इस्लामाबाद: शेजारील देश पाकिस्तानमधील आर्थिक संकट आणि महागाईचा भस्मासूर आता इतका उग्र झाला आहे की, तिथल्या सर्वसामान्यांना केवळ जिवंतपणीच नव्हे, तर मृत्यूनंतरही या छळाला सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक अहवालानुसार, पाकिस्तानात अंत्यविधी आणि दफनविधीचे साहित्य इतके महागले आहे की, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आपल्या प्रियजनांच्या अंतिम संस्कारांसाठी चक्क नातेवाईक किंवा मित्रांकडून कर्ज काढावे लागत आहे.

‘दि एक्स्प्रेस ट्रिब्यून’ आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार, केवळ अन्न आणि विजेच्या बिलांनीच नव्हे, तर वाढलेले कर आणि स्मशानभूमीतील जागेच्या तुटवड्यामुळे आता पाकिस्तानात मरणही अत्यंत महाग झाले आहे.

एका अंत्यसंस्काराचा खर्च लाखाच्या घरात

काही वर्षांपूर्वीपर्यंत शेजारी आणि स्थानिक स्वयंसेवक विनामूल्य कबर खोदण्याचे किंवा अंत्यसंस्काराचे काम सामाजिक भावनेतून करत असत. मात्र, आता महागाईमुळे ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. रावळपिंडी आणि इस्लामाबाद यांसारख्या शहरांमध्ये एका अंत्यसंस्काराचा एकूण खर्च ५०,००० ते १,००,००० रुपयांच्या (पाकिस्तानी रुपये) घरात पोहोचला आहे.

कफन आणि पूजेचे साहित्य: अंत्यसंस्कारासाठी लागणारे कफन, कापूर, गुलाबपाणी आणि सुगंधी द्रव्यांची किंमत थेट ८,००० ते १०,००० रुपयांवर गेली आहे. प्रमुख शहरांमधील तब्बल ४४ हून अधिक दफनभूमी पूर्णपणे भरल्या आहेत. त्यामुळे कबरीसाठी जागा मिळवणे हे मोठे आव्हान बनले असून, एका जागेसाठी १५,००० ते ४५,००० रुपयांची मागणी केली जात आहे. कबर खोदणारे मजूर आता एका कबरीसाठी ५,००० रुपये आकारत आहेत, तर मृतदेहाला पारंपरिक स्नान घालण्यासाठी १,५००० रुपयांपर्यंत मजुरी घेतली जात आहे.

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले; २/३ उत्पन्न केवळ जगण्यासाठी

पाकिस्तान सरकारच्या अलीकडील ‘हाऊसहोल्ड इंटिग्रेटेड इकॉनॉमिक सर्व्हे’नुसार, तिथली कुटुंबे आपल्या एकूण उत्पन्नातील तब्बल ६३ टक्के भाग केवळ अन्नधान्य आणि वीज-गॅसच्या बिलांवर खर्च करत आहेत. यामध्ये अन्नधान्यासाठी ३७ टक्के तर वीज आणि घरासाठी २६ टक्के खर्च होतो. यामुळे शिक्षण, आरोग्य यांसारख्या गोष्टींसाठी केवळ अडीच टक्के बजेट उरत आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार जून महिन्यात महागाईचा दर काहीसा स्थिर म्हणजेच ११ टक्क्यांवर दाखवला जात असला, तरी गेल्या ३ वर्षांत झालेल्या ४० टक्क्यांच्या दरवाढीमुळे वस्तूंचे मूळ भाव आधीच आभाळाला भिडले आहेत. परिणामी, अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय किंवा मृत्यूच्या खर्चाचा भार पेलणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

दफनभूमीतील जागेचे राजकारण

रावळपिंडीतील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहनिर्माण संस्थांच्या चुकीच्या नियोजनामुळे शहरांमध्ये दफनभूमीसाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. पैशांच्या जोरावर श्रीमंत लोक आगाऊ जागा आरक्षित करत असल्यामुळे गरिबांना आपल्या मृत नातेवाईकांना दफन करण्यासाठी जागा शोधताना वणवण भटकावे लागत आहे. अनेक ठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने जुन्याच कबरींवर पुन्हा दफनविधी उरकले जात असल्याच्या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटी पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात करांचे प्रमाण आणखी वाढवले आहे. त्यामुळे येत्या काळात अन्नधान्यासोबतच मरण अधिक क्लेशदायक आणि महाग होण्याची भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.