डॉ. वीरेंद्र ताटके
Personal finance tips :
सध्याच्या बदलत्या आर्थिक वातावरणात प्रत्येक कुटुंबाला आपले आणि मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य आर्थिक नियोजनाची गरज आहे. लाईफ इन्शुरन्सपासून ते म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) आणि एनपीएस रिटायरमेंट प्लॅनिंगपर्यंत सर्व स्तरांवर आर्थिक शिस्त बाळगणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे.

व्हय महाराजा…
आता सध्याची आर्थिक परिस्थिती बघून सगळे बिझनेसमन, सॅलरीवाले, पोराटोरा, म्हातारे-कोतारे… राजकारणी, शेतकरी, व्यापारी, श्रीमंत, गरीब आणि ही वाचक मंडळी आपलं आर्थिक नियोजन करून ऱ्हायलेत… त्येंचो तू नेहमी सांभाळ कर बा देवा महाराजा…

व्हय महाराजा…!
आणि सगळ्यांच्या मागे जी काय आर्थिक इडा-पिडा असत, वाकडा नाकडा असत ता दूर कर रे राजा…

व्हय महाराजा…!
सध्याच्या बदलत्या आर्थिक वातावरणात सगळ्यांच्या मनातल्या शंका आणि चुकीच्या समजुती जळान खाक होऊ दे… नि सर्वांना चांगली आर्थिक बुद्धी दे रे राजा…
आर्थिक नियोजन नीट केलं तर आपलं आणि पोराटोरांचं कल्याण होतं हे सर्वांना कळू दे बा महाराजा…

व्हय महाराजा…!
ज्यांनी कोणी अजून आपल्या लाइफ इन्शुरन्सची पॉलिसी उतरवली नसल त्यांना पॉलिसी उतरायची बुद्धी दे रे महाराजा… लाइफ इन्शुरन्स या गोष्टींकडं गंभीरपणे बघण्याची नजर सर्वांना मिळू दे आणि घरातल्या प्रत्येक कमावत्या माणसाची आणि तरुण माणसाची इन्शुरन्स पॉलिसी उतरवण्याची बुद्धी दे रे महाराजा…

व्हय महाराजा…!
ज्यांनी कोणी मेडिक्लेमची तरतूद केली नसलय त्याला त्याचे महत्त्व पटू दे… आणि स्वतःसोबत अख्ख्या फॅमिलीचा मेडिक्लेम करून घेण्याची बुद्धी त्याला दे रे महाराजा…

व्हय महाराजा…!
आपल्या फॅमिलीचं बजेट करण्याची ताकद प्रत्येक फॅमिलीला मिळू दे… आणि त्या बजेटप्रमाणं प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची ताकदसुद्धा त्यांना मिळू दे महाराजा…

व्हय महाराजा…!
ज्यांना कुणाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल त्यांना पीपीएफ आणि पोस्टाच्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची बुद्धी होऊ दे रे राजा.
ज्यांना कुणाला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असल त्यांना एनपीएसचं खातं उघडण्यासाठी योग्य रस्ता दाखव रे महाराजा…

व्हय महाराजा…!
शेअर बाजार पडला की घाबरून न जाण्याची ताकद गुंतवणूकदारांना दे रे राजा
आणि चांगल्या कंपनीचे शेअर नेहमी खरेदी करण्याची इच्छा त्यांना होऊ दे रे राजा
आणि टिप्स घेऊन सट्टा खेळण्याची बुद्धी नको देऊ रे महाराजा…

व्हय महाराजा…!
म्युच्युअल फंडातली एसआयपी करण्याची इच्छा प्रत्येकाला होऊ दे आणि ती एसआयपी लाँगटर्मसाठी सुरू ठेवण्याची कृपा ठेव रे राजा… ज्यांचे कोणाची एसआयपी बंद पडली असल त्याला ती एसआयपी पुन्हा सुरू करण्याची बुद्धी दे रे महाराजा…

व्हय महाराजा….!
सध्याच्या काळात सेन्सेक्स आणि निफ्टी गुण्यागोविंद्यान नांदू दे रे महाराजा…

सगळ्यो गुंतवणूकदार, सगळी माणसांका आर्थिक प्रगती होऊ दे रे महाराजा….

आणि सगळ्यांच्या आर्थिक आयुष्यातली क्लेश आणि वृत्ती जळून खाक होव दे रे महाराजा…

व्हय महाराजा, व्हय महाराजा, व्हय महाराजा…!

लेखक पुणेस्थित इंदिरा ग्लोबल बिझनेस स्कूलचे संचालक आहेत.