इस्लामाबाद:  पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारे तीव्र चढ-उतार लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील इंधन दरवाढीचा ताण कमी करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता दररोज (Daily) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुधारल्या जातील, अशी घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे.

फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इराण दरम्यान युद्ध सुरू झाल्यापासून तेलाचे दर आठवड्याला (Weekly) निश्चित केले जात होते. त्यापूर्वी हे दर दर १५ दिवसांनी बदलले जात असत. मात्र, आता त्यात बदल करून दररोज भाव ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात सुद्धा जागतिक पातळीवरील तेलाच्या दरानुसार इंधनाचे दर जोडण्यात आले आहेत. मात्र जागतिक पातळीवरील खनिज तेलाच्या दरानुसार त्यात चढ-उतार होत नाहीत.

पाकिस्तानमध्ये आता दररोज पेट्रोल-डिझेलचे दर बदलणार आहेत, असे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक आणि माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी शुक्रवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

‘ओग्रा’कडे जबाबदारी, संपूर्ण गणित जाहीर करणार

पेट्रोलियम मंत्री मलिक यांनी सांगितले की, कॅबिनेटने आता इंधनाचे दर ठरवण्याचे काम देशातील तेल आणि वायू नियामक प्राधिकरण असणाऱ्या ‘ओग्रा’ (OGRA) कडे सोपवले आहे. ओग्रा केवळ नवीन दरच आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणार नाही, तर प्रत्येक पेट्रोल पंपावर दिसणाऱ्या किमतींमागे कोणती कारणे आणि घटक कारणीभूत आहेत, याचे संपूर्ण गणितही जनतेसमोर मांडेल. आंतरराष्ट्रीय बाजारातील ७ दिवसांच्या साप्ताहिक सरासरीच्या आधारे हे दैनंदिन दर निश्चित केले जातील.

डीरेग्युलेशनच्या दिशेने पाऊल टाकत आता कोणाचाही सल्ला न घेता आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींनुसार थेट किंमत बदलली जाईल. यामुळे सिस्टीम अधिक पारदर्शक होईल आणि लोकांना इंधन दरवाढ का अपरिहार्य आहे, हे समजण्यास मदत होईल, असा दावा सरकारने केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त होऊनही त्याचा फायदा जनतेपर्यंत पोहोचवण्यास उशीर होत असल्याच्या टीकेनंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

तुर्कीची कंपनी पाकिस्तानमध्ये करणार तेल उत्खनन

या पत्रकार परिषदेत पेट्रोलियम मंत्र्यांनी देशातील ऊर्जा उत्खनन वाढवण्यासाठी घेतलेल्या निर्णयांवरही प्रकाश टाकला. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या नुकत्याच झालेल्या तुर्की दौऱ्यानंतर, तुर्कीची राष्ट्रीय तेल आणि वायू कंपनी ‘तुर्किश पेट्रोलियम’ तब्बल २० वर्षांच्या खंडानंतर आगामी ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानमध्ये तेल आणि वायू उत्खननासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माहिती मंत्री तरार यांनी नमूद केले की, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेल दरवाढ ही प्रादेशिक परिस्थिती बिघडल्यामुळे झाली आहे.

पेट्रोल पंप चालकांचा आंदोलनाचा इशारा; १५,००० पंप बंद होण्याची भीती

दुसरीकडे, सरकारच्या या नव्या धोरणाला देशातील पेट्रोल पंप चालकांनी तीव्र विरोध केला आहे. ‘ऑल पाकिस्तान पेट्रोल पंप ओनर्स असोसिएशन’ने हे नवीन डीरेग्युलेशन धोरण पूर्णपणे फेटाळून लावले असून पुढील आठवड्यात संप आणि निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. असोसिएशनचे उपाध्यक्ष नोमान अली बट यांनी एका व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे की, सरकारने आपल्या समस्यांचे ओझे पेट्रोल पंप चालकांवर टाकू नये आणि या धोरणाचा पुनर्विचार करावा. “तेल विपणन कंपन्यांसोबत दर निश्चित करण्यापूर्वी सर्व भागधारकांना विश्वासात घेतले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. या धोरणामुळे तेल टँकर्स, वाहतूक व्यवस्था आणि संपूर्ण किंमत यंत्रणेवर मोठा परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करत देशातील सुमारे १५,००० पेट्रोल पंप चालकांमध्ये याबद्दल तीव्र चिंता असल्याचे बट यांनी सांगितले.