Nvidia Becomes Most Valuable Company Beat Apple And Microsoft: बहुराष्ट्रीय अमेरिकी कंपनी एनव्हीडियाने गुरुवारी (३ जुलै) ३.९२ ट्रिलियन डॉलर्सचे बाजारमूल्य गाठले असून, कंपनी आता इतिहासातील सर्वात मौल्यवान कंपनी बनण्याच्या मार्गावर आहे. वॉल स्ट्रीटच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दलच्या आशावादामुळे कंपनीच्या बाजारमूल्यात ही वाढ झाली आहे. उच्च दर्जाच्या एआय चिपची निर्मिती करणाऱ्या एनव्हीडियाने २६ डिसेंबर २०२४ रोजी अॅपलने गाठलेल्या ३.९१५ ट्रिलियन डॉलर्स बाजारमूल्याला आता मागे टाकले आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या मते, कंपनीच्या नवीन चिप्सने सर्वात मोठ्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. सध्या मायक्रोसॉफ्ट ३.७ ट्रिलियन डॉलर्सच्या बाजार भांडवलासह दुसऱ्या स्थानावर आहे, आणि अॅपल ३.१९ ट्रिलियन डॉलर्सच्या बाजार मूल्यासह तिसऱ्या स्थानावर आहे.
मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, मेटा प्लॅटफॉर्म्स, अल्फाबेट (गूगल) आणि टेस्ला सारख्या दिग्गज टेक कंपन्यांमध्ये प्रगत एआय डेटा सेंटर्स उभारण्यासाठी आणि एआय तंत्रज्ञानात आघाडी घेण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे एनव्हीडियाच्या विशेष चिप्सची मागणी थेट वाढली आहे.
एनव्हीडियाचे मुख्य तंत्रज्ञान सुरुवातीला व्हिडिओ गेम्ससाठी विकसित करण्यात आले होते, पण गेल्या चार वर्षांत त्यांचे शेअर बाजार मूल्य जवळजवळ आठ पटीने वाढले आहे. ते २०२१ मधील ५०० अब्ज डॉलर्सवरून आता जवळजवळ ४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढले आहे.
आकडेवारीनुसार, एनव्हीडियाचे सध्याचे बाजारमूल्य कॅनडा आणि मेक्सिकोमधील सर्व सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलापेक्षा जास्त आहे.
दरम्यान, एनव्हीडियाच्या शेअरमध्येही ४ एप्रिल रोजीच्या नीचांकी पातळीपेक्षा ६८% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक टॅरिफ घोषणांवर वॉल स्ट्रीटने प्रतिक्रिया दिल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण झाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा प्रभाव कमी करण्यासाठी व्हाईट हाऊस व्यापार करारांना अंतिम स्वरूप देईल, या अपेक्षेने एनव्हीडियासह अमेरिकन शेअर्समध्ये सुधारणा झाली आहे.
एनव्हीडिया काय काम करते?
एनव्हीडियाने ही १९९३ साली जेन्सन ह्युआंग या तैवानी वंशाच्या अमेरिकी अभियंत्यासह त्याच्या दोन मित्रांनी स्थापन केलेली कंपनी सुरुवातीला व्हिडीओ गेमचा दृश्यात्मक प्रभाव वाढवणाऱ्या ग्राफिक्सना बळकटी देणारे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विकसित करत असे. त्या काळातील अनेक उच्च दर्जाच्या संगणकीय आणि व्हिडीओ गेमना एनव्हीडियाच्या ग्राफिक्स मेमरी कार्ड किंवा अन्य हार्डवेअरचे पाठबळ असे.
कालांतराने या कंपनीने जीपीयू अर्थात ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्सची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्याद्वारे संगणकाची दृकचित्र प्रक्रिया क्षमता वाढवण्यात येते. या ‘जीपीयू’चा वापर पुढे व्हच्र्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञानासाठी वाढू लागला. त्यापाठोपाठ आलेल्या कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाकरिता ‘प्रोसेसिंग चिप’ तयार करण्याचे कामही एन्व्हिडिआने सुरू केले. यातूनच गेल्या काही वर्षांतच या कंपनीची कैक पटींनी प्रगती झाली आहे.