अजय वाळिंबे
Action Construction Equipment Share : भारतीय भागभांडवल बाजारात पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपन्यांना मोठी मागणी पाहायला मिळत आहे. यामध्ये क्रेन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी मानल्या जाणाऱ्या ‘ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड’ (ACE Cranes) या शून्य कर्ज असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये आगामी काळात दीर्घकालीन गुंतवणुकीची उत्तम संधी निर्माण झाली आहे.
क्रेनच्या बाजारातील ‘बादशहा’
ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड (बीएसई कोड ५३२७६२)
वेबसाइट: http://www.ace-cranes.com
प्रवर्तक: विजय अगरवाल
बाजारभाव: रु. ११२६/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: अभियांत्रिकी (इंजिनीअरिंग)
भरणा झालेले भाग भांडवल: रु. २३.८२ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ६५.४२
परदेशी गुंतवणूकदार ७.८२
बँक /म्युच्युअल फंड/ सरकार २.५९
इतर/ जनता २४.१७
पुस्तकी मूल्य: रु.१६९
दर्शनी मूल्य: रु.२/-
लाभांश: १००%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ३६.७
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३०.७
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३१.२
डेट इक्विटी गुणोत्तर: ००
इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ३२.२
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (ROCE): ३१.६%
बीटा : १
बाजार भांडवल: रु. १३४१४ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ११९६/७४६
गुंतवणूक कालावधी : ३६ महिने
वर्ष १९९५ मध्ये स्थापन झालेली ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड ही कंपनी हायड्रॉलिक मोबाइल क्रेन, मोबाइल टॉवर क्रेन, फोर्कलिफ्टसारखी बांधकाम क्षेत्रात वापरली जाणारी ‘मटेरियल हँडलिंग’ उपकरणे, बॅकहोर लोडर, कॉम्पॅक्टर व मोटर ग्रेडरसारखी रस्ते बांधणीची उपकरणे आणि ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटर इत्यादी कृषी उपकरणांचे उत्पादन व विपणन करते.
कंपनी जगातील सर्वात मोठी ‘पिक अँड कॅरी’ क्रेन उत्पादक असून भारतातील मोबाइल क्रेन विभागात तिचा ६३ टक्क्यांपेक्षा जास्त आणि देशांतर्गत टॉवर क्रेन विभागात ६० टक्क्यांपेक्षा जास्त बाजारहिस्सा आहे. तसेच, भारतातील फोर्कलिफ्ट विभागातही ती आघाडीच्या ३ कंपन्यांपैकी एक आहे. ॲक्शन कन्स्ट्रक्शनची हरियाणात ३ उत्पादन केंद्रे आहेत. तसेच कंपनीचे भारतातील १२५ हून अधिक ठिकाणी विक्री आणि जाळे विस्तारले असून तिची १३ प्रादेशिक कार्यालय आहेत. कंपनी पश्चिम आशिया, आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील ३७ हून अधिक देशांमध्ये निर्यात करते.
अंतिम वापरकर्त्यांचा विभागनिहाय तपशील – आर्थिक वर्ष २०२६
उत्पादन आणि लॉजिस्टिक्स: ४५%
पायाभूत सुविधा: ३५%
गृहनिर्माण (रिअल इस्टेट): १३%
कृषी: ७%
यंदाच्या आर्थिक वर्षात कंपनीचे ६ टक्के निर्यात तसेच संरक्षण क्षेत्राचा वाटा ६ टक्क्यांवर वर नेण्याचे उद्दिष्ट आहे.
ग्राहक वर्ग
- कंपनीच्या प्रमुख ग्राहकांत एसीसी, टाटा स्टील, एल अँड टी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एअरटेल, बॉश, डाबर, गेल, जीई पॉवर, इफको, जिंदाल स्टील अँड पॉवर, श्री सिमेंट, हॅवेल्स इत्यादीचा समावेश होतो.
- नवीन उत्पादने
- कंपनीने अनेक नवीन उत्पादने सादर केली आहेत, यात एआय-सक्षम सुरक्षा प्रणाली असलेल्या अत्याधुनिक क्रेन, भारतातील पहिली ‘क्लच-लेस ट्रान्समिशन’ क्रेन, ट्रक-माउंटेड एरियल प्लॅटफॉर्म्स, फ्लॅट-टॉप टॉवर क्रेन , बांधकाम क्षेत्रातील एलिव्हेटर्स आणि टँडम रोलर यांचा समावेश करता येईल.
कंपनी संरक्षण क्षेत्रात आपला विस्तार करत आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी कंपनीकडे सुमारे ५७५ कोटी रुपयांचे कार्यादेश (ऑर्डर बुक) आहे, जी एकूण महसुलात सुमारे ३ टक्के वाटा दर्शवते. भविष्यात हा वाटा वाढून अंदाजे ५-६ टक्क्यांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे वार्षिक महसूल २००-२२० कोटी रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत कंपनीचा हा प्रकल्प पूर्ण होईल.
भांडवली खर्च
आर्थिक वर्ष २०२७ मध्ये, कंपनीची सुमारे २०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च करण्याची योजना आहे. यात भविष्यातील विस्तारासाठी जमिनीचा भूखंड मिळवण्याकरिता १३०-१३५ कोटी रुपये, संरक्षण आणि आगामी उत्पादनांसाठी नवीन प्रकल्प उभारण्याकरिता ४०-५० कोटी रुपये आणि देखभाल-दुरुस्तीशी संबंधित भांडवली खर्चासाठी २०-२५ कोटी रुपयांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कंपनी ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त अंदाजित गुंतवणुकीसह ‘टॉवर क्रेन’ निर्मितीचा नवीन प्रकल्प उभारण्याचा विचार करत आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये, कंपनीने ‘संघवी मूव्हर्स लिमिटेड’बरोबर एक सामंजस्य करार केला आहे. या कराराचा उद्देश भारतातील प्रमुख पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांमध्ये स्वदेशी बनावटीच्या ‘हेव्ही स्ल्यू क्रेन’चा (विशेषतः ट्रक क्रेन आणि क्रॉलर क्रेन) वापर आणि उपलब्धता वाढवणे हा आहे.
जून २०२६ अखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने गत वर्षीच्या तुलनेत १९ टक्के वाढीने ७८६ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर याच काळात नक्त नफ्यात देखील २२ टक्के वाढ होऊन तो ११९ कोटींवर नेला आहे. कंपनीने मार्च २०२६ मध्ये ‘काटो वर्क्स’ (जपान) सोबत संयुक्त उपक्रम करार केला. याअंतर्गत ‘एस काटो प्रायवेट लिमिटेड’ नावाने ५०:५० भागीदारीचा संयुक्त उपक्रम स्थापन करण्यात आला, ज्याद्वारे ट्रक क्रेन, क्रॉलर क्रेन आणि रफ-टेरेन क्रेन यांसारख्या हेव्ही क्रेनसाठी एक समर्पित व्यासपीठ तयार करण्यात आले. एप्रिल २०२६ मध्ये, कंपनीने आपला हेव्ही क्रेनचा व्यवसाय ‘स्लंप सेल’ तत्त्वावर या संयुक्त उपक्रमाकडे हस्तांतरित करण्यासाठी व्यवसाय हस्तांतरण कराराला मंजुरी दिली. या संयुक्त उपक्रमातून पुढील ३-४ वर्षांत ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळण्याची कंपनीला अपेक्षा आहे. भविष्यात ‘एबिडटा मार्जिन’ १५ ते १६ टक्क्यांच्या दरम्यान कायम राखण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
अनुभवी प्रवर्तक, कुठलेली कर्ज नसलेली आणि कामगिरीत सातत्य दाखवणार्या या कंपनीचा शेअर सध्या १,१०० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. पायाभूत सुविधांवर आगामी काळात देखील भर राहणार असल्याने ॲक्शन कन्स्ट्रक्शन एक आकर्षक गुंतवणूक ठरू शकेल.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com
वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.
लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
