
भारताच्या ‘यूपीआय’ सामर्थ्यांला सलामदिलीप आसबे यांनी २०१८ पासून ‘एनपीसीआय’चे नेतृत्व करताना भारतात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय), रुपे, आयएमपीएस आणि फास्टॅग सारख्या क्रांतीकारी व्यासपीठांची यशस्वी उभारणी केली आहे. आज त्यामुळे भारतात दरमहा २० अब्जाहून अधिक डिजिटल व्यवहार पार पडत आहेत.
‘एनपीसीआय’च्या उपकंपन्यांच्या माध्यमातून भारताचे ‘यूपीआय’ तंत्रज्ञान आता अनेक देशांमध्ये कार्यान्वित झाले आहे.मंडळातील अन्य दिग्गजमनीष कोहली (पेमेंट सोल्युशन्सचे जागतिक प्रमुख, एचएसबीसी)आर्थर ॲम्ब्रोस (सेवा परिचालनाचे जागतिक प्रमुख, सिटी), पॅट्रिक कोले (अध्यक्ष, बीएनपी पारिबा)मार्क मोनेको (जागतिक प्रमुख, बँक ऑफ अमेरिका) अशा जागतिक बँकिंग क्षेत्रातील दिग्गज दिग्गजांच्या पंक्तीत आसबे यांचा समावेश झाला आहे.
