मुंबई : भारतातील आणि जगातील सर्वात मोठ्या डेरिव्हेटिव्ह स्टॉक एक्सचेंजपैकी एक असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ने (एनएसई) आपल्या बहुप्रतिक्षित प्राथमिक भागविक्रीसाठी (आयपीओ) सुमारे ५.२६ लाख कोटी रुपये मूल्यांकन मिळण्याची शक्यता आहे. भारतातील भागभांडवल बाजाराच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अहवालानुसार, एनएसईकडून प्रति शेअर २,००० ते २,१०० या पातळीमध्ये समभागांची विक्री शक्य आहे. अद्याप एनएसईकडून अधिकृतरित्या शेअरसाठी किमंतपट्टा निश्चित करण्यात आलेला नाही. जागतिक स्तरावर या आयपीओसाठी मोठ्या प्रमाणात रोडशो आयोजित करण्यात आले असून, यात ब्लॅकरॉक , कॅपिटल ग्रुप आणि जीक्यूजी पार्टनर्स यांसारख्या तब्बल १२० हून अधिक प्रमुख जागतिक संस्थागत गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला आहे.

हा आयपीओ संपूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’ स्वरूपात असणार आहे. यामध्ये कंपनीतील विद्यमान भागधारक सुमारे १४.८९ कोटी समभाग म्हणजेच कंपनीतील जवळपास ६ टक्के हिस्सेदारी विक्रीसाठी उपलब्ध करतील. या ऐतिहासिक आणि विशाल इश्यूच्या व्यवस्थापनासाठी एनएसईने तब्बल २० मर्चंट बँकांची नियुक्ती केली आहे. आवश्यक नियामक मंजुरी आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा आयपीओ सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात बाजारात दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

अपेक्षित मूल्यांकनानुसार (५५ अब्ज डॉलर) आयपीओ यशस्वी झाल्यास, एनएसई जगातील सहावा मोठा सूचिबद्ध बाजार मंच ठरेल. भारतीय भांडवली बाजारातील वाढती उलाढाल आणि गुंतवणूकदारांचा या एक्सचेंजवरील प्रचंड भरवसा यामुळे या आयपीओकडे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे अत्यंत बारीक लक्ष आहे.