पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेली आव्हाने असूनही, देशांतर्गत मागणीतील जोरदार वाढीमुळे कंपन्यांकडून वितरकांकडे रवानगी झालेल्या प्रवासी वाहनांच्या संख्येने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १२,७३,८११ वाहनांचा विक्रमी उच्चांकी स्तर गाठला. वार्षिक तुलनेत ही २५.९ टक्क्यांची वाढ आहे, अशी माहिती उद्योग संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स अर्थात ‘सियाम’ने बुधवारी दिली.
मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत प्रवासी वाहनांचे वितरण १०,११,८८४ वर मर्यादित होते. या आधी २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत वाहन निर्मात्यांकडून वितरकांना रवानगी केली गेलेली १०.३ लाख वाहने ही आजवर कोणत्याही आर्थिक वर्षाच्या तिमाहीतील सर्वाधिक स्तर होता, असे ‘सियाम’ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.दुचाकी वाहनांच्या वितरणात पहिल्या तिमाहीत २०.३ टक्क्यांची वाढ होऊन ती संख्या ५६,२८,६७५ दुचाकींवर पोहोचली आहे; मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या ४६,७७,९९० दुचाकी होती.
तीन-चाकी वाहनांच्या वितरणानेही पहिल्या तिमाहीत आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली असून ती संख्या २,१४,३३९ इतकी आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील १,६५,२११ तीन चाकींच्या तुलनेत यंदा २९.७ टक्क्यांची वाढ झाली आहे.सियामच्या मते, २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत वाणिज्य वाहनांच्या विक्रीनेही उच्चांक गाठला असून, एकूण २.६५ लाख वाहनांची विक्री झाली आहे; मागील वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यात १८.३ टक्क्यांची वाढ झाली आहे.पश्चिम आशियातील तणावामुळे स्थिती आव्हानात्मक असूनही, २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत विविध श्रेणींमध्ये चांगली कामगिरी दिसून आली.
याचे श्रेय देशांतर्गत मागणीला जाते, ज्याला कमी जीएसटी दर, कर्जाचा कमी खर्च, आणि नवीन वाहन श्रेणीची उपलब्धता या गोष्टींची मदत झाली आहे. सध्या ग्राहकांचा एकूण कल आणि मागणी स्थिर असली तरी, भू-राजकीय घडामोडी आणि मान्सूनची प्रगती यांवर उद्योग क्षेत्राचे बारकाईने लक्ष आहे. कारण कृषी उत्पादन आणि ग्रामीण भागातील मागणीवर त्यांचे परिणाम होऊ शकतात, असे सियामचे अध्यक्ष शैलेश चंद्र यांनी सांगितले.विद्यमान वर्षातील जून महिन्यात कंपन्यांकडून वितरकांकडे पाठवण्यात आलेल्या प्रवासी वाहनांच्या संख्येत वार्षिक आधारावर २४.१ टक्क्यांनी वाढ होऊन ती ३,८८,१४४ प्रवासी वाहनांवर पोहोचली; गेल्या वर्षी याच महिन्यात ही संख्या ३,१२,८५१ वाहने होती.
तसेच, गेल्या महिन्यात दुचाकींच्या एकूण विक्रीत १८.६ टक्क्यांनी वाढ होऊन ती १८,५१,४०० दुचाकी झाली, जी मागील वर्षीच्या जूनमध्ये १५,६१,२८३ होती, अशी माहिती सियामने दिली.सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने मागणीतील सातत्य कायम राहण्याची अपेक्षा आहे. मात्र कच्च्या मालाच्या (कमोडिटी) वाढत्या किमती उद्योगासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. पश्चिम आशियातील पूर्वीच्या युद्धविरामामुळे गॅस, इंधन आणि इतर वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली असली, तरी उद्योगक्षेत्र अलीकडील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. एकंदरीत, जीएसटी २.० चा प्रभाव आणि कमी दरात उपलब्ध असलेले कर्ज यामुळे वाहनांच्या किमती मर्यादित राहिल्या आहेत आणि या गोष्टी मागणी वाढवण्यास मदत करत आहेत, असे वाहन उद्योगाच्या या संघटनेने म्हटले आहे.
