31 Year Old 7 Crore Net Worth FIRE Strategy : अलीकडच्या काळात तरुण वयात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत निवृत्त होण्याचा ट्रेंड वाढत आहे. अशी अनेक उदाहरणे सोशल मीडियावर व्हायरल झालेली तुम्ही वाचली किंवा पाहिली असतील. या तरुणांनी हे कसं साध्य केलं? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते. असेच एक उदाहरण आता समोर आलं असून ३१ वर्षीय तरुणाने आपलं संपूर्ण आर्थिक नियोजन उघड केलं आहे. त्याने केवळ योग्य नियोजन आणि कमाईचे अतिरिक्त मार्ग शोधून ७ कोटी रुपयांचे आर्थिक साम्राज्य उभे केले आहे.
‘माइंडसेट’ने बदलले आयुष्य
या तरुणाने जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्याचे उत्पन्न सामान्यच होते. मात्र, यात सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याने केली ती म्हणजे लवकर सुरुवात. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला आयटी कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्या पगारापासून त्याने म्युच्युअल फंडात अगदी छोट्या रकमेपासून एसआयपी सुरू केली. उत्पन्न वाढत असतानाच त्याने गुंतवणुकीची रक्कम देखील वाढवत नेली. परिणामी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी १ कोटी रुपयांचा फंड जमा करण्यात त्याला यश आलं. त्यानंतर ३ वर्षातच या फंडात ५ कोटी रुपये जमा झाले, तर वयाच्या ३१ व्या वर्षी एकूण संपत्ती ७ कोटी रुपये झाली.
पैशांची बचत करण्याला मर्यादा असतात पण…
आपल्या यशाचे सिक्रेट सांगताना तो म्हणाला, “केवळ खर्च कमी करून किंवा पैशांची बचत करून कुणी श्रीमंत होत नाही. बचत करण्याला मर्यादा असतात, पण कमाई वाढवण्याला मर्यादा नसतात. त्यामुळे मी जॉब बदलणे, पदोन्नती मिळवणे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यावर अधिक भर दिला.”
अतिरिक्त उत्पन्नासाठी ‘साइड बिझनेस’ अन् अपयशाची तयारी
आयटी क्षेत्रात काम करताना तरुणामे नवीन उत्पादने तयार करुन काही प्रयोग केले. सॉफ्टवेअर-ॲज-अ-सर्व्हिस आणि D2C (डायरेक्ट-टू-कंझ्युमर) यांसारख्या छोट्या व्यवसायांमध्ये प्रयोग केले. रात्रीच्या वेळी काम करून त्याने एआय वर आधारित एक ॲप तयार केले होते, जे दुर्दैवाने अपयशी ठरले. परिणामी त्याला मार्केटिंगमध्ये काही लाखांचे नुकसान सोसावे लागले. पण, त्याने हार मानली नाही.
पैशांच्या बचतीसाठी सोशल मीडिया सोडलं
सध्याच्या काळात सोशल मीडिया आपल्या जगण्याचा भाग झाली आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत बहुतेक लोक स्मार्टफोनच्या काचेला चिकटलेली पाहायला मिळतात. मात्र, यामुळे नकळत इतराशी तुलना करण्याची सवय लागते. ज्यामुळे अनावश्यक खर्च सुरू होतो, असा तरुणाचा दावा आहे. तो म्हणाला मी इन्स्टाग्रामसारखे ॲप्स डिलीट केल्याने इतरांशी तुलना करण्याची सवय सुटली आणि स्टेटस सिम्बॉलवर होणारा अनावश्यक खर्च आपोआप थांबला. मात्र, तो फक्त पैशांची बचत करतो असे नाही. त्याला फिरण्याची आवड असून त्याने आतापर्यंत १५ हून अधिक देशांना भेटी दिल्या आहेत. तो म्हणतो पैसे कमवताना आयुष्याचाही आनंद घेता आला पाहिजे.
गुंतवणुकीचा ‘पोर्टफोलिओ’ नेमका कसा आहे?
- तो काम करत असलेल्या टेक कंपनीचे २ कोटी रुपयांचे शेअर्स त्याच्याकडे आहेत. पण, शेअर बाजारातील चढउतार गृहीत धरुन याचे मूल्य निव्वळ संपत्तीत फक्त १.५ कोटी रुपये धरले आहेत.
- दोन फ्लॅट्सवरील कर्ज पूर्णपणे फेडून तो आता पूर्णपणे ‘कर्जमुक्त’ झाला आहे. दोन वर्षांपूर्वी ६५ लाखांना घेतलेल्या फ्लॅटचे मूल्य आज १ कोटी झाले असून त्यातून ५ टक्के भाडे उत्पन्न मिळत आहे.
- त्याने अनलिस्टेड शेअर्समध्ये ४० लाख रुपयांची जोखीमयुक्त गुंतवणूक केली आहे. तसेच, रुपयाच्या अवमूल्यनापासून संरक्षणासाठी तो अमेरिकन ब्लू-चिप शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहे.
