मुंबई : देशातील सर्वात मोठी समभाग खरेदी-विक्रीचा बाजार मंच असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईच्या बहुप्रतीक्षित प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) अखेर वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एनएसई आजच सेबीकडे मसुदा प्रस्ताव दाखल करू शकते.
एनएसईच्या आयपीओचे मूल्यांकन ५ लाख कोटी रुपयांहून अधिक असण्याची शक्यता असून, तो भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक समभाग विक्रींपैकी एक ठरू शकतो. प्रस्तावित इश्यूचा आकार कंपनीच्या एकूण भागभांडवलाच्या सुमारे ५ टक्के असू शकतो. हे प्रमाण सेबीने मोठ्या कंपन्यांसाठी निर्धारित केलेल्या किमान २.५ टक्के सार्वजनिक भागभांडवलाच्या निकषापेक्षा जास्त आहे.
हा आयपीओ पूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’स्वरूपात असण्याची शक्यता आहे. म्हणजेच कंपनीकडे नवीन भांडवल येणार नसून विद्यमान भागधारक आपल्या मालकीतील काही हिस्सा विकतील. मात्र, एनएसईमधील सर्वात मोठा सार्वजनिक क्षेत्रातील भागधारक असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (एलआयसी) सध्या १०.७२ टक्के हिस्सा आहे आणि आयपीओच्या माध्यमातून हिस्सा विक्रीची शक्यता कमी आहे.
बाजारातील सूत्रांनुसार, नवरात्री ते दिवाळी या कालावधीत म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला होऊ शकतो. एनएसईची सूचिबद्धता अनेक वर्षांपासून विविध नियामक आणि कायदेशीर कारणांमुळे रखडले होते. त्यामुळे मसुदा प्रस्ताव दाखल होणे हा आयपीओ प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
बीएसई विरुद्ध एनएसई : गुंतवणूकदारांसमोर नवा पर्याय
एनएसई सूचिबद्ध झाल्यानंतर ती थेट मुंबई शेअर बाजरी अर्थात बीएसईशी स्पर्धा करेल. सध्या बीएसई हा देशातील एकमेव सूचिबद्ध बाजारमंच आहे.
विशेष म्हणजे, बीएसईच्या समभागांनी गेल्या १२ महिन्यांत ५४.३१ टक्के आणि चालू वर्षात ५८.१३ टक्के परतावा दिला आहे. त्याच काळात निफ्टी ५० निर्देशांकात अनुक्रमे सुमारे ४ टक्के आणि ८ टक्क्यांची घसरण झाली आहे. यामुळे बाजार मंच व्यवसायावरील गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येतो.
असूचिबद्ध (अनलिस्टेड) बाजारात एनएसईची किंमत किती?
आयपीओ पूर्वी एनएसईचे असूचिबद्ध समभाग मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, एनएसईचे असूचिबद्ध समभाग सध्या सुमारे २,०१५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. आयपीओ बाजारातील हालचालींमुळे या समभागांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशातील सर्वात मोठ्या समभाग विक्रींपैकी एक!
- प्रस्तावित आयपीओच्या माध्यमातून एनएसईचे बाजार मूल्य ५ लाख कोटी रुपयांच्या पार जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो.
- ५ टक्के हिस्सा विकणार: सूत्रांच्या मते, या आयपीओचा आकार एक्सचेंजच्या एकूण इक्विटी भांडवलाच्या सुमारे ५ टक्के असू शकतो. १०,२०० कोटींपेक्षा जास्त मूल्य असलेल्या कंपन्यांसाठी सेबीने ठरवून दिलेल्या किमान २.५ टक्के पब्लिक फ्लोटच्या निकषापेक्षा हा आकार दुप्पट आहे.
पूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’: हा इश्यू पूर्णपणे विद्यमान भागधारकांद्वारे समभाग विक्रीचा असेल. म्हणजेच, याद्वारे गोळा होणारा निधी थेट कंपनीकडे न जाता भागधारकांकडे जाईल.
एलआयसी आपला हिस्सा विकणार नाही: विशेष म्हणजे, सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडे एनएसईचा सर्वाधिक १०.७२ टक्के हिस्सा आहे. मात्र, एलआयसी या आयपीओमध्ये आपला एकही शेअर विकणार नसून आपला हिस्सा कायम ठेवणार असल्याचे समजते.
दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात येण्याची शक्यता
हा महा-आयपीओ नवरात्री ते दिवाळीच्या दरम्यान म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कालावधीत सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला केला जाऊ शकतो.
