नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय प्रणालीद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारावर मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) शुल्क लागू केले आहे. या शुल्कावरून मोठा गदारोळ उडाला असून त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मात्र हे शुल्क नेमके कशा पद्धतीने आकारले जाणारे याबाबत ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ‘एनपीसीआय’ने नेमके बदल काय होणार हे आता स्पष्ट केले आहे.

‘एनपीसीआय’ने म्हटले आहे की , ‘यूपीआय’द्वारे होणाऱ्या व्यवहारांवर एमडीआर शुल्क आकारणी लागू करण्यात आली आहे. यासाठी ग्राहकांसह व्यापाऱ्यांना काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. यूपीआय व्यवहार ग्राहकांसाठी मोफतच राहणार आहेत. एमडीआर म्हणजे ग्राहकाकडून कार्ड किंवा डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यापाऱ्याने भरायचे शुल्क हे निवडक यूपीआय व्यापारी व्यवहारांवर लागू करण्यात आले आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

१) यूपीआयद्वारे होणारे व्यवहार ग्राहकांसाठी मोफतच राहणार आहेत.
२) यूपीआयद्वारे कुटुंबीय आणि मित्रांना पैसे पाठवणे पूर्णपणे मोफत राहील.
३) यूपीआयद्वारे कोणत्याही व्यापाऱ्याला कोणत्याही रकमेचे देयक करणे मोफत राहील.
४) तुम्ही दुकानातून खरेदी करत असाल, स्थानिक बाजारात देयक करत असाल किंवा रस्त्यावरील विक्रेत्याच्या क्यूआर कोडवर स्कॅन करून पेमेंट करत असाल ते मोफतच राहील.
५) व्यापारी एमडीआर शुल्काचा भार ग्राहकांवर टाकू शकत नाहीत.

व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?

१) २ हजार रुपयांपर्यंतच्या सर्व यूपीआय व्यापारी देयकांवर शून्य एमडीआर किंवा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांचे ९६ टक्के व्यवहार मोफत राहतील.
२) यूपीआय क्यूआर कोडद्वारे आपल्या बँक खात्यांमध्ये दरमहा १ लाख रुपयांपर्यंत रक्कम प्राप्त करणारे रस्त्यावरील विक्रेते, परिसरातील दुकानदार आणि लघु व्यावसायिक यांसारखे छोटे व्यापारी शून्य एमडीआर शुल्काचा लाभ घेत राहतील.
३) २ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या पात्र व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर शुल्क आकारले जाईल.
४) ७५ हजार रुपय आणि त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी एमडीआर प्रति व्यवहार ३०० रुपये इतका मर्यादित असेल.

आवश्यक सेवांसाठी विशेष एमडीआर दर कोणते?

१) २ हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांवर शून्य एमडीआर शुल्क कायम राहील.
२) इंधन, शिक्षण, विमा, रेल्वे, दूरसंचार आणि युटिलिटी सेवा (वीज, पाणी आणि पाईपद्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू) यांसह इतर सेवांसाठी २ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देयकावर प्रति व्यवहार ५ रुपये निश्चित एमडीआर शुल्क आकारले जाईल.