Oracle Layoffs 2026 : गेल्या काही वर्षांत देशात मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली जातेय. मोठ्या कंपन्यांमध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचाऱ्यांना एका झटक्यात काढलं जातं. कधी व्हिडिओ कॉलद्वारे सुरू असलेल्या मीटिंगमध्ये नोकर कपातीची घोषणा केली जाते तर कधी थेट टर्मिनेशन लेटर पाठवून. ओरॅकल या बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीमध्येही अशाचपद्धतीने मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्यात आली आहे. सकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान जवळपास ३० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आलं असल्याचा मेल प्राप्त झाला असून त्यात १२ हजार भारतीय कर्मचारी आहेत. यासोबत त्यांना टर्मिनेशन लेटरही देण्यात आलं. आजचा नोकरीचा शेवटचा दिवस असल्याचा मेल आल्याने सर्वच कर्मचाऱ्यांसमोर आता मोठ आव्हान उभं राहिलं आहे.
ही नोकरकपात ओरॅकलच्या भारत आणि मेक्सिकोसह विविध क्षेत्रांतील ‘कॉम्प्युटिंग बिझनेस’वर परिणाम करणारी असल्याचं मानलं जातंय. कंपनीने अद्याप अधिकृत आकडा जाहीर केला नसला तरी, ब्लाइंड (Blind), रेडिट (Reddit) आणि एक्स (X) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील चर्चेनुसार ही कपात व्यापक आहे.
भारतात मोठा फटका
एएनआय (ANI) च्या वृत्तानुसार, सुमारे ३०,००० कर्मचाऱ्यांपैकी जवळजवळ १२,००० भारतातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जागतिक स्तरावर हा आकडा ३०,००० च्या आसपास (एकूण कर्मचारी संख्येच्या १८%) असू शकतो, मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. एका वापरकर्त्याने ‘X’ वर लिहिले की, “माझ्या मित्राचा फोन आला जो ओरॅकलमध्ये सीनियर मॅनेजर आहे. त्याच्या २० जणांच्या टीमपैकी ६ जणांना काढले आहे. अनेक टीम्समध्ये ५०% कर्मचारी कमी झाले आहेत.”
“भारतात सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कंपनी एका महिन्याच्या आत आणखी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याची योजना आखत आहे,” असे या कर्मचारी कपातीमुळे प्रभावित झालेल्या दोन व्यक्तींनी, ज्यात कंपनीच्या HR विभागातील एका व्यक्तीचाही समावेश आहे”, पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.
अचानक आलेले ईमेल्स
रेडिटवर अनेक कर्मचाऱ्यांनी या धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितले. एकाने लिहिले, “२० वर्षांच्या सेवेनंतर पहाटे ५ वाजता ईमेल आला.” दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, “पहाटे ६ वाजता ईमेल आला, पुढच्या महिन्यात माझी ४ वर्षे पूर्ण होणार होती.” कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही पूर्वसूचना किंवा एचआर (HR) सोबत चर्चा न होता थेट ‘ओरॅकल लीडरशिप’कडून ईमेल आले आणि काही वेळातच त्यांचे इंटरनल सिस्टम एक्सेस बंद करण्यात आले.
कर्मचाऱ्यांना मिळणार दोन महिन्यांचा पगार
मेलमध्ये ओरॅकलने म्हटले आहे की, संघटनात्मक बदलांमुळे ही पदे अनावश्यक (Redundant) झाली आहेत. कंपनीने स्वेच्छेने राजीनामा देणाऱ्यांना प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी १५ दिवसांचा पगार, एक महिन्याचा नोटीस पे, सुट्ट्यांचे पैसे, ग्रॅच्युइटी आणि दोन महिन्यांचा अतिरिक्त पगार देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात आणखी एक टाळेबंदीची फेरी येऊ शकते, अशीही चर्चा आहे.
इमेलमध्ये नेमकं काय म्हटलंय?
तुमच्या पदाबाबत आम्ही एक कठीण बातमी शेअर करत आहोत. ओरॅकलच्या (Oracle) सध्याच्या व्यावसायिक गरजांचा सखोल विचार केल्यानंतर, व्यापक संघटनात्मक बदलाचा भाग म्हणून तुमचे पद रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. परिणामी, आज तुमचा कामाचा शेवटचा दिवस आहे. तुमचे समर्पण, कठोर परिश्रम आणि आमच्यासोबतच्या कार्यकाळात तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. तुमच्या नोकरी समाप्तीच्या (Termination) कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर, तुम्ही ‘सेव्हरन्स प्लॅन’च्या अटी व शर्तींनुसार ‘सेव्हरन्स पॅकेज’ मिळण्यास पात्र असाल. तुमच्या सेव्हरन्स आणि नोकरीच्या शेवटच्या तारखेबद्दलच्या सविस्तर माहितीचा ‘DocuSign’ ईमेल तुम्हाला तुमच्या ओरॅकल ईमेल आयडीवर प्राप्त होईल.
या बदलाच्या काळात तुम्हाला मदत व्हावी यासाठी महत्त्वाची माहिती, वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि नोकरी सोडण्यासंबंधीची कागदपत्रे मिळवण्यासाठी, तुम्हाला तुमचा वैयक्तिक ईमेल पत्ता प्रदान करणे आवश्यक आहे. कृपया तुमचा वैयक्तिक ईमेल पत्ता त्वरित सबमिट करण्यासाठी येथे क्लिक करा. जर माहिती भरताना काही चूक झाली, तर कृपया नवीन फॉर्म पुन्हा सबमिट करा. टीप: तुमच्या वैयक्तिक ईमेलचा वापर केवळ नोकरी सोडण्यासंबंधीची माहिती आणि सेव्हरन्स कराराच्या पत्रव्यवहारासाठीच केला जाईल.
तुमचा संगणक, ईमेल, व्हॉइसमेल आणि फाइल्सचा एक्सेस लवकरच बंद केला जाईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या संगणकावर लॉग-इन करू शकणार नाही. एक आठवण म्हणून, तुम्हाला ओरॅकलची कोणतीही गोपनीय माहिती डाउनलोड करण्यास, कॉपी करण्यास किंवा स्वतःकडे ठेवण्यास (स्वतःला ईमेल करण्यासह) मनाई आहे. आमच्या संस्थेतील तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद. तुम्हाला काही अतिरिक्त प्रश्न असल्यास, कृपया ‘Ask HR’ पेजद्वारे किंवा (888) 404-2494 या क्रमांकावर एचआर टीमशी संपर्क साधा.
AI कडे वळणारा कल
ॲमेझॉनप्रमाणेच ओरॅकल देखील आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सेंटर्समध्ये गुंतवणूक वाढवत आहे. संसाधनांची पुनर्रचना करण्यासाठी हे पाऊल उचलले गेल्याचे बोलले जात आहे. ओरॅकलने यावर अद्याप अ धिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु या अचानक झालेल्या निर्णयामुळे भारत आणि इतर देशांतील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
“माझा मामा बंगळूरु येथील ओरॅकलमध्ये खूप वरिष्ठ पदावर आहेत, आणि आज त्यांनी मला जे सांगितले ते ऐकून खरंच माझं मन तुटलं. ते म्हणाले की परिस्थिती खूपच वाईट आहे. त्यांच्या ओळखीचे, मेहनती, प्रतिभावान, कंपनीत १५ वर्षांहून अधिक काळ काम करणारे लोक, यांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले आहे. आज ओरॅकल, उद्या दुसरी कोणतीतरी कंपनी (त्यांनी काही कंपन्यांची नावेही सांगितली) असेल. हे सर्व वाढत्या एआयच्या (AI) वर्चस्वामुळे होत आहे आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ते याबद्दल काहीही करू शकत नाहीत. त्यांचे व्हॉट्सॲप आणि मेल आता नोकरीच्या विनंत्या, मदतीसाठी विचारणारे लोक, शिफारसी येत आहेत.. शेअरची किंमत वाढली आहे, हे खरं आहे, पण त्याची किंमत काय? एका कंपनीला आयुष्य दिले, पण काही आठवड्यांतच बदली झाली, अशी प्रतिक्रियाही काही जणांनी व्यक्त केली.
