Impactof Inflation Rate on Saving: ‘लाखाचे बारा हजार’ अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. या म्हणीचा सरळ साधा आणि सोपा अर्थ म्हणजे फायदा सोडा, नुकसानच अधिक होणे! बाजारपेठेत प्रामुख्याने स्वतंत्र व्यवसाय किंवा शेअर मार्केटमधली गुंतवणूक अशा बाबतीत हा अनुभव अनेकांना आला असेल. आपण जेवढी गुंतवणूक केली, त्यावर नफा न होता उलट तोटाच झाला. पण तुमच्याकडे असणारा पैसा तुम्ही कुठेही न गुंतवता भविष्यातील आधार म्हणून जपून ठेवली, तरीही काहीही न करताच त्यात घट होणार आहे! यासाठी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका पोस्टचा संदर्भ दिला जात आहे.

अक्षत श्रीवास्तव नावाच्या एका व्यक्तीची ही पोस्ट आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसनं या पोस्टचं विश्लेषण करताना आपल्याकडील रक्कम आणि गुंतवणूक याचं गणित स्पष्ट केलं आहे. त्यातून तुमच्याकडे असणारा पैसा तुम्ही कसा वापरता, यावर २० वर्षांनंतरचं त्याचं मूल्य ठरणार असल्याचं सिद्ध होत आहे.

१ कोटीचे २५ लाख, फायदा काय?

समजा तुम्ही २१ हजार रुपये प्रतिमहिना या हिशेबाने म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवत आहात. त्यावर तुम्हाला सरासरी १२ टक्के वार्षिक परतावा मिळत आहे. पुढची १५ वर्षं तुम्ही सलग ही गुंतवणूक केली तर तुमच्याकडे तेव्हा असतील १ कोटी रुपये. पण आज जेवढ्या गोष्टी तुम्ही ३६ लाख रुपयांत खरेदी करू शकत आहात, तेवढ्याच वस्तू तुम्ही १५ वर्षांनी १ कोटी रुपयांत खरेदी करू शकाल. म्हणजेच, तुमच्या आजच्या १ कोटी रुपयांची किंमत १५ वर्षांनी फक्त ३६ लाख आणि २० वर्षांनी फक्त २५ लाख झालेली असेल. पण हे असं का होईल?

वर्षमहागाईनंतरचं मूल्यखरेदी क्षमता
१ कोटी१०० टक्के
७१.३० लाख७१.३ टक्के
१०५०.७५ लाख५०.७५ टक्के
१५३५.१५ लाख३६.१५ टक्के
२०२५.८४ लाख२५.८४ टक्के
२० वर्षांनंतर १ कोटी रुपयांच्या बचतीचं अवमूल्यन

वर्षागणिक वाढत जाणारी महागाई

तुमच्या बचतीचं मूल्य दिवसेंदिवस घटण्यामागे महागाईचा दर हे सर्वात महत्त्वाचं कारण ठरतं. रोजच्या आयुष्यात महागाई फक्त भाज्यांचे दर, डाळींच्या वाढलेल्या किमती किंवा पेट्रोलची शंभरी इथपर्यंतच आपल्याला प्रत्यक्ष जाणीव होते. पण हीच महागाई तुमची बचत दिवसागणिक संपवत जाते. कशी? समजा, आज तुमच्याकडचे १ कोटी रुपये तुम्हाला खूप मोठी रक्कम वाटत असतील. पण जर महागाई अशीच वर्षागणिक ७ टक्क्यांनी वाढत राहिली, तर येत्या काही वर्षांत तुमच्या १ कोटींचं मूल्य कमालीचं घसरलं असेल.

७ टक्के महागाईचा दर विचारात घेतला, तर १० वर्षांत तुमच्या १ कोटींचं मूल्य झालं असेल ५० लाख. १५ वर्षांत ३६ लाख आणि २० वर्षांत फक्त २५ लाख! म्हणजेच पैसा तर वाढला. पण महागाईमुळे त्या १ कोटी रुपयांची खरेदीची ताकदच कमी होत गेली. उदा. आज १ लाख रुपये असणारी शाळेची फी ७ टक्के महागाईच्या दरानुसार २० वर्षांनी जवळपास ३ लाख ८७ हजार असेल. आज ५ लाख रुपयांचे वैद्यकीय उपचार २० वर्षांनी १९ लाख ३५ हजारांपर्यंत जातील. आजचा महिन्याचा ५० हजार रुपये खर्च २० वर्षांनी २ लाखांच्या घरात गेला असेल. त्यामुळे जर तुम्ही २० वर्षांनी निवृत्त होण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला १ कोटी पुरेसे वाटत असतील, तर त्याऐवजी तुम्हाला ४ कोटींची तजवीज करावी लागेल.

गुतवणुकीवरचा वार्षिक परतावा फसवा असू शकतो!

अनेक गुंतवणूकदारांना वाटतं की जर त्यांच्या गुंतवणुकीवर वर्षाला ७ ते ८ टक्के परतावा मिळत असेल, तर त्यांचं व्यवस्थित चाललंय. पण जर त्याच वेळी महागाईचा दरही ७ टक्क्यांच्या जवळपास असेल, तर मग तुमचा प्रत्यक्ष नफा ० असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महागाईपासून संपत्तीचं रक्षण करायचं असेल तर…

१. फक्त बचत करू नका, गुंतवणूकही करा
२. महागाईच्या दराच्या तुलनेत तुमच्या परताव्याचा अंदाज घ्या. प्रत्यक्ष नफ्याचाच विचार करा.
३. तुमच्या पोर्टफोलियोचा नियमितपणे आढावा घ्या.
४. विचारपूर्वक आणि सर्व जोखमींचा अंदाज घेऊन मगच गुंतवणूक करा.