नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर खासगी इंधन विक्रेती कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपये, तर डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ शनिवारच्या पहाटेपासून लागू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देशभरात नायरा एनर्जीचे ७,१०८ पेट्रोलपंप आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती आणि देशांतर्गत किरकोळ विक्रीच्या दरांमधील वाढती तफावत कमी करण्याच्या उद्देशाने ही दरवाढ करण्यात आल्याचे समजते. याबाबत कंपनीच्या प्रवक्त्यांकडे विचारणा करण्यात आली असता त्यांच्याकडून तत्काळ प्रतिक्रिया मिळाली नाही. यापूर्वी पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढल्यानंतर नायरा एनर्जीने २६ मार्च रोजी पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात ३ रुपये प्रतिलिटर वाढ केली होती. त्यामुळे कंपनीच्या पेट्रोलपंपांवर पेट्रोलचा दर १००.७१ रुपये, तर डिझेलचा दर ९१.३१ रुपये प्रतिलिटर झाला होता.
त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ केली. मेअखेरपर्यंत दोन्ही इंधनांच्या दरात एकत्रित सुमारे ७.५० रुपयांची वाढ झाली होती. २५ मे रोजी झालेल्या चौथ्या दरवाढीत पेट्रोलच्या दरात २.६१ रुपये, तर डिझेलच्या दरात २.७१ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली होती.
जुलैमध्ये दरवाढ मागे
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर नायरा एनर्जीने १ जुलै रोजी पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात ३ रुपये प्रतिलिटर कपात केली होती. पश्चिम आशियातील तणाव काहीसा निवळल्यानंतर इंधनाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा ग्राहकांना देण्यात आला होता. दोन वर्षांहून अधिक काळानंतर एखाद्या इंधन विक्रेत्या कंपनीने केलेली ही पहिली दरकपात होती. त्यामुळे नायराचे दर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या दरांच्या जवळ आले होते. आता पुन्हा करण्यात आलेली दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या खर्चाचा काही भाग ग्राहकांकडून वसूल करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नाचा भाग मानली जात आहे.
सरकारी कंपन्यांवरही दबाव
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचे देशातील एकूण १,०४,१३७ पेट्रोलपंपांपैकी ९० टक्क्यांहून अधिक पंपांवर नियंत्रण आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाही या कंपन्यांकडून देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या दरात तुलनेने स्थिरता ठेवली जाते. दरम्यान, किरकोळ आणि घाऊक डिझेलच्या दरातील तफावतीमुळे औद्योगिक ग्राहकांकडून किरकोळ विक्री केंद्रांमधून स्वस्त डिझेलची खरेदी वाढत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे १ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने खासगी इंधन विक्रेत्यांनी पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर मर्यादा घालू नयेत, असे स्पष्ट केले.
नायरा एनर्जी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज व ब्रिटनच्या बीपी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या जिओ-बीपीने काही पेट्रोलपंपांवर इंधन विक्रीचे प्रमाण मर्यादित केले होते. जिओ-बीपीचे देशभरात २,३०४ पेट्रोलपंप असून, कंपनीने अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही.
कंपन्यांच्या नफ्यावर दबाव
रेटिंग संस्था इक्राने सप्टेंबरमध्ये पेट्रोलवर सुमारे ८ रुपये आणि डिझेलवर सुमारे ९ रुपये प्रतिलिटर नकारात्मक विपणन मार्जिन असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या तसेच पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती वाढत असताना देशांतर्गत इंधनाचे दर स्थिर राहिल्यामुळे तेल विपणन कंपन्यांच्या नफ्यावर आणि रोख प्रवाहावर दबाव वाढला आहे.
इक्राच्या अंदाजानुसार पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी या तिन्ही उत्पादनांमध्ये तेल विपणन कंपन्यांना दररोज सुमारे ५३० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. कच्च्या तेलाच्या किमती ८५ ते ९० डॉलर प्रति बॅरलपर्यंत असताना कंपन्यांच्या शुद्धीकरण आणि विपणन व्यवसायाचा समतोल साधला जातो. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती त्यापेक्षा अधिक झाल्यास आणि त्यानुसार किरकोळ इंधनदर वाढवले नाहीत, तर विपणन व्यवसायात तोटा होण्याची शक्यता वाढते.
गुजरातमधील वाडिनार येथे नायरा एनर्जीचा वर्षाला दोन कोटी टन क्षमतेचा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. देशभरात कंपनीचे सात हजारांहून अधिक इंधन विक्री केंद्रे आहेत. नायराने केलेल्या ताज्या दरवाढीमुळे खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील इंधन विक्रेत्यांच्या दरांमधील तफावत वाढण्याची शक्यता आहे. इंधनाचे दर दीर्घकाळ वाढीव पातळीवर राहिल्यास वाहतूक व परिचालन खर्चावर परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम महागाई आणि इंधनाच्या मागणीवरही होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बाजारभावाच्या तुलनेत कमी दर कायम ठेवल्यास तेल कंपन्यांवरील तोटा वाढून आगामी काळात आणखी दरवाढीचा दबाव निर्माण होऊ शकतो.
