वृत्तसंस्था, मुंबई/सॅन फ्रान्सिस्को : क्लाउड संगणन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील व्यवसाय वेगाने वाढत असतानाही अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज ‘ओरॅकल कॉर्पोरेशन’ने सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कंपनीच्या जागतिक कर्मचाऱ्यांच्या सुमारे १८ टक्के मनुष्यबळावर या निर्णयाचा परिणाम होणार असून, १ ते १५ जून २०२६ दरम्यान या कर्मचाऱ्यांचा कंपनीतील शेवटचा दिवस असणार आहे.

 विशेष म्हणजे, कंपनीने आर्थिक आघाडीवर दमदार कामगिरी केली असताना आणि तिचा नफा वेगाने वाढत असतानाच ही महाकाय टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या तिसऱ्या तिमाहीत ओरॅकलने अपेक्षेपेक्षा चांगले निकाल जाहीर केले. कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर २२ टक्क्यांनी वाढून १७.२ अब्ज डॉलरवर पोहोचला, तर क्लाउड व्यवसायातील महसूल ४४ टक्क्यांनी वाढून ८.९ अब्ज डॉलर झाला.

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील वाढ आणखी वेगवान राहिली. ओरॅकल क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरच्या एआय विभागाने २४३ टक्क्यांची वाढ नोंदवली, तर मल्टी-क्लाउड डेटाबेस व्यवसायातील महसूल तब्बल ५३१ टक्क्यांनी वाढला. तिमाहीतील कंपनीचा निव्वळ नफा ३.७ अब्ज डॉलर राहिला. तरीही कंपनीने कर्मचारी कपातीचा मार्ग स्वीकारला आहे.

कर्मचारी कपातीमागील मुख्य कारण काय?

व्यवस्थापनाच्या मते, भविष्यातील वाढ एआय आणि क्लाउड पायाभूत सुविधांमधून होणार असल्याने संसाधनांचे पुनर्विनियोजन आवश्यक आहे. यासाठी कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये जवळपास ५० अब्ज डॉलरची भांडवली गुंतवणूक करण्याची योजना आखली असून, त्यातील बहुतांश निधी एआय डेटा सेंटर आणि क्लाउड पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी खर्च केला जाणार आहे. ओरॅकल ही ‘ओपनएआय’ आणि सॉफ्टबँक समूहाचे पाठबळ असलेल्या ‘स्टारगेट’ या महत्त्वाकांक्षी एआय पायाभूत सुविधा प्रकल्पातील प्रमुख भागीदारांपैकी एक आहे. त्यामुळे वाढत्या संगणकीय क्षमतेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनी एआय-केंद्रित व्यवसायांवर अधिक भर देत आहे. थोडक्यात, कंपनी आता मानवी श्रमापेक्षा एआय पायाभूत सुविधांना अधिक प्राधान्य देत आहे.

दरम्यान, कर्मचारी कपातीमुळे प्रभावित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सेवाकालावर आधारित भरपाईची तरतूद असली तरी न मिळालेल्या समभाग लाभांबाबत काही कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. अधिक चांगल्या भरपाईसाठी काही कर्मचाऱ्यांनी याचिकाही केली होती; मात्र कंपनीने आपल्या धोरणात बदल करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्दे

ओरॅकलकडून सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात अपेक्षित

जागतिक मनुष्यबळाच्या सुमारे १८ टक्क्यांवर परिणाम

महसूल २२ टक्क्यांनी वाढून १७.२ अब्ज डॉलर

क्लाउड व्यवसायात ४४ टक्के, एआय विभागात २४३ टक्के वाढ

एआय आणि डेटा सेंटर विस्तारासाठी ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक

आर्थिक कामगिरी मजबूत असतानाही खर्चाचे पुनर्संतुलन करण्याचा निर्णय

कर्मचारी संघटनांकडून भरपाईबाबत नाराजी व्यक्त