आजच्या बाजाराबद्दल तुमचे काय मत आहे? एकीकडे वाढत्या व्याजदर वाढण्याची भीती आहे, तर दुसरीकडे महागाई वाढत आहे. भू-राजकीय तणावही आहे. या सर्व परीठीतीकडे एका फंड मॅनेजरच्या दृष्टिकोनातून, तुम्ही बाजाराकडे कसे पाहता?
आलोक सिंग: सर्वप्रथम, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की बाजारातील आव्हाने कधीच संपत नाहीत. एक संपले की दुसरे सुरू होते आणि प्रत्येक आव्हानाची व्याप्ती व परिणाम वेगवेगळे असतात. परंतु जगभरात काहीच घडले नाही आणि त्या घडण्याची बाजाराने दखल घेतली नाही असा दिवस उजाडत नाही. उदाहरणार्थ, आज पश्चिम आशियातील सद्यस्थिती आणि इतर भू-राजकीय समस्यांमुळे विविध व्यवसायांवर परिणाम होत आहे.आणि याचा परिणाम अर्थव्यवस्था आणि बाजारपेठ या दोन्हींवर होतो. या घटकांमध्ये संतुलन साधण्यासाठी, सरकारी धोरणे किंवा रिझर्व्ह बँक सारखे नियामक हा परिणाम सौम्य करण्यासाठी किंवा त्यात सकारात्मक पैलू जोडण्यासाठी आपल्या धोरणांमध्ये बदल करतात.आजकाल भू-राजकारणाचा मोठा प्रभाव पडत असल्यामुळे आणि त्यामुळे जागतिक व्यापारावर लक्षणीय परिणाम होत असल्यामुळे, महागाई ही एक मोठी समस्या बनली आहे आणि भविष्यात ती आणखी गंभीर होऊ शकते. यावर मात करण्यासाठी व्याजदर वाढवणे हे एक धोरणात्मक पाऊल आहे. कारण व्याजदर वाढविल्याने मागणी कमी होऊन महागाईवर नियंत्रण मिळविता येते. त्यामुळे महागाई थोडी कमी होते. परंतु केवळ रिझर्व्ह बँक केवळ महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी जबाबदार नाहीत. त्यांना महागाई आणि आर्थिक वृद्धी यांच्यात संतुलन राखायचे असते. आज सकाळी रिझर्व्ह बँकेने आपले पत धोरण जाहीर करताना, महागाईचा धोका असल्याचे कारण देतांना धोरणात्मक व्याज दरात दरात बदल केला नाही. तथापि, याचा काय परिणाम होऊ शकतो, हे आम्ही अधिक बारकाईने तपासू इच्छितो. कारण व्याजदर खूप लवकर वाढवल्यास विकास आणि मागणीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, मला वाटते की रिझर्व्ह बँक तात्काळ कारवाई करेल असा जो दबाव वाढत होता, तो आता काहीसा कमी झाला आहे. आणि त्यामुळे बाजारथोडा वर जाणे अपेक्षित आहे. दुसरे म्हणजे, भू-राजकारण असो किंवा इतर कोणतीही परिस्थिती असो, बाजार एकाच गोष्टीबाबत खूप वेळ खंत व्यक्त करीत बसत नाही. त्या गोष्टीचा किमतींवर जो काही परिणाम होतो किंवा किमतींमध्ये जे काही चढ-उतार होतात, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून बाजार पुढे जातो. त्यामुळे हळूहळू, कारण हे मध्य-पूर्वेतील संकट बऱ्याच काळापासून सुरू आहे, त्या गोष्टी बाजारातील विविध वस्तूंच्या किमतींमध्ये हळूहळू प्रतिबिंबित होत आहेत. आम्हाला असा विश्वास आहे की, मोठ्या प्रमाणावर, बाजाराने त्याच्या नकारात्मक प्रतुक्रिया आधीच दिली असून इथून पुढे परिस्थिती सुधारली, तर बाजार सकारात्मक दिशेने वाटचाल करेल.
विद्यमान परिस्थितीत तुम्ही तुमच्या फंडाची गुंतवणूक कोणत्या क्षेत्रांमध्ये वाढवली आहे आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये कमी केली आहे?
आलोक सिंग : आम्ही आमच्या पोर्टफोलिओच्या विभागणीत अलीकडे कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. तथापि, काही काळापासून, आमचा पोर्टफोलिओ महागाईशी चांगल्या प्रकारे सामना करू शकणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण वाढविले आहे. खनिज क्षेत्र महागाई चांगल्या प्रकारे हाताळू शकते, कारण उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या खनिजाचे उत्खनन करत असाल आणि तुम्हाला त्यासाठी योग्य मोबदला मिळत नसेल, तर तुम्ही खाणीतून खनिज काढणे कमी कराल किंवा थांबवाल पण तोट्यात विकणार नाही. परिस्थिती तशीच राहणार नाही, अशी काही क्षेत्रे आहेत जी महागाईला अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतात. आमच्या सर्व पोर्टफोलिओमध्ये याला थोडे जास्त महत्त्व होते. दुसरे म्हणजे, आम्ही पाहत होतो की बाह्य भू-राजकारणामुळे मोठा परिणाम होत असूनही, देशांतर्गत मागणी टिकून होती, त्यामध्ये, ऑटोमोबाइल क्षेत्राची आकडेवारी खूप चांगली आहे. वाहन पोर्टलवर येणारी मासिक आकडेवारी दर्शवते की वाहनांची मागणी अजूनही टिकून आहे. त्यामुळे, ऑटो क्षेत्राबद्दल आमची भूमिका सकारात्मक आहे आणि फार्माबद्दलही आमची भूमिका सकारात्मक आहे, कारण फार्मा ही एक अत्यावश्यक वस्तू आहे. विजेच्या बाबतीत आमची भूमिका सकारात्मक आहे, कारण देशांतर्गत आणि तुमच्या उद्योगांमध्ये, तसेच तुमच्या सर्व डेटा सेंटर्स इत्यादींमध्ये विजेची मागणी वाढत आहे. यामुळे, विजेची मागणी केवळ भारतातच नाही, तर जागतिक स्तरावरही वाढत आहे. त्यामुळे, वीज उत्पादन करणारे, वीज वितरण करणारे किंवा त्यासाठी लागणारी उपकरणे तयार करणारे—या संपूर्ण परिसंस्थेवर (निर्मिती पारेषण आणि वितरण) मोठ्या प्रमाणात मागणीचा भार आहे, म्हणूनच, त्यांच्या कारखान्यांचा वापर आणि नफा हे सर्व खूप चांगल्या पातळीवर कार्यरत आहेत, ही आमच्यासाठी एक सकारात्मक बाब आहे. नकारात्मक बाजूने पाहिल्यास, आयटी क्षेत्राचे आमच्या गुंतवणुकीतील प्रमाण कमी केली आहे. तेल आणि वायू क्षेत्रातही आमची गुंतवणूक कमी आहे. आयटी क्षेत्रात, कृत्रिम बुद्धीमत्ते (एआय) बाबत बाबत काही अनिश्चितता आहे. तेल आणि वायू क्षेत्रात, भू-राजकीय परिस्थिती आणि संघर्षामुळे मध्य-पूर्वेत निर्माण झालेले ऊर्जा संकट पाहता, भारतीय तेल आणि वायू कंपन्या, विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, नफा कमवू शकत नाहीत, कारण सरकारचे त्यांच्यावर खूप जास्त नियंत्रण आहे. याचा त्यांच्या नफ्यावर लक्षणीय परिणाम होतो, त्यामुळे हे एक असे क्षेत्र आहे जिथे आमची गुंतवणूक कमी आहे.बँकिंगसारख्या इतर क्षेत्रांमध्ये आमचे प्रमाण जवळपास समान आहे. तथापि, जर आपण भांडवली बाजाराशी संबंधित व्यवसाय, म्हणजेच बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्राकडे पाहिले, तर त्याबाबत आमची भूमिका किंचित अधिक सकारात्मक आहे. कारण आमचा विश्वास आहे की, जसजसा आपला जीडीपी वाढेल, तसतसे लोकांना कमाईच्या अधिक संधी मिळतील आणि पैसा उपलब्ध होईल, ज्यामुळे तो पैसा वित्तीय बचतीकडे वळेल. त्यामुळे, ही वाढ संभाव्यतः खूप मोठी असू शकते. म्हणूनच, त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत.
एक म्युच्युअल फंड विश्लेषक म्हणून, जेव्हा मी माझे संशोधन करतो, तेव्हा तुमचे सर्व फंड हे ‘इंडिया ओपन एंडेड फंड’ या परिघातील फंडांचा विचार करताना तुमचे दोन फंड फ्लेक्झीकॅप आणि स्मॉलकॅप खूप चांगली कामगिरी करत असल्याचे दिसते त्यांची अनेकल वर्षांपासून कामगिरी सातत्यपूर्ण आहे. या दोन्हीच्या यशाचे काय रहस्य आहे?
आलोक सिंग : तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं की आर्थिक बाजारांबद्दल एक मोठी गोष्ट आहे: इथे बरोबर किंवा चूक असं काही नसतं. या सर्व शक्यता असतात आणि तुमच्या जास्त शक्यता वास्तवाच्या जवळ गेल्या की परिणाम चांगला होतो. तुम्हाला काही गोष्टी सातत्याने कराव्या लागतात. जर तुम्ही सतत लेन बदलत राहिलात, तर तुम्ही वाहतूक कोंडीत अडकाल. आपण याकडे अधिक बारकाईने पाहिलं, जसं आपल्याला करायचं आहे, तर पहिली गोष्ट जी आपण विचारात घेतली पाहिजे ती ही की, कोणत्याही फंडातील गुंतवणूकदाराने या विचाराने पैसे गुंतवलेले असतात की, ‘जर मी इथे गुंतवणूक केली, तर मला अशा प्रकारचा परिणाम मिळेल, इथे जोखीम आणि परतावा दोन्ही आहेत, कारण प्रत्येक फंडाची जोखीम वेगळी असते. स्मोल्कॅप मध्ये अधिक तर फ्लेक्झीकॅप मध्ये कमी असते. प्रत्येक फंडातून मिळणारा परतावा वेगला असतो. तुम्ही फ्लेक्सीकॅपकडे पाहिलं, तर नावाप्रमाणेच ते लवचिक असतात. याचा अर्थ असा की, फंड मॅनेजर आपल्या विवेकबुद्धीनुसार गुंतवणुकीची रक्कम बदलत राहील, जसे की लार्ज कॅप्, मिड कॅप् आणि स्मॉल कॅप. यामुळे, एका सामान्य गुंतवणूकदाराला, हे रोटेशन करावे लागत नाही. आम्ही आता जवळपास सहा वर्षांपासून, फंड व्यवस्थापित करीत आहोत. त्यामुळे, हा फंड सुरू झाल्यापासून, आम्ही तो सुचवलेल्या नावानुसारच चालवला जाईल यावर बारकाईने लक्ष दिले. सेबीच्या भाषेत सांगायचं तर, (ट्रु टू लेबल) “नावाप्रमाणेच कामगिरी”., आणि मला वाटतं की आम्हाला त्याचा थोडा फायदा झाला आहे. कारण प्रत्येक गोष्ट नेहमीच चांगली कामगिरी करत नाही. त्यामुळे, जर तुम्ही काळानुसार,आमच्या समजुतीनुसार बदल केले, तर ते जोखीम व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. आणि जर आम्ही अधिक चांगले जोखीम व्यवस्थापन केले असेल, तर त्याचे फायदे आम्हाला आमच्या परताव्यामध्येही दिसतात. स्मॉलकॅप फंड हे एक खूपच रंजक क्षेत्र आहे. कारण यामध्ये कंपन्या आणि व्यवसायांची संख्या सर्वाधिक आहे. कारण सेबीच्या व्याख्येनुसार, पहिल्या १०० कंपन्या लार्ज-कॅप्स त्यानंतरच्या १५० मिड-कॅप आणि उर्वरित स्मॉलकॅप. ते सर्व स्मॉल कॅप आहेत. स्मॉल कॅप मध्ये ५,००० पेक्षा जास्त कंपन्यांचाविकल्प उपलब्ध आहे. तुम्ही तुमचे संशोधन करून असे व्यवसाय शोधू शकता, ज्यांना तुमच्या मते, चांगली शक्यता, वाढीची मोठी क्षमता आणि एक मजबूत स्पर्धात्मक फायदा आहे, आणि आम्ही ज्याला “बॉटम्स-अप पोर्टफोलिओ” म्हणतो तो तयार करू शकता. आणि जर आपण त्या दृष्टिकोनातून पाहिले, तर मला वाटते की कंपन्या निवडण्याची आमची प्रक्रिया, तसेच व्यवसायांचे जोखीम व्यवस्थापन, जसे मी नुकतेच नमूद केले, प्रत्येकामध्ये किती आणि काय गुंतवणूक करायची, या सर्वांचा आमच्या सर्व फंडांना त्यांच्या प्रत्येक टप्प्यात फायदा झाला आहे. स्मॉल कॅप फंड, जसा तो आता अस्तित्वात आहे, तो जवळपास आठ वर्षे जुना आहे. आणि स्थापनेपासून, तो सुरू झाल्यापासून एक उत्कृष्ट कामगिरी करणारा फंड राहिला आहे. (हा फंड ‘ मागील सहा वर्षांपासून लोकसत्ता कर्ते’ म्युच्युअल फंड यादीचा भाग आहे) केवळ परताव्याच्या दृष्टिकोनातूनच नाही, तर जर तुम्ही जोखीम आणि मालमत्तेच्या दृष्टिकोनातूनही पाहिले, तर हे एक खूप सकारात्मक वैशिष्ट्य आहे. तर, मला वाटतं की दोन्ही फंडांच्या, किंवा इतर कोणत्याही फंडांच्या यशाचं श्रेय, आमच्या कामाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला, आमच्या प्रक्रियेला, तसेच जोखीम व्यवस्थापन आणि वाटप व्यवस्थापनाला जातं. मला वाटतं की हेच आमच्या यशाच रहस्य आहे.
तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना काय सल्ला द्याल?
आलोक सिंग : बघा, बाजारातील आवर्तने आणि चढउतारांचे निरीक्षण करत असल्यामुळे आमचे सर्व गुंतवणूकदार हळूहळू अधिक चिकित्सक बनत आहेत. मला वाटते की यामुळे त्यांची समज लक्षणीयरीत्या वाढली आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, कधीकधी आपण इथे नजीकच्या काळातील परताव्यामुळे प्रभावित होतो किंवा चिंतित होतो. त्यामुळे, मला वाटतं की आपण त्यापलीकडे थोडं जायला हवं. उदाहरणार्थ, सध्या लोक गेल्या दोन वर्षांत परतावा न कमावल्याबद्दल खूप खंत व्यक्त करीत आहेत. परंतु गेल्या ५ -७ वर्षांत चांगला नफा कमविला आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूक कधीच मुदत ठेविसारखी एका सरळ रेषेत परतावा दत नसते. म्युच्युअल फंडातला परतावा कधी लवकर तर कधी उशिरा मिळतो. तुम्ही या दृष्टिकोनातून पाहिले, तर तुमचा २०२३ किंवा २०२४ मधील परतावा जास्त आहे तर २०२५ आणि २०२६ मधील परतावा कमी आहे. लवकर की उशिरा हे त्यावेळच्या वातावरणावर अवलंबून आहे. आता, जर तुम्ही त्या दृष्टिकोनातून पाहिले, तर भविष्यात गोष्टी ठीक असायला हव्यात. किंवा, दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, जर तुमची पहिली दोन वर्षे वाईट गेली असतील, तर तिसरे किंवा चौथे वर्ष कदाचित चांगले जाईल. त्यामुळे, जर तुम्ही थोड्या दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिले, तर ही एक सकारात्मक बाब आहे . सरतेशेवटी, बाजारपेठ स्वतःहून काहीही निर्माण करत नाही. बाजारपेठ ही अर्थव्यवस्थेत काय घडत आहे याचे प्रतिबिंब असते. जर तुमची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असेल, तिचा विकास दर चांगला असेल आणि धोरणे योग्य असतील, तर ते अखेरीस भावनांमध्ये प्रतिबिंबित होईल.आणि म्हणूनच, जर तुम्ही आमचा मागील दीर्घकालीन कालावधी पाहिला, तर निर्देशांक स्तरावर आमचा परतावा १४-१५% आहे आणि आमचा नाममात्र जीडीपी (नॉमिनल जीडीपी) वाढीचा दर देखील १२-१३% आहे; त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, ते कुठेतरी जुळते, आता, त्यात, जर तुमचा निर्देशांक १४% परतावा देत असेल, तर तुमच्या फंड मॅनेजरने चांगले काम केले असेल, तर तो १४ चे २० करेल. जर त्याने चांगले काम केले नसेल, तर तो १४ चे १० करेल, त्यामुळे, तुमची निवड थोडी वेगळी होते.पण मुख्य मुद्दा हा आहे की, तुमच्या मते ‘अति अल्प-मुदतीचा परतावा’ म्हणजे दोन ते तीन वर्षे, म्हणजेच, या मापदंडात. तो एक किंवा दोन तिमाहींचा नाही, कारण सामान्यतः जेव्हा तुम्ही सल्ला देता, तेव्हा तुम्ही ५ ते १० वर्षांबद्दल बोलता. कधीकधी ज्याला आपण ‘अलीकडील घटनांचा प्रभाव’ (Recency Bias) म्हणतो, म्हणजे जर काल परिस्थिती वाईट होती तर आजसुद्धा वाईटच असेल, किंवा जर काल परिस्थिती चांगली होती तर आजसुद्धा चांगलीच असेल, मला वाटते की गुंतवणूकदारांनी यापासून थोडे दूर राहावे आणि आपले मालमत्ता वाटप (asset allocation) कायम ठेवावे.
आपण फंड मॅनेजमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट क्षेत्रात येण्याचा आपला प्रवास कसा होता ?
आलोक सिंग: मी फंड मॅनेजमेंटमध्ये माझ्या करिअरची सुरुवात केली, तेव्हा मी आताच्या एक्सिस बँकेच्या (जी तेव्हा यूटीआय बँक होती) ट्रेझरी विभागात होतो. तिथे मी फिक्स्ड इन्कम ट्रेडिंगने सुरुवात केली. त्यानंतर, जशा संधी उपलब्ध झाल्या तसा माझा प्रवास एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत झाला. गुंतवणूक व्यवस्थापनात ही नैसर्गिक प्रगती होती. एक दुवा दुसऱ्या दुव्याला जोडला जातो, तसे मी या टप्प्यावर पोहोचेन याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी एक्सिस बँकेत सुरुवात केली कारण ती मला मिळालेली पहिली संधी होती. आणि मग, जसजसा मी पुढे जात राहिलो, तसतसे दुवे जोडले जात राहिले. आणि हळूहळू, मी इथे पोहोचलो, पण मी फक्त फंड मॅनेजमेंटच करेन अशी मी कधी पद्धतशीरपणे विचार केला नव्हता पण हळूहळू, काळाच्या ओघात, मी इथे पोहोचलो.
लेखक बँक ऑफ इंडिया इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स म्हणजेच बीओआय म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत.
- वसंत कुलकर्णी यांनी लोकसत्तासाठी घेतलेली खास मुलाखत
