Oracle Layoffs and Tech Job Cuts : अमेरिकेतील ओरॅकल या बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. सोमवारी सकाळी ६ वाजता मेल पाठवून काही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आहे. बिझनेस इनसाइडरने याबाबत वृत्त दिलं आहे. याबाबत लिक्डिंन, रेडिट आणि एक्सवर अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यथाही मांडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी ओरॅकलने तब्बल २१ हजार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढलं होतं.
लेऑफ नोटिफिकेशनच्या ईमेलमध्ये कंपनीने म्हटलं आहे की, “ओरॅकलच्या सध्याच्या व्यावसायिक गरजांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर, आम्ही एका व्यापक संस्थात्मक बदलाचा भाग म्हणून तुमची भूमिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, आजचा दिवस तुमचा कामाचा शेवटचा दिवस आहे.” कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना ४ आठवड्यांचा मूळ पगार आणि सोबतच रोजगाराच्या प्रत्येक वर्षासाठी अतिरिक्त १ आठवड्याचा पगार देण्याची ऑफर देण्यात आली आहे. दरम्यान, या फेरीत किती कर्मचाऱ्यांना काढलंय याची माहिती समोर आलेली नसली तरीही दुहेरी अंकात ही कपात झाली असल्याची शक्यता आहे.
सोमवारी LinkedIn, Reddit आणि Blind या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा लोकांच्या पोस्ट्स दिसू लागल्या, ज्यांनी या ताज्या कर्मचारी कपातीचा फटका बसल्याचा दावा केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कपातीनंतर आता ही नवीन फेरी समोर आली आहे. एका ताज्या फायलिंगनुसार, ३१ मे रोजी संपलेल्या २०२६ च्या आर्थिक वर्षात कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येत २१ हजार म्हणजेच १३ टक्के घट झाली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या फेरीच्या लेऑफपूर्वी कंपनीत १ लाख ४१ हजार कर्मचारी कार्यरत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या मागणीमुळे ओरॅकलने डेटा सेंटर्स उभारण्यासाठी शेकडो अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. ओरॅकलने पहिल्या तिमाहीत २८.५ अब्ज भांडवली खर्च नोंदवला आहे, जो मागील वर्षाच्या ८.५ अब्ज खर्चापेक्षा खूप जास्त आहे. तसंच, कंपनीने २०२७ च्या आर्थिक वर्षासाठीचा आपला भांडवली खर्चाचा अंदाज ९० अब्ज ते ९५ अब्ज इतका कायम ठेवला आहे.
ओरॅकलच्या मेलमध्ये नक्की काय म्हटलंय?
दरम्यान, ओरॅकलने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलचे स्क्रिनशॉट एक्सवर व्हायरल होत आहेत. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना ईमेलमध्ये नेमकं काय म्हटलंय हे समोर आलंय. परंतु, या ईमेलबाबत कोणतीही सत्यता समोर आलेली नाही.
आपल्या पदासंदर्भात काही कठीण बातमी आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत. ओरॅकलच्या सध्याच्या व्यावसायिक गरजांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर, व्यापक संघटनात्मक बदलांचा एक भाग म्हणून आपले पद समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजचा दिवस हा आपला कंपनीतील शेवटचा कामकाजाचा दिवस असेल. ओरॅकलमध्ये आपल्या कार्यकाळात दिलेल्या समर्पणाबद्दल, मेहनतीबद्दल आणि संस्थेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
आपण आपल्या सेवासमाप्तीशी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर, सेवासमाप्ती योजनेतील नियम व अटींनुसार सेव्हरन्स पॅकेज (नोकरी समाप्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभ) मिळण्यास पात्र ठराल. आपल्या सेवासमाप्तीच्या तारखेसह सेव्हरन्स पॅकेजबाबतची सविस्तर माहिती आपल्या ओरॅकल ई-मेल पत्त्यावर DocuSign कडून ई-मेलद्वारे पाठवण्यात येईल.
तातडीने करणे आवश्यक
पुढील महत्त्वाची माहिती, वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि या संक्रमणाच्या काळात आपल्याला मदत करणारी सेवासमाप्तीशी संबंधित कागदपत्रे मिळण्यासाठी आपण आपला वैयक्तिक ई-मेल पत्ता देणे आवश्यक आहे. कृपया येथे क्लिक करून आपला वैयक्तिक ई-मेल पत्ता तातडीने नोंदवा. माहिती भरताना काही चूक झाल्यास, कृपया नवीन फॉर्म पुन्हा भरून सबमिट करा.
कृपया नोंद घ्या: आपला वैयक्तिक ई-मेल पत्ता केवळ सेवासमाप्तीशी संबंधित माहिती आणि सेव्हरन्स कराराबाबतच्या पत्रव्यवहारासाठी वापरला जाईल.
आपल्या संगणकावरील प्रवेश, ई-मेल, व्हॉइसमेल आणि फाइल्सचा अॅक्सेस लवकरच बंद करण्यात येईल आणि त्यानंतर आपण आपल्या संगणकावर लॉग इन करू शकणार नाही. तसंच, ओरॅकलची कोणतीही गोपनीय माहिती डाउनलोड करणे, कॉपी करणे किंवा स्वतःकडे ठेवणे आपल्याला प्रतिबंधित आहे. संस्थेसाठी दिलेल्या आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद. आपल्याला आणखी काही प्रश्न असल्यास, कृपया Ask HR पेजद्वारे HR टीमशी संपर्क साधा.
