मुंबई: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) ‘विमेन प्लॅन’ (Women Plan) या नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे. भारतीय भांडवली बाजारपेठेत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि गुंतवणूक प्रक्रिया अधिक सोपी व परवडणारी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सध्याच्या काळात गुंतवणुकीमध्ये महिलांचा सहभाग झपाट्याने वाढत आहे. भारतातील महिलांच्या डीमॅट खात्यांची संख्या २०२१ पासून १२९ टक्क्यांहून अधिक वाढली असून, २०२६ च्या सुरुवातीपर्यंत ही संख्या ६६.६ लाखांवरून २.८ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ही जवळपास चारपट वाढ एक स्पष्ट बदल दर्शवते, ज्यामध्ये आता नवीन ग्राहकांपैकी सुमारे ३० टक्के महिला आहेत.

‘विमेन प्लॅन’ची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

  • पात्रता: १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत महिलांनी उघडलेल्या डीमॅट खात्यांसाठी हा प्लॅन लागू असेल.
    शून्य सेटलमेंट शुल्क: खाते उघडल्याच्या तारखेपासून पहिल्या तीन वर्षांसाठी डेबिट व्यवहारांवर (transactions) कोणतेही सेटलमेंट शुल्क आकारले जाणार नाही.
  • वयाची अट नाही: कोणत्याही वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • व्यवहारांची मर्यादा नाही: व्यवहारांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नसेल.
  • अनेक खाती: एकापेक्षा जास्त डीमॅट खाती उघडण्याची परवानगी आहे.
  • संयुक्त खाते: जर महिला ‘पहिली खातेदार’ (First Holder) असेल, तर संयुक्त खाती (Joint Accounts) देखील या सवलतीसाठी पात्र आहेत.

भारतातील महिला आता त्यांच्या आर्थिक भविष्याची जबाबदारी स्वतःहून समर्थपणे स्वीकारत आहेत. या ‘विमेन प्लॅन’च्या माध्यमातून, ही गती अधिक वाढवायची आहे. विशेषतः ज्या महिला आपला गुंतवणुकीचा प्रवास नव्याने सुरू करत आहेत, त्यांच्यासाठी गुंतवणूक अधिक सुलभ आणि फायदेशीर बनवणे हे उद्दिष्ट आहे, एनएसडीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय चांडोक म्हणाले.

NSDL १९९६ मध्ये स्थापन झालेली जगातील सर्वात मोठ्या डिपॉझिटरीजपैकी एक आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ती गुंतवणूकदार, स्टॉक ब्रोकर्स आणि इतर संस्थांना सुरक्षित आणि कार्यक्षम सेटलमेंट सोल्यूशन्स प्रदान करते.