Bhavish Aggarwal Bailable Arrest Warrant Goa Consumer Court: दक्षिण गोव्यातील जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने एका ग्राहकाने दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात आयोगासमोर हजर राहण्यास नकार दिल्याबद्दल ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल यांच्याविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. दरम्यान, भाविश अग्रवाल यांना सुनावणीच्या तारखेपूर्वी नोटीस देण्यात आली होती, परंतु तरीही ते सुनावणीस गैरहजर राहिले.
आयोगासमोर हजर न राहिल्याने ग्राहक विवाद निवारण आयोगाने बेंगळुरू पोलिसांना भाविश अग्रवाल यांना अटक करून आयोगासमोर हजर करण्यास सांगितले आहे.
द टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, जर त्यांना ताब्यात घेण्यात आले तर २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता भाविश अग्रवाल यांना आयोगासमोर हजर करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. हे जामीनपात्र वॉरंट असल्याने, भाविश यांना १.४७ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन घेता येईल.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार प्रीतिश चंद्रकांत घाडी यांनी आरोप केला आहे की त्यांनी ओला इलेक्ट्रिककडून ई-बाईक खरेदी केली होती. खरेदीनंतर काही दिवसांतच बाईकमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यामुळे ती दुरुस्तीसाठी कंपनीकडे परत करण्यात आली होती. परंतु बराच काळ बाईक ग्राहकाला परत करण्यात आली नाही. तसेच कंपनीने ग्राहकाला कोणतेही योग्य स्पष्टीकरण दिले नाही.
४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या आपल्या आदेशात आयोगाने म्हटले होते की ग्राहकांकडून पूर्ण रक्कम वसूल केल्यानंतर अशा प्रकारचा निष्काळजीपणा गंभीर आहे. तसेच आयोगाने भाविश अग्रवाल यांना प्रत्यक्ष हजर राहून परिस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.
आयोगाच्या आदेशानंतरही भाविश अग्रवाल हजर राहिले नाहीत, तेव्हा बेंगळुरू पोलिसांना त्यांच्याविरुद्ध १,४७,४९९ रुपयांच्या जामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. हे वॉरंट त्यांच्या बेंगळुरूतील कोरमंगळा येथील पत्त्यावर पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता होणार आहे. त्यांना प्रत्यक्ष हजर राहून स्पष्टीकरण द्यावे लागेल. हा मुद्दा आता केवळ ग्राहक वादाचा राहिलेला नाही, तर मोठ्या कंपन्यांसाठी जबाबदारीचा प्रश्न आहे.

