मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील जागतिक स्पर्धा तीव्र होत असताना जगातील आघाडीची एआय चिप उत्पादक कंपनी एनव्हिडिया आपल्या महत्त्वाच्या तांत्रिक पदांसाठी कोट्यवधी रुपयांचे वेतन देत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील फेडरल कामगार नोंदींमधून उघड झालेल्या आकडेवारीनुसार, कंपनीतील काही वरिष्ठ संशोधक, आर्किटेक्ट आणि सॉफ्टवेअर अभियंत्यांचे वार्षिक मूळ वेतन ४.७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचत आहे.
‘मिंट’ने ‘बिझनेस इन्सायडर’च्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील कडक होत चाललेल्या स्थलांतर धोरणांदरम्यान अनेक तंत्रज्ञान कंपन्या परदेशी कर्मचाऱ्यांची भरती कमी करत असताना एनव्हिडियाने मात्र एच-१बी (H-1B) व्हिसाधारकांच्या भरतीला अधिक वेग दिला आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने सुमारे १,२०० H-1B पदांसाठी मंजुरी मिळवली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या सुमारे १,००० होती. यावरून एआय, चिप डिझाइन, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी आणि प्रगत संगणकीय संशोधन क्षेत्रातील जागतिक प्रतिभा आकर्षित करण्यावर कंपनीचा भर असल्याचे स्पष्ट होते.
इतर तंत्रज्ञान कंपन्यांपेक्षा वेगळी रणनीती
अहवालानुसार, अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी परदेशी भरती कमी केली आहे. गुगलच्या H-1B मंजुरींची संख्या एका वर्षात सुमारे ५,१०० वरून २,२०० पर्यंत घसरली, तर अॅमेझॉनच्या मंजुरी ६,१०० वरून ४,३०० पर्यंत कमी झाल्या. याउलट एनव्हिडियाने भरतीचा वेग कायम ठेवला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनसेन हुआंग यांनी अनेकदा कंपनीच्या यशामध्ये जागतिक प्रतिभेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांच्या मते, विविध देशांतील अभियंते आणि संशोधक हे एनव्हिडियाच्या वाढीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत.
कोणत्या पदांना किती वेतन?
फेडरल नोंदींनुसार, एनव्हिडियामधील ‘प्रिन्सिपल रिसर्च सायंटिस्ट’ या पदासाठी वार्षिक मूळ वेतन २.६० कोटी ते ४.१२ कोटी रुपयांदरम्यान आहे. ‘आर्किटेक्चर डायरेक्टर’ पदासाठी हे वेतन ३.०६ कोटी ते ४.६७ कोटी रुपयांपर्यंत जाते. तसेच, ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ पदासाठी १.०३ कोटी ते ३.७४ कोटी रुपये, तर ‘सीनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर’साठी १.३३ कोटी ते ३.४१ कोटी रुपयांपर्यंत वेतन दिले जात असल्याचे दिसून आले आहे.
मात्र हा केवळ मूळ पगार
बिझनेस इन्सायडरने नमूद केल्याप्रमाणे, H-1B नोंदींमध्ये फक्त मूळ वेतनाचा समावेश असतो. त्यामध्ये समभाग (स्टॉक ऑप्शन्स), बोनस, प्रोत्साहनपर लाभ आणि इतर आर्थिक सुविधा समाविष्ट नसतात. प्रत्यक्षात एनव्हिडियामधील वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे एकूण वार्षिक वेतन यापेक्षा लक्षणीयरीत्या अधिक असू शकते.
एआय संशोधन आणि पुढील पिढीतील चिप तंत्रज्ञानाच्या विकासासाठी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या स्पर्धेमुळे उच्च कौशल्य असलेल्या अभियंते आणि संशोधकांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्याचा थेट परिणाम वेतन पातळीवर होत असून, एनव्हिडियासारख्या कंपन्या सर्वोत्तम प्रतिभा टिकवून ठेवण्यासाठी विक्रमी वेतन देत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
गुगल-अॅमेझॉनला मागे टाकत ‘व्हिसा’मध्येही मारली बाजी
एकीकडे अमेरिकेतील कडक इमिग्रेशन नियमांमुळे गुगल आणि अॅमेझॉनसारख्या दिग्गज टेक कंपन्यांनी परदेशी कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवणे (H-1B Visa Hiring) लक्षणीयरीत्या कमी केले आहे. मात्र, एनव्हिडियाने याउलट प्रवाह धरत जागतिक टॅलेंटला आपल्याकडे खेचण्यासाठी कोट्यवधींची खैरात सुरू ठेवली आहे.
- एनव्हिडिया : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत तब्बल १,२०० एच-१बी (H-1B) व्हिसा मंजूर करून घेतले आहेत (गेल्या वर्षी हा आकडा १,००० होता).
- गुगल : गुगलचे एच-१बी व्हिसा अप्रूव्हल्स ५,१०० वरून थेट २,२०० वर घसरले आहेत.
- अॅमेझॉन : अॅमेझॉनचीही परदेशी भरती ६,१०० वरून ४,३०० वर खाली आली आहे.
