सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (बीएसई कोड ५३२८४३) प्रवर्तक: बीएसई संकेतस्थळ: www.cdslindia.com बाजारभाव: रु. १४२०/- प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: डिपॉजिटरी सर्व्हिसेस भरणा झालेले भाग भांडवल: २०९ कोटी शेअर होल्डिंग पॅटर्न (%) प्रवर्तक १५.०० परदेशी गुंतवणूकदार १४.०० बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार २४.९२ इतर/ जनता ४६.०८ पुस्तकी मूल्य: रु. ७० दर्शनी मूल्य: रु. १/- लाभांश: २२०% प्रति समभाग उत्पन्न: रु. २३ किंमत उत्पन्न गुणोत्तर: ६२ समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ६२.३ डेट इक्विटी गुणोत्तर: ० इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ६३२९ रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई): ४०.२ बीटा : १.१ बाजार भांडवल: रु. २९,६८० कोटी (लार्ज कॅप) वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १६६४/५५४ गुंतवणूक कालावधी:  दीर्घकालीन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ही ‘मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्था’ (एमआयआय) असून भारतीय भांडवली बाजार संरचनेचा एक भाग आहे. कंपनी सर्व बाजार सहभागींना -बाजारमंच (एक्सचेंज), क्लिअरिंग कॉर्पोरेशन, डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट-डीपी, इश्युअर्स आणि गुंतवणूकदारांना सेवा प्रदान करते. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लि. (सीडीएसएल) आणि नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लि. (एनएसडीएल) या डिपॉझिटरी सेवा पुरवतात. ज्या माध्यमातून समभाग ‘डिमटेरिअलाइज्ड’ स्वरूपात ठेवण्यासाठी आणि समभागांच्या व्यवहारांसाठी सुविधा देणाऱ्या दोन महत्त्वाच्या संस्था आहेत. सध्या भांडवली बाजारात केवळ सीडीएसएल सूचिबद्ध आहे. सीडीएसएल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात समभाग ठेवत असल्याने समभागांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करणे सुलभ होते, तसेच मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात होणारे व्यवहार सुलभ आणि पारदर्शकपणे पार पडतात. यामध्ये समभाग (इक्विटी), डिबेंचर्स, रोखे (बाँड्स), म्युच्युअल फंडांची युनिट, ठेव प्रमाणपत्रे, कमर्शियल पेपर, ट्रेझरी बिल आणि इतर काही गुंतवणूक साधनांचा समावेश होतो. कंपनीच्या इतर सेवांमध्ये ई-व्होटिंग, एम-व्होटिंग, मायसी मोबाइल ॲप आणि ई-लॉकर यांचा समावेश आहे. कंपनीच्या व्यवसायात मुख्यत्वे (८० टक्के) डिपॉझिटरी व्यवसाय असून यात डिमटेरिअलायझेशन, रीमटेरियलायझेशन, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सिक्युरिटीजचे धारण, हस्तांतरण आणि तारण आणि कंपन्यांना ई-व्होटिंग सेवांचा समावेश होतो. तर इतर व्यवसायात ‘डेटा एंट्री रिपॉजिटरी’ आणि स्टोरेज तसेच भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांच्या ‘केवायसी’ कागदपत्रांची केंद्रीकृत नोंद ठेवणे याचा समावेश होतो. आपल्या विविध सेवा पुरवण्यासाठी कंपनीने सीडीएसएल व्हेंचर, सीडीएसएल इन्शुरन्स रिपॉजिटरी तसेच सीडीएसएल कमॉडिटी रिपॉजिटरी या तीन उपकंपन्यांची स्थापना केली आहे.

हेही वाचा >>>‘ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस’ हेच गुंतवणूक सूत्र!

सीडीएसएल व्हेंचर आज जवळपास ७ कोटी ‘केवायसी रेकॉर्ड’सह देशातील पहिली आणि सर्वात मोठी केवायसी नोंदणी एजन्सी असून सुमारे एक हजार कंपन्यांना रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजेंट सेवा पुरवते. सीडीएसएलकडे ५७२ पेक्षा जास्त नोंदणीकृत डीपी असून १२.९६ कोटींहून अधिक गुंतवणूकदारांचे डीपी अकाऊंट आहेत. सीडीएसएल इन्शुरन्स रिपॉजिटरी लिमिटेड एक ”विमा भांडार” म्हणून काम करते. कंपनीची ४६ आयुर्विमा/आरोग्य आणि सामान्य विमा कंपन्यांसोबत भागीदारी असून १५ लाख विमा खाती आहेत. तर सीडीएसएल कमॉडिटी रिपॉझिटरी लिमिटेड इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये कमॉडिटी मालमत्तेची मालकी आणि हस्तांतरण सुलभ करते. सीडीएसएलने नुकतीच ‘ओएनडीसी’मधील (ओपेन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स) गुंतवणुकीत १.५४ टक्के गुंतवणूक (१०० कोटी रुपये) केली आहे. ओएनडीसी भारतीय डिजिटल कॉमर्स परिसंस्थेचा विकास आणि परिवर्तन करण्यासाठी एक मुक्त सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करते. कंपनीचे यंदाच्या वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. ३० जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने २५७ कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ती ६५ टक्क्यांनी अधिक आहे. तर याच कालावधीत नक्त नफ्यात ८२ टक्के वाढ होऊन तो ७४ कोटींवरून १३४ कोटींवर गेला आहे. भारतातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत गुंतवणूकदारांचे प्रमाण पाहता आगामी कालावधीत कंपनीकडून कामगिरीचा आलेख असाच चढता राहील अशी अपेक्षा आहे. सीडीएसएलचा शेअर याच स्तंभातून मार्च २०२० मध्ये गुंतवणुकीसाठी २३५ रुपयांना सुचवला होता. ज्या वाचकांनी ही खरेदी केली त्यांना या समभागाने १२ पटींहून अधिक फायदा करून दिला आहे. आपल्या पंचविसाव्या वर्षांत एकास-एक (१:१) बक्षीस समभाग देणाऱ्या सीडीएसएलचा शेअर सध्या १,४०० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक योग्य पर्याय ठरू शकेल. शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्याटप्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे,

-अजय वाळिंबे

stocksandwealth@gmail.com

हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हे. प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay walimbe article portfolio central depository services market structure mutual funds print eco news amy
Show comments