पेटीएमच्या युरोपातील उपकंपनी असलेल्या ‘पेटीएम युरोप पेमेंट्स’ला लक्झेंबर्गच्या वित्तीय नियामकाकडून ‘पेमेंट इन्स्टिट्यूशन’चा परवाना मिळाला आहे. लक्झेंबर्गचे वित्तीय नियामक असलेल्या ‘कमिशन डी सर्व्हिलन्स डु सेक्टर फायनान्शियर’ने ‘पेटीएम युरोप पेमेंट्स एसए’साठी हा परवाना मंजूर केला असून, अधिकृत ‘पेमेंट इन्स्टिट्यूशन्स’च्या यादीत कंपनीची नोंदणी केली आहे.मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, हा परवाना तेथील विशिष्ट वित्तीय सेवांच्या अंमलबजावणीसाठी बहाल केला गेला आहे.
ज्यामध्ये देयक व्यवहारांची अंमलबजावणी, वापरकर्त्याचे देयक सेवा प्रदात्याकडे किंवा दुसऱ्या देयक सेवा प्रदात्याकडे असलेल्या देयक खात्यावरील निधीचे हस्तांतरण समाविष्ट आहे. तसेच देयक सेवा वापरकर्त्यासाठी कर्ज सुविधेद्वारे निधी उपलब्ध असलेल्या व्यवहारांची अंमलबजावणी, व्यापाऱ्यांसाठी पेमेंट स्वीकारण्याची सुविधा देणे यांसारख्या सेवांचा यात समावेश आहे.
जानेवारी २०२६ मध्ये लक्झेंबर्गमध्ये स्थापन झालेली ‘पेटीएम युरोप पेमेंट्स एसए’ ही ‘पेटीएम क्लाउड टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ची (पीसीटीएल) पूर्ण मालकीची उप-कंपनी आहे; आणि ‘पीसीटीएल’ ही स्वतः ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ची पूर्ण मालकीची भारतीय उप-कंपनी आहे.
