Oracle co-founder Larry Ellison’s net worth has plummeted by $200 billion: ओरॅकल अमेरिकी आयटी कंपनीचे सह-संस्थापक, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि कार्यकारी अध्यक्ष लॅरी एलिसन यांच्यासाठी हा काळ अत्यंत कठीण ठरत आहे. ब्लूमबर्गच्या मते, सप्टेंबर २०२५ मध्ये जेव्हा त्यांनी काही काळासाठी एलॉन मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला होता, तेव्हापासून त्यांच्या वैयक्तिक संपत्तीत जवळपास २०० अब्ज डॉलर्सची (अंदाजे १६.६ लाख कोटी रुपये) घट झाली आहे.
दरम्यान ओरॅकलने नुकतेच भारतातील १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. या निर्णयानंतर सध्या सर्वत्र ओरॅकलबाबत चर्चा सुरू आहे. यामुळे आयटी क्षेत्रातील इतर कर्मचाऱ्यांमध्येही नोकरी गमावण्याची भीती निर्माण झाली आहे.
३१ मार्च २०२६ रोजी सुरू झालेल्या या कपातीचा फटका भारत आणि जगभरातील अभियांत्रिकी केंद्रांना (आयटी हब) बसला आहे. अमेरिका, भारत, कॅनडा आणि मेक्सिकोमधील कर्मचाऱ्यांना व्यवस्थापक किंवा एचआरकडून कोणतीही पूर्वसूचना न देता, स्थानिक वेळेनुसार सकाळी अंदाजे ६ वाजता कडून सेवा समाप्तीचे ईमेल प्राप्त झाले होते.
एलिसन यांच्या संपत्तीत झालेली ही मोठी घट प्रामुख्याने ओरॅकलच्या शेअरच्या किमतीत झालेल्या जवळपास ५८% घसरणीमुळे झाली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये या शेअरने ३४५.७२ डॉलर्स ही आपली उच्चांकी पातळी गाठली होती. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, सध्या या शेअरचा भाव सुमारे १४५-१४७ डॉलरच्या दरम्यान असून, यामुळे एलिसन जागतिक अब्जाधीशांच्या यादीतील अव्वल स्थानावरून सहाव्या क्रमांकावर घसरले आहेत.
सहा महिन्यांत लॅरी एलिसन यांना २०० अब्ज डॉलर्सचा फटका कसा बसला?
गेल्या वर्षी जुलै २०२५ च्या मध्यावर, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत लॅरी एलिसन यांचे नाव अग्रस्थानी झळकत होते. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, त्यांनी मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला होता. त्यावेळी त्याची एकूण संपत्ती २५६ अब्ज डॉलर्स इतकी होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी, म्हणजेच १० सप्टेंबर २०२५ रोजी, त्यांनी प्रथमच या यादीत अव्वल स्थान गाठले. त्यावेळी त्याची संपत्ती साधारणपणे ३९५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती आणि त्यांनी एलॉन मस्क यांनाही मागे टाकले होते.
मात्र, तो क्षण अल्पजीवी ठरला. २०२५ सालच्या अखेरीस, एलिसन यांची घसरण होऊन ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले होते आणि त्यांची एकूण संपत्ती २४७ अब्ज डॉलर्स इतकी झाली होती.
२०२६ मध्ये तोटा अधिकच वाढला
२०२६ या वर्षाने ही घसरण अधिकच वेगाने झाली आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत लॅरी ॲलिसन यांच्या संपत्तीत वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ५२.४ अब्ज डॉलर्सची घट झाली होती. ही घट सुमारे २१.२ टक्क्यांची असून, यामुळे त्यांची एकूण संपत्ती साधारणपणे १९५ अब्ज डॉलर्सवर आली आहे आणि जागतिक अब्जाधीशांच्या यादीत ते सहाव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. सप्टेंबर २०२५ मधील त्यांच्या संपत्तीच्या सर्वोच्च शिखरापासून ते आतापर्यंत पाहता, एकूण नुकसान जवळपास २०० अब्ज डॉलर्स इतके झाले आहे.
