मुंबई : जागतिक स्तरावर भारताचा शेअर बाजार हा आकार, गुंतवणूकदारांची संख्या आणि बाजार भांडवलाच्या दृष्टीने पाकिस्तानपेक्षा कितीतरी मोठा मानला जातो. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत परताव्याच्या बाबतीत पाकिस्तानच्या KSE-100 निर्देशांकाने भारतीय बाजाराला मागे टाकल्याचे चित्र दिसत आहे.
पाकिस्तानचा शेअर बाजार आकाराने अत्यंत छोटा आहे. भारताचे एकूण बाजार भांडवल सुमारे ५ ट्रिलियन डॉलरच्या आसपास असताना पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजचे मूल्यांकन अवघ्या २० अब्ज डॉलरच्या आसपास असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तरीही परताव्याच्या बाबतीत पाकिस्तानने अलीकडच्या काळात जोरदार कामगिरी केली आहे. २०२४ मध्ये KSE-100 निर्देशांकाने तब्बल ८४ टक्क्यांहून अधिक परतावा दिला, तर त्याच काळात सेन्सेक्सने सुमारे ८ टक्क्यांची वाढ नोंदवली. २०२३ मध्येही पाकिस्तानचा निर्देशांक ५४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढला होता, तर सेन्सेक्सची वाढ सुमारे १९ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली.
FY25 मध्येही पाकिस्तानचा KSE-100 निर्देशांक जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बाजारांपैकी एक ठरला. डॉलरमधील परताव्याच्या आधारावर त्याने अमेरिका, भारत आणि जर्मनीसारख्या बाजारांनाही मागे टाकल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे भारतातील बाजाराने दीर्घकालीन स्थिरता आणि मजबूत अर्थव्यवस्थेच्या आधारावर चांगली कामगिरी कायम ठेवली असली, तरी २०२५ मध्ये भारतीय निर्देशांकांची वाढ जागतिक बाजारांच्या तुलनेत कमी राहिल्याचे अनेक आंतरराष्ट्रीय अहवालांनी नमूद केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानच्या बाजारातील वेगवान वाढीमागे कमी बेस, बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील तेजी, तसेच परदेशी गुंतवणूकदारांच्या निवडक खरेदीचा मोठा वाटा आहे. मात्र या बाजारात अस्थिरता आणि जोखीमही अधिक असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.
किती मोठा फरक?
भारताचा शेअर बाजार सुमारे ५ ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक बाजार भांडवलासह जगातील सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक आहे. त्याच्या तुलनेत पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजचे एकूण मूल्यांकन अवघ्या काही दशलक्ष डॉलरच्या पातळीवर आहे. म्हणजेच आकाराच्या दृष्टीने भारतीय बाजार पाकिस्तानपेक्षा अनेक पटींनी मोठा आहे.
तरीही परताव्यात पाकिस्तानने जोरदार मुसंडी मारली आहे.
वर्ष—–पाकिस्तान KSE-100—– भारत सेन्सेक्स
२०२३—५४% पेक्षा अधिक वाढ— सुमारे १९% वाढ
२०२४—-८४% पेक्षा अधिक वाढ— सुमारे ८% वाढ
२०१५—- ५१ %वाढ—- तुलनेने मर्यादित वाढ
पाकिस्तानचा बाजार एवढा का वाढला?
- अत्यंत कमी मूल्यांकन: पाकिस्तानातील अनेक शेअर्स अतिशय स्वस्त मूल्यांकनावर ट्रेड करत आहेत .
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची मदत आणि आर्थिक स्थिरतेची अपेक्षा: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) मदतीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.
- व्याजदर कपात: पाकिस्तानमध्ये व्याजदर कमी होण्यास सुरुवात झाल्याने इक्विटीमध्ये पैसे वळले.
- कमी बेस इफेक्ट: बाजार आधी खूप खाली आल्याने त्यातून recovery वेगाने झाली.
- ऊर्जा आणि बँकिंग क्षेत्रातील तेजी: या क्षेत्रातील कंपन्यांनी निर्देशांकाला मोठा आधार दिला.
पण जोखीमही तितकीच मोठी
पाकिस्तानच्या बाजाराने मोठा परतावा दिला असला, तरी तो अत्यंत अस्थिर बाजार मानला जातो. राजकीय अनिश्चितता, चलन अवमूल्यन, महागाई आणि परकीय चलन तुटवडा यांसारखे धोके अजूनही कायम आहेत. २०२६ मध्ये KSE-100 मध्ये एका दिवसात जवळपास १० टक्क्यांची घसरण झाल्याची नोंदही आहे.
भारताची स्थिती अजूनही मजबूत
दीर्घकालीन दृष्टीने पाहिल्यास भारताचा बाजार अधिक स्थिर आणि विश्वासार्ह मानला जातो. मजबूत अर्थव्यवस्था, सातत्याने वाढणारे SIP inflows, मोठा retail participation आणि कॉर्पोरेट नफ्यातील वाढ यामुळे भारत अजूनही जागतिक गुंतवणूकदारांचा पसंतीचा बाजार आहे. मात्र अल्पकालीन परताव्यांच्या शर्यतीत पाकिस्तानने दिलेली कामगिरी अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली आहे.
