ओयो जागतिक ट्रॅव्हल टेक युनिकॉर्न कंपनी ओयोची मूळ कंपनी प्रिझमला ६,६५० कोटी रुपयांचा प्रारंभिक समभाग विक्री प्रस्ताव (आयपीओ) आणण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. या आयपीओमुळे कंपनीचे मूल्यांकन ७ ते ८ अब्ज डॉलरवर पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रिझमने डिसेंबर २०२५ मध्ये गोपनीय मार्गाने (कॉन्फिडेन्शियल प्री-फायलिंग रूट) सेबीकडे आयपीओसाठी प्राथमिक कागदपत्रे सादर केली होती. त्यापूर्वी २० डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या असाधारण सर्वसाधारण बैठकीत (ईजीएम) भागधारकांनी ६,६५० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्यास मंजुरी दिली होती.

गोपनीय मार्गाचा अवलंब केल्यामुळे कंपनीला मसुदा कागदपत्रे सार्वजनिक न करता सेबीकडून प्राथमिक अभिप्राय घेण्याची सुविधा मिळाली. आता पुढील टप्प्यात कंपनी जुलैच्या सुरुवातीला अद्ययावत मसुदा प्रस्ताव दाखल करण्याची शक्यता आहे. प्रिझम सध्या भारत, अमेरिका आणि युरोप या प्रमुख बाजारपेठांमध्ये विस्तार वाढवत असून स्वमालकीच्या हॉटेल्सवर अधिक भर देत आहे.

संडे हॉटेल्स आणि पॅलेट हॉटेल्स यांसारख्या नाममुद्रांचा विस्तार करत आहे. याशिवाय युरोपियन ब्रँड डॅनसेन्टरच्या माध्यमातून गोव्यात व्हिला भाड्याने देण्याच्या व्यवसायातही कंपनीने प्रवेश केला आहे. देशातील धार्मिक पर्यटनाला मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादाचा लाभ घेण्यासाठी कंपनीने प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्येही उपस्थिती वाढविली आहे.

तिसऱ्या प्रयत्नात यश

ओयोने यापूर्वीही शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याचा प्रयत्न केला होता. २०२१ मध्ये कंपनीने ८,४३० कोटी रुपयांचा आयपीओ आणण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी कंपनीचे मूल्यांकन सुमारे १२ अब्ज डॉलर अपेक्षित होते. त्यानंतर २०२३ मध्ये सुधारित आर्थिक आणि व्यावसायिक माहितींसह नव्याने प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. मात्र, जागतिक बाजारातील अस्थिरता आणि गुंतवणूकदारांच्या कमकुवत भावनेमुळे कंपनीने आयपीओचा निर्णय मागे घेतला होता.

सेबीचे माजी अध्यक्ष अजय त्यागी मंडळावर!

आयपीओच्या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेट गव्हर्नन्स अधिक मजबूत करण्यासाठी प्रिझमने सेबीचे माजी अध्यक्ष अजय त्यागी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या भांडवली बाजारातील दीर्घ अनुभवाचा कंपनीला थेट फायदा होणार आहे. आयपीओच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी कंपनीने ॲक्सिस कॅपिटल, सिटीबँक, गोल्डमन सॅक्स, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि एसबीआय कॅप्स यांसारख्या बड्या वित्तीय संस्थांची ‘बुक-रनिंग लीड मॅनेजर्स’ म्हणून नियुक्ती केली आहे. चालू बाजारपेठेतील परिस्थिती पाहून कंपनी लवकरच आयपीओची तारीख जाहीर करेल.