मुंबई : भारतीय भांडवली बाजारात सध्या बहुप्रतीक्षित अशा राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) वेग आला आहे. एनएसईने भांडवली बाजार नियामक सेबीकडे मसुदा प्रस्ताव दाखल केल्यानंतर बाजारातील हालचालींना वेग आला आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने केलेल्या समभागांच्या खरेदीत ‘एनएसई’ पाचव्या स्थानी आहे. या घोडदौडीत एलआयसीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्या इन्फोसिस, टीसीएस आणि बँकिंग क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेलाही मागे टाकले आहे.
असूचिबद्ध बाजारात समभागाचा भाव वधारला
एनएसईच्या आयपीओ संदर्भातील नियामक अडचणी दूर झाल्यामुळे असूचिबद्ध बाजारात एनएसईच्या समभागांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या असूचिबद्ध बाजारात एनएसईचा समभाग प्रति शेअर अंदाजे २,५०० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. या वाढलेल्या भावामुळे एनएसईचे एकूण बाजार मूल्य सुमारे ५.७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून, ही कंपनी भारतातील आघाडीच्या १० मौल्यवान कंपन्यांच्या गटामध्ये सामील झाली आहे.
एलआयसीच्या पोर्टफोलिओमधील नवे समीकरण
‘एलआयसी’कडे राष्ट्रीय शेअर बाजाराची सुमारे १०.७२ टक्के हिस्सेदारी असून एकूण २६.५३ कोटी समभाग आहेत. समभागांच्या किमतीतील ताज्या तेजीमुळे एलआयसीच्या या हिश्श्याचे एकूण मूल्य आता ६६,३१९ कोटी रुपयांच्या वर गेले आहे. या अभूतपूर्व वाढीमुळे एलआयसीच्या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या पहिल्या पाच कंपन्यांमध्ये ‘एनएसई’चा समावेश झाला आहे.
क्र.कंपनीचे नाव एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य (अंदाजे)
- रिलायन्स इंडस्ट्रीज १.३४ लाख कोटी
- आयटीसी ८०,८७४ कोटी
- एचडीएफसी बँक ७२,१८० कोटी
- स्टेट बँक ऑफ इंडिया ६८,०३१ कोटी
- राष्ट्रीय शेअर बाजार ६६,३१९ कोटी
दिग्गजांना टाकले मागे
या मूल्यांकनातील वाढीमुळे एलआयसीच्या पोर्टफोलिओमधील जुन्या दिग्गज कंपन्या मागे पडल्या आहेत. आतापर्यंत एलआयसीच्या मोठ्या गुंतवणुकींमध्ये अव्वल स्थानी गणल्या जाणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस , इन्फोसिस आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांना एनएसईने केवळ असूचिबद्ध समभागांच्या मूल्याच्या जोरावर मागे टाकले आहे.
मूल्य वाढीचा मोठा फायदा
सेबी आणि गुंतवणूक मंत्रालयाकडून एनएसईच्या आयपीओबाबत सकारात्मक संकेत मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. एलआयसी या आयपीओच्या ‘ऑफर फॉर सेल’द्वारे (ओएफएस) समभाग विकणार नसून गुंतवणूक कायम ठेवणार आहे. मात्र, आगामी काळात जेव्हा हा समभाग शेअर बाजारात सूचिबद्ध होईल, तेव्हा मिळणाऱ्या योग्य मूल्यांकनामुळे एलआयसीच्या ‘मार्क-टू-मार्केट’ नफ्यात आणि एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेत मोठी वाढ शक्य आहे. एनएसईचा आगामी ३०,००० कोटी रुपयांचा आयपीओ हा देशातील सर्वात मोठ्या आयपीओंपैकी एक असणार आहे. यामध्ये एसबीआयसह अनेक सरकारी वित्तीय संस्था त्यांचे समभाग विकणार आहेत, मात्र सर्वात मोठा हिस्सा असणारी एलआयसी दीर्घकालीन वाढीवर विश्वास ठेवून गुंतवणूक कायम ठेवणार आहे.
