Defence Stocks : भारतीय लष्कराने ७ मे २०२५ रोजी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या लष्करी कारवाईतून पाकिस्तानसह संपूर्ण जगाने भारतीय लष्कराची ताकद पाहिली. या कारवाईचा सकारात्मक परिणाम भारताच्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सवरही दिसून आला आहे. गेल्या वर्षभरात भारताच्या डिफेन्स शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आउटलुक बिझनेसच्या अहवालानुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये तब्बल २.९ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज’ डिफेन्स सेक्टरचा ‘सुपरस्टार’

या क्षेत्रात सर्वाधिक परतावा देणारी कंपनी म्हणून एमटीएआर टेक्नॉलॉजीज (MTAR Technologies) समोर आली आहे. एयरोस्पेस, संरक्षण आणि अणुऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीने गेल्या वर्षभरात ३३७.७६% इतका बंपर परतावा दिला आहे. हा शेअर वर्षभरापूर्वी ऑपरेशन सिंदूरच्या दिवशी (७ मे २०२५) १,३५०.२५ रुपयांना होता. आज त्याची किंतम ५,०७८ रुपये इतकी आहे. या वर्षीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत हा शेअर १७३.७६% वधारला आहे, तर याच काळात निफ्टी ५० मध्ये ७.५% घसरण झाली आहे. म्हणजे अस्थिर बाजारातही हा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे.

१ लाखाचे वर्षात झाले ४,३७,७६० रुपये

जर एखाद्या गुंतवणूकदाराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दिवशी किंवा त्यानंतर MTAR सारख्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर ३७८% परताव्यानुसार आज त्याचे मूल्य ४,३७,७६० रुपये इतके झाले असते. यामध्ये गुंतवणूकदाराला मिळालेला निव्वळ नफा ३,३७,७६० रुपये आहे.

कंपनीच्या वाढीची प्रमुख कारणे

वित्त वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १००% ने वाढून ३४.६ कोटी रुपयांवर पोहोचला असून, कंपनीकडे सध्या २,३९५ कोटी रुपयांपेक्षा जास्त ऑर्डर्स आहेत. अमेरिकन कंपनी ब्लूम एनर्जीसोबतच्या करारामुळे कंपनीला एआय डेटा सेंटर इंधन सेल क्षेत्रात मोठे काम मिळण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांचा सल्ला

बोनान्झा रिसर्चचे बालाजी राव मुडिली यांच्या मते, कंपनीची ऑर्डर बुक मजबूत असली तरी सध्या हा स्टॉक महागड्या मूल्यावर व्यवहार करत आहे. बाजारात या शेअरने त्याचा सर्वात्तम परतावा दिला आहे. त्यामुळे भविष्यात निकालांमध्ये थोडीही कमकुवतता आली तर शेअरमध्ये मोठी घसरण होऊ शकते. डिफेन्स शेअर्समधील ही तेजी जितकी लष्करी यशावर आधारित आहे, तितकीच ती ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत मिळणाऱ्या ऑर्डर्सवर अवलंबून आहे. MTAR सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना सध्याच्या वाढलेल्या भावाचा विचार करूनच निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.