scorecardresearch

Premium

मार्ग सुबत्तेचा: पोर्टफोलिओची साफसफाई!

आपला पोर्टफोलिओ हा एका बागेसारखा असतो. बाग चांगली फुलली पाहिजे तर तिची वेळोवेळी मशागत तर करावी लागणारच. नको ते रान आणि गवत कापावे लागतेच.

portfolio updated investment mutual fund
पोर्टफोलिओची साफसफाई! (Photo Courtesy- Freepik)

तृप्ती राणे

माझ्या कामाच्या निमित्ताने मला अनेक प्रकारचे पोर्टफोलिओ अभ्यासावे लागतात. मात्र त्यातील सुबक आणि साजेसे पोर्टफोलिओ असणारे गुंतवणूकदार फार कमी असतात. सुबक म्हणजे ७-८ पेक्षा जास्त म्युच्युअल फंड किंवा ३५-४० हून अधिक कंपन्या नसणारे पोर्टफोलिओ आणि साजेसे पोर्टफोलिओ म्हणजे ज्या गुंतवणूकदारांची आर्थिक-मानसिक परिस्थिती आणि बाजाराच्या कलाने बांधलेले असतात. या दोन्ही मापदंडांवर लक्ष ठेवणे सोपे नसते. प्रत्येक गुंतवणूकदाराची अशी इच्छा असते की, त्याचा पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीने वाढावा. त्यातील जोखीम रास्त आणि परतावा उत्तम मिळावा. मात्र आपला पोर्टफोलिओ हा एका बागेसारखा असतो. बाग चांगली फुलली पाहिजे तर तिची वेळोवेळी मशागत तर करावी लागणारच. नको ते रान आणि गवत कापावे लागतेच. शिवाय गरजेनुसार त्याला खतपाणी आणि सूर्यप्रकाश द्यावा लागतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या पोर्टफोलिओच्या बाबतीत काळजी घ्यावी लागते. आजच्या लेखातून आपण हे साध्य कसे करता येईल हे समजून घेऊ या!

how to avoid boiling over milk in marathi
Kitchen jugad video: गृहिणींनो दुधाच्या भांड्यात फक्त एक चमचा रोज न चुकता ठेवा, कायमचं टेन्शन जाईल
Meet Ramesh Babu, the billionaire barber who owns 400 luxury cars, once sold newspapers, slept hungry
कोणतंही काम छोटं नसतं! एकेकाळी पेपर टाकणारा न्हावी कसा झाला ४०० गाड्यांचा मालक?, वाचा यशामागील संघर्ष कहाणी
maharashtra facing economic crisis maharashtra financial crisis funds shortage in Maharashtra
अन्यथा : ..मग सरकार काय करते?
digital wellbeing
Health Special: खऱ्याखुऱ्या तब्येतीसाठी डिजिटल वेलबीइंगचा उतारा

१. नवीन पोर्टफोलिओ बांधताना

एखादा गुंतवणूकदार एक तर छोटी छोटी रक्कम बाजूला काढून गुंतवणूक करतो किंवा एक चांगली रक्कम गोळा करून मग पोर्टफोलिओ बांधतो. म्युच्युअल फंडातील फ्लेक्सिकॅप फंड हे त्यांना जोखीम व्यवस्थापनासाठी जास्त चांगले असतात, हे छोटी पण नियमित गुंतवणूक करणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे. याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे छोट्या रकमेमध्ये जास्त कंपन्यांमध्ये एकाच वेळी गुंतवणूक करता येत नाहीत. म्हणून जोखीम व्यवस्थापन करणारे अवघड होऊन बसते. दुसरे म्हणजे हे फंड लार्ज, मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये हवे तसे पैसे फिरवू शकतात. परिणामी त्यांना जोखीम व्यवस्थापन इतर फंडांच्या तुलनेमध्ये जास्त चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. (बाजारात सर्वच फंडांना जोखीम असते.) थेट गुंतवणूक करणाऱ्या लहान गुंतवणूकदाराला कधी कधी जास्त किमतीचे समभाग घेता येत नाही. जर एखादा गुंतवणूकदार १५,००० रुपये मासिक गुंतवणूक करत असेल तर त्याला सुरुवातीला फक्त २-३ कंपन्यांचे समभाग घेता येतील. आता टायटन किंवा लार्सन अँड टुब्रोचा एक समभाग ३ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा आहे. परिणाम अशा वजनदार कंपन्यांचे समभाग घेता येत नाहीत. त्यापेक्षा एक चांगला फ्लेक्सिकॅप फंड घेतला तर त्याला जास्त चांगले पोर्टफोलिओ व्यवस्थापन करता येईल.

हेही वाचा… Money Mantra : तुमचा पगार येणारे खाते सामान्य खाते झाले आहे का? आता तुम्हाला झिरो बॅलन्सची सुविधा मिळणार की नाही?

मोठी रक्कम जेव्हा हातात असते तेव्हा थेट समभाग गुंतवणूक करणे सोयीचे होते. साधारण २०-२५ कंपन्यांचे समभाग आपल्याकडे जमा करता आले की, त्यातील क्षेत्राचे प्रमाण व्यवस्थित ठेवून पोर्टफोलिओला चांगला आकार देता येतो. पोर्टफोलिओमध्ये ठरावीक क्षेत्रातील ३-४ कंपन्यांचे चांगले समभाग ठेवावे आणि प्रत्येक समभाग पोर्टफोलिओच्या किमान २ टक्के ते जास्तीत जास्त ५ टक्के या प्रमाणात असावा. जेव्हा एखादा समभाग खूपच चांगली कामगिरी करणार असेल, असे वाटत असेल तर त्याचे प्रमाण जास्त ठेवायला हरकत नाही. यासाठी किमान १५ ते २० लाख रुपये असल्यास तसा चांगला पोर्टफोलिओ तयार करता येतो. बाजारातील परिस्थितीनुसार ठरवलेल्या कंपन्या घेतल्या आणि कधीही-काहीही घेण्याच्या मोह टाळला की एक चांगला पोर्टफोलिओ बांधता येतो.

२. जुना पोर्टफोलिओ आवरताना

अनेक गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओमध्ये १० पेक्षा अधिक म्युच्युअल फंड आणि ५० पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली असते. याचे मुख्य कारण म्हणजे पोर्टफोलिओवर नियमित लक्ष ठेवता न येणे. सुरुवात जरी कमी फंड किंवा समभागांनी झाली असली तरीसुद्धा कालांतराने त्यात छोट्या प्रमाणाच्या गुंतवणुका जमा झालेल्या दिसतात. असे पोर्टफोलिओ सांभाळताना नाकीनऊ येता. शिवाय जोखीम कमी होते की नाही हेसुद्धा कळत नाही. असे पोर्टफोलिओ नीट करताना बऱ्यापैकी वेळ आणि भरपूर संयम लागतो. सगळे फंड आणि समभागांची मूळ रक्कम, सध्याची किंमत व फायदा/नुकसान, पोर्टफोलिओतील प्रमाण, बाजार भांडवल आणि क्षेत्र हे एका ठिकाणी लिहून घ्यावे. पोर्टफोलिओमध्ये खूप मोठे प्रमाण असणारे फंड/समभाग (१० टक्क्यांहून अधिक) यांचा आढावा प्रथम घ्यावा. कारण यांच्या कामगिरीचा जास्त प्रभाव पोर्टफोलिओच्या कामगिरीवर होतो. जे फंड आणि समभाग तुमच्या जोखीम क्षमतेनुसार नसतील. तसेच येणाऱ्या काळात ज्यांची कामगिरी चांगली राहण्याची चिन्हे दिसत नसतील, त्यातून एक तर पूर्णपणे बाहेर पडावे किंवा नफा काढून पोर्टफोलिओमधील प्रमाण कमी करावे.

हेही वाचा…. Money Mantra: प्रश्नं तुमचे उत्तरं तज्ज्ञांची; आयपीओ म्हणजे काय?

दोन टक्क्यांपेक्षा कमी प्रमाण असणाऱ्या गुंतवणुका या शक्यतो ‘सॅटेलाइट पोर्टफोलिओ’साठी असतात. इथे थोड्या वेळेत नफा मिळवून बाहेर पडायचे असते. जर अनेक वर्षे ठेवलेली एखादी गुंतवणूक अजूनसुद्धा संपूर्ण पोर्टफोलिओच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी असेल तर ती विकावी किंवा चांगली असेल तर तिचे पोर्टफोलिओमधील प्रमाण वाढवा. ज्या गुंतवणुकीमध्ये नुकसान असेल, तर तिच्यातून जमेल तसे बाहेर पडावे. अनेक वेळा मुद्दल परत मिळवायचीच हा हट्ट आपण धरतो आणि वेळेचे महत्त्व विसरतो. तेव्हा वेळीच नुकसान सहन करून हातात आलेले पैसे चांगल्या पर्यायात गुंतवल्याने फायदा होऊ शकतो.

३. नवीन समभाग किंवा म्युच्युअल फंड घेताना

मी महाविद्यालयात होते तेव्हा तऱ्हे-तऱ्हेचे कपडे घ्यायची मला खूप हौस होती. पण गरजेपेक्षा जास्त घेतलेले कपडे कपाटात ठेवायला नेहमी अडचण व्हायची आणि तेव्हा आई ओरडायची, “अगं, नवीन कपडे आणायच्या आधी जुने काढून कपाटात जागा कर.” पोर्टफोलिओ व्यवस्थापन करताना मला आईचे हे शब्द नेहमी आठवतात. आहे त्या पोर्टफोलिओमध्ये नवीन काही तरी घ्यायच्या आधी हा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःला विचारावा. कोणती जुनी गुंतवणूक काढून नवीन गुंतवणूक करता येईल? असे केल्याने आपोआप पोर्टफोलिओ व्यवस्थित राहतो. अनेकदा आपल्याला मित्रपरिवारातील किंवा कुटुंबातील कोणी तरी सांगतात की, मी आधी घेतलेला हा समभाग मस्त वाढतोय. मग आपण हा समभाग का नाही घेतला, असा प्रश्न पडतो. बाजारात हजारो कंपन्यांचे समभाग आहे. त्यातील एखादा समभाग तुमच्याकडे नसला आणि तरी तुमचा पोर्टफोलिओ चांगली कामगिरी करत असेल तर काळजी करण्याचे कारण काय?

हेही वाचा… Money Mantra: महिन्याच्या अखेरीस निफ्टी 19600च्या वर बंद; फार्मा कंपन्या तेजीत !

बाजारात किंवा कोणतीही गुंतवणूक करताना करासंदर्भात नियम समजून घेणे आवश्यक आहे. नफ्यावर लागणारा कर बाजूला ठेवून किंवा अग्रिम कर (ॲडव्हान्स टॅक्स) भरून उरलेल्या रकमेतून गुंतवणूक करावी. नुकसान असेल तर त्यासमोर किती फायदा त्याच आर्थिक वर्षात ‘सेट-ऑफ’ करता येईल, किती पुढल्या वर्षांमध्ये ‘सेट-ऑफ’साठी वापरता येईल आणि त्यासाठी कशा प्रकारे आणि कधी प्राप्तिकर विवरण भरावे लागेल हे समजून घ्यावे.

ही पोर्टफोलिओची साफसफाई वेळोवेळी केली की, उगीच खंडीभर फंड आणि समभाग गोळा होण्याची शक्यता खूप कमी होते. महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या आजूबाजूच्या परिसराबरोबर आपला पोर्टफोलिओदेखील स्वच्छ आणि सुटसुटीत ठेवू या असा संकल्प आज करू या!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After starting a portfolio it is important to always be updated about its investments print eco news dvr

First published on: 02-10-2023 at 10:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×