मुंबई : बाजार प्रतिकूल असताना, विजेच्या पारेषणातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रथितयश कंपनी ओम पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) प्रस्तावित करून गुंतवणूकदारांना आजमावयचे ठरविले आहे. कंपनीला यातून १५० कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे.

वीज पारेषण सुविधांसाठी अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम (ईपीसी) सेवा देणारी कंपनी ओम पॉवर ट्रान्समिशन उच्च-दाब आणि अतिउच्च-दाब पारेषण वाहिन्या, सबस्टेशन्स, भूमिगत केबलिंग प्रकल्पांची अंमलबजावणी तसेच सर्वसमावेशक परिचालन आणि देखभाल सेवा पुरवते. कंपनीचा आयपीओ, गुरुवार, ९ एप्रिलला खुला होत असून, गुंतवणूकदारांना कंपनीच्या समभागांसाठी प्रत्येकी १६६ रुपये ते १७५ रुपये या किंमत पट्ट्यावर १३ एप्रिलपर्यंत बोली लावता येईल.

विक्रीपश्चात कंपनीचे शेअर्स मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. सर्व प्रक्रिया पूर्ण करून १७ एप्रिल रोजी शेअर्सची सूचिबद्धता होणे अपेक्षित आहे.

या आयपीओमधून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनीच्या भांडवली खर्चासाठी (यंत्रसामग्री व उपकरणे खरेदी) आणि २५ कोटी रुपये कर्जाच्या अंशतः किंवा पूर्ण परतफेडीसाठी केला जाणार आहे. या भागविक्रीचे व्यवस्थापन बीलाइन कॅपिटल अॅडव्हायजर्सकडून पाहिले जात आहे.

ओम पॉवर ट्रान्समिशन या सध्या गुजरात राज्यात केंद्रीत कंपनी देशव्यापी विस्ताराच्या दीर्घकालीन वाढीच्या धोरणानुसार वाटचाल करत असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक कल्पेश धनजीभाई पटेल यांनी सांगितले. कंपनीकडे सध्या ७४४ कोटी रुपये मूल्याच्या ५८ प्रकल्पांचे कार्यादेश असून ते पुढील १२ ते २४ महिन्यांत पूर्णत्वाला जातील.

कार्यक्षम आणि वेळेत अंमलबजावणी हा कंपनीचा विशेष गुण राहिला असल्याचे पटेल म्हणाले. कंपनीला मिळणाऱ्या कामांमध्ये राज्य सरकार, सरकारी उपक्रम आणि रेल्वे तसेच नवीन अक्षय्य ऊर्जा प्रकल्पांचा मोठा वाटा आहे. कंपनीचे एकूण मनुष्यबळ १,२०० इतके असून, त्यात २०० अनुभवी अभियंत्यांचा समावेश आहे.

गुजरातमध्ये २०११ मध्ये कार्यारंभ सुरू केल्यापासून, कंपनीने एकूण १,००० सर्किट किलोमीटर पेक्षा जास्त पारेषण वाहिन्या आणि ११ सबस्टेशन्स कार्यान्वित केले आहेत. कंपनीने ठरलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचा यशस्वी कामगिरीचा कित्ता निर्माण केला आहे. याचा प्रत्यय तिच्या मजबूत आर्थिक कामगिरीतही दिसून येतो.

३१ डिसेंबर २०२५ अखेर समाप्त नऊ महिन्यांच्या कालावधीत, कंपनीचे उत्पन्न २७४.५५ कोटी रुपये, तर करोत्तर नफा २३.३७ कोटी रुपये इतका होता. त्या आधीच्या तीन वर्षे कालावधीत कंपनीचे उत्पन्न आणि नफा अनुक्रमे वार्षिक सरासरी ५२.४५ टक्के आणि ८८.१७ टक्के दराने वाढत आला आहे.